‘आयमा प्रदर्शन’ आंतरराष्ट्रीय दर्जाचे : धनंजय बेळे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Jan-2018
Total Views |
 
 
 
 
 
नाशिक : ’’नाशिकच्या डोंगरे वसतिगृह मैदानावर भरविण्यात आलेले ‘आयमा इंडेक्स’ प्रदर्शन आंतरराष्ट्रीय दर्जाचे होण्यासाठी भरपूर प्रयत्न केले असून इटली तसेच विदेशातील प्रतिनिधींनी देखील यास भेट देऊन समाधान व्यक्त केले आहे,’’ अशी माहिती ‘आयमा’चे अध्यक्ष धनंजय बेळे यांनी पत्रकारांशी बोलताना आज दिली. आज प्रदर्शनाच्या दुसर्‍या दिवशी नागरिकांनी यातील विविध स्टॉलवर गर्दी केली होती. स्वतः बेळे यांनी प्रत्येक स्टॉलला भेट देऊन पाहणी केली.
 
दरम्यान एचएएल नाशिकला ‘सुखोई’ विमानांच्या बांधणीचे काम मिळाल्यानंतर त्याच्या सुट्या भागांची निर्मिती मोठ्या प्रमाणावर व्हेंडर नोंदणीतून झाली. नाशिकमधील उद्योगांच्या गुणवत्तावाढीसाठी एचएएलने जाणीवपूर्वक प्रयत्न केल्याने ते या क्षेत्रात सक्षम झाले आहेत. त्यामुळे द्राक्ष, डाळिंब व कांद्यासाठी प्रसिद्ध असलेल्या नाशिकची ओळख जागतिक पातळीवर ’विमानबांधणी उत्पादनाचे शहर’ म्हणून व्हावी, अशी अपेक्षा एचएएल मिग कॉम्प्लेक्सचे सीईओ दलजितसिंग यांनी व्यक्त केली. अंबड इंडस्ट्रीज ऍण्ड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या वतीने डोंगरे वसतिगृह मैदानावर आयोजित केलेल्या ’आयमा इंडेक्स २०१८’ या प्रदर्शनात त्यांनी ही अपेक्षा व्यक्त केली.
 
आगामी केंद्रीय अर्थसंकल्पात नाशिकमध्ये रेल्वे व्हिल्स दुरुस्ती कारखान्याची घोषणा होण्याची शक्यता असल्याचे सांगून खा. हेमंत गोडसे म्हणाले की, ’’उद्योजक आणि लोकप्रतिनिधींनी हातात हात घालून काम केल्यास शहराचा विकास जलदगतीने होतो. आ. बाळासाहेब सानप यांनी काही संघटना उद्योगवाढीस मारक ठरत असून एकत्रित येऊन त्यांचा मुकाबला करावा, असे नमूद करून शहराच्या विकासासाठी पक्षभेद विसरून जास्तीत जास्त निधी आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. प्रदर्शनाचा शुभारंभ महापौर रंजना भानसी, आ. सानप, आ. सीमा हिरे यांच्या हस्ते झाला. व्यासपीठावर खासदार गोडसे, महापालिकेचे सभागृहनेते दिनकर पाटील, स्थायी समिती सभापती शिवाजी गांगुर्डे, उपमहापौर प्रथमेश गिते, आयमाचे अध्यक्ष राजेंद्र अहिरे, आयमा इंडेक्सचे चेअरमन धनंजय बेळे, सेक्रेटरी निखिल पांचाल, माजी अध्यक्ष एस. एस. आनंद आदी होते. आ. हिरे यांनीही मार्गदर्शन केले. राजेंद्र अहिरे यांनी प्रास्ताविक करताना औद्योगिक वसाहतींतील पायाभूत सुविधांवर खर्चाचे प्रमाण वाढवण्याची मागणी केली. कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती.
 
औद्योगिक वसाहतींत २५ कोटींचे रस्ते
सातपूर व अंबड औद्योगिक वसाहतीत लवकरच २५ कोटींचे रस्ते होणार असल्याचे महापौर भानसी यांनी यावेळी जाहीर केले. औद्योगिक वसाहतींत गटारांचा कित्येक वर्षांपासून प्रलंबित विषय मार्गी लावत असून त्याचा सविस्तर प्रकल्प अहवाल राज्य शासनाकडे पाठविल्याचे सांगितले.
 
 
‘कायमस्वरूपी प्रदर्शन केंद्राचा विचार व्हावा’
‘आयमा इंडेक्स’चे चेअरमन बेळे यांनी राज्यात गुंतवणुकीसाठी ‘नेक्स्ट डेस्टिनेशन’ म्हणून नाशिककडे पाहिले जात असल्याचे सांगितले. ‘स्मार्ट सिटी’तही नाशिकचा समावेश झालेला आहे. त्यामुळे देशासह विदेशी गुंतवणूकही आपल्या शहरात यावी, यासाठी पायाभूत सुविधाही चांगल्या असाव्यात, अशी अपेक्षा उद्योगजगताकडून व्यक्त केली जात असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. लघु व मध्यम उद्योजकांसाठी हे प्रदर्शन लाभदायी ठरणार असल्याचे सांगत शहरात कायमस्वरूपी प्रदर्शन केंद्राची गरज असून ते शहराच्या जवळ एनएमआरडीएसारख्या संस्थेकडून उभारले जावे याचा गांभीर्याने विचार करावा, अशी मागणीही त्यांनी लोकप्रतिनिधींकडे केली.
 
@@AUTHORINFO_V1@@