सत्य काय आहे हे जगाला दाखवू : पाकिस्तान

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Jan-2018
Total Views |





इस्लामाबाद  :  अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तान संबंधी केलेल्या वक्तव्यावर पाकिस्तान सरकारने तीव्र नाराजी व्यक्त केली असून ट्रम्प यांचे वक्तव्य चूक असल्याचे आम्ही सिद्ध करु अशी प्रतिक्रिया पाकिस्तानकडून देण्यात आली आहे. पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री ख्वाजा असिफ यांनी देखील ट्विटरच्या माध्यातून ट्रम्प यांच्या वक्तव्याला आम्ही लवकरच उत्तर देऊ व जगाला सत्य काय आहे हे दाखवू' असे म्हटले आहे. यानंतर रात्रभरात पाकिस्तानने हाफिज सईद याच्या जमात उद दावा आणि फलाह-ए-इंसानियत फाउंडेशन या दोन्ही संस्थाना मिळणाऱ्या देणग्यांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.

 
 
ट्रम्प यांनी काल रात्री ट्वीट करून पाकिस्तानच्या दहशतवाद संबंधी असलेल्या दुटप्पी धोरणाचा चांगलाच समाचार घेतला होता. 'अमेरिकेने गेल्या १५ वर्षांमध्ये पाकिस्तानला ३३ अरब डॉलरहून अधिक रक्कम मदत म्हणून दिलेली आहे. परंतु या बदल्यात पाकिस्तानकडून नेहमी अमेरिकेची फसवणूक केली आहे. पाकिस्तानने नेहमी अमेरिकेच्या नेत्यांना मूर्खच समजले आहे. त्यामुळे आम्ही ज्या दहशतवाद्यांना अफगाणिस्तानमध्ये शोधतो, त्या दहशतवाद्यांना ते आपल्या देशामध्ये लपण्यासाठी जागा आणि सुरक्षित आसरा देतात.' असे ट्रम्प यांनी म्हटले. तसेच यापुढे पाकिस्तानला अमेरिकेकडून थोडीशी देखील मदत दिली जाणार नाही' अशी रोखठोक भूमिका त्यांनी घेतली आहे.



ट्रम्प यांच्या या भूमिकेचे अफगाणिस्तानकडून देखील स्वागत करण्यात आले असून अमेरिकेने अत्यंत योग्य निर्णय घेतला असल्याचे मत अफगाणिस्तानच्या माजी राष्ट्रपती हमीद कारझई यांनी व्यक्त केले आहे. गेल्या १५ वर्षापासून अफगाणिस्तानच्या भूमीत युद्ध होत आहे, हल्ले होत आहेत, परंतु याची सर्व सूत्रे ही अफगाणिस्तानच्या सीमेपलीकडूनच हलवली जात होती. त्यामुळे आता पाकिस्तानने फक्त अफगाणिस्तानातच नव्हे तर संपूर्ण दक्षिण आशिया खंडामध्ये शांतता निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, अशी प्रतिक्रिया कारझई यांनी दिली आहे. तसेच भारताने देखील यावर आपली प्रतिक्रिया देत, ट्रम्प यांच्या आजच्या वक्तव्यामुळे भारताची पाकिस्तान विषयीची भूमिका आणि बाजू भक्कम झाली आहे, असे भारताने म्हटले आहे.



@@AUTHORINFO_V1@@