इराणमध्ये सरकारविरोधात हिंसक आंदोलने

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Jan-2018
Total Views |

पोलीस चकमकीत १० नागरिक ठार





तेहरान (इराण) :
गेल्या दोन दिवसांपासून इराण सरकार विरोधात तेहरानमध्ये सुरु असलेल्या आंदोलनाचे लोण आता संपूर्ण देशभर पसरू लागले आहे, रुहानी सरकारच्या अनेक फसलेल्या योजनांच्या विरोधात इराणमधील जनता आता रस्त्यावर उतरून सरकारविरोधात हिंसक कारवाया करू लागली आहे. या हिंसक आंदोलनामध्ये आतापर्यंत १० नागरिकांचा मृत्यू देखील झाला आहे. तसेच हे आंदोलन दडपण्यासाठी इराणचे राष्ट्राध्यक्ष हसन रुहानी यांनी सुरक्षा अधिक कडक करण्याचे आदेश देशाच्या सुरक्षा विभागांना दिले आहेत.
 
रुहानी सरकारने गेल्या काही वर्षांमध्ये घेतलेले सर्व निर्णय विशेषतः आर्थिक निर्णय फसल्यामुळे इराणमध्ये अनेक नव्या समस्यांचा जन्म झाला आहे. तसेच प्रशासनामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार वाढला असून या सर्वांविषयी जनतेच्या मनात प्रचंड असंतोष खदखदत होता. याविरोध गेल्या शनिवारपासून तेहरानमध्ये काही ठिकाणी छोटीमोठी निदर्शन होऊ लागली होती. यानंतर या आंदोलनांना मोठे स्वरूप प्राप्त होत, ते आंदोलन तेहरानसह देशातील अनेक मोठ्या शहरांमध्ये पसरले. यानंतर यामधून अनेक हिंसक कारवाया घडण्यास सुरुवात झाली. अनेक इराणी महिलांनी आपले हिजाब काढून ते हवेत फेकून दिले  व जाळले. तसेच आंदोलनकर्त्यांनी हिंसक कारवाया करत तेहरानमधील पोलीस चौक्यांचा आणि इतर सरकारी कार्यालयाचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला. यावर कारवाई करत पोलिसांनी आंदोलनकर्त्यांवर थेट गोळीबार करण्यास सुरुवात केली. या चकमकीमध्ये आतापर्यंत १० नागरिक ठार झाले असून १२ हून अधिक जण जखमी झाले आहेत.
 
दरम्यान इराणमधील या आंदोलनांवर 'नवीन बदलाचा वेळ आला आहे', अशी प्रतिक्रिया अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहे. इराणमधील जनता ही स्वातंत्र्यासाठी आणि अन्नासाठी आतुर आहे. परंतु इराण सरकारने याकडे लक्ष न देता उलट ओबामा प्रशासनाच्या कार्यकाळात इतर अनेक घातक करार केले. त्यामुळे आता इराणच्या जनताच त्यांना योग्य धडा शिकवेल, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.
 
 
इराणमधील हे आंदोलन रुहानी सरकारचा विरोध करण्याबरोबरच इस्लामचाही विरोध करण्यासाठी होत आहे असेही सांगितले जात आहे. इराणमधील मूळ संस्कृती ही पारशी असून इस्लाममुळे जनजीवन अधिक बंदीवान झाले असल्याचे तेथील महिलांचे म्हणणे आहे. त्यामुळे त्यांनी इस्लाम नाकारत रस्त्यावर उतरून हीजाब जाळणे पसंत केले असल्याचे सांगितले जात आहे. 
@@AUTHORINFO_V1@@