सामाजिक कार्यकर्त्यांनी ग्रामीण भागातील १५ शाळा घेतल्या दत्तक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Jan-2018
Total Views |
 
 
 
 
 
बदलापूर : अंबरनाथच्या माजी नगरसेविका सुमती पाटील, रोटरी क्लबचे संचालक आणि नेत्रतज्ज्ञ डॉ. राहुल चौधरी यांनी अंबरनाथ आणि मुरबाड तालुक्यातील तब्बल पंधरा गावे आणि शाळा दत्तक घेण्याचा संकल्प केला असून या योजनेचे उद्घाटन आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते नुकतेच झाले.
 
सुमती पाटील आणि डॉ. राहुल चौधरी यांनी ग्रामीण भागाला अनेक वेळा भेटी देऊन त्यांना कोणत्या सुविधांची आवश्यकता आहे तसेच या गावातील शाळांना भेडसावणार्‍या गरजांचा अभ्यास केला. तसेच ग्रामस्थ आणि शाळेच्या मुख्याध्यापकांशी चर्चा केली.
 
शाळांना कपाटे, पंखे, जलशुद्धीकरण यंत्रणा, क्रीडा साहित्य, विद्यार्थ्यांना गणवेश, वह्या यांचे वाटप तसेच स्वच्छतागृह आणि कूपनलिकांच्या भूमिपूजनाचा आमदार कथोरे यांच्या हस्ते ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार, ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक राजेश पाटील, गटशिक्षणाधिकारी मधुकर घोरड, भाजपचे मुरबाड तालुका अध्यक्ष जयवंत सूर्यराव, बाळकृष्ण घरत, हरिश्चंद्र पादीर, जनार्दन पादीर, नारायण निरगुडा आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
 
मराठी माध्यमांच्या शाळांना अडचणी आहेत. त्या सोडवून शाळांची परिस्थिती सुधारण्यासाठी कायम प्रयत्न सुरू असतात. जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणारे विद्यार्थीच पुढे चांगली प्रगती करू शकतात, असा दावा आ. कथोरे यांनी केला. सुमती पाटील आणि डॉ. राहुल चौधरी यांनी सुरू केलेले शैक्षणिक उपक्रम स्तुत्य आहेत. दर आठवड्याला गावांमध्ये आरोग्यासाठी विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ डॉक्टरांना घेऊन येऊन ग्रामीण भागातील नागरिकांची विशेष करून महिलांची आरोग्य तपासणीसुद्धा करणार असल्याचे आमदार कथोरे म्हणाले.
 
जिल्ह्यातील प्रयेक शाळा स्वयंपूर्ण व्हावी यासाठी स्वयंपूर्ण शाळा हा उपक्रमहाती घेण्यात आलेला असून त्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व शाळांना लागणार्‍या मूलभूत सुविधांची यादी तयार करण्यात येत आहे. येत्या सहा महिन्यांत सर्व शाळा स्वयंपूर्ण करण्याचा प्रयत्न असल्याचे प्रतिपादन ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार यांनी सांगितले. पाटगाव, गटेवाडी, तागवाडी, बाटलीची वाडी, कामतवाडी, चाफेवाडी, चिरड, शिल्डवाडी, वाघाची वाडी, तोंडली, टाकीची वाडी, शिरवली, म्हसा, कंचोल, काचकोली, जांभूळवाडी आदी गावे सुमती पाटील आणि डॉ. राहुल चौधरी यांनी दत्तक घेतली आहेत. सुमती पाटील यांनी प्रास्ताविक, दत्तात्रय डोंगरे यांनी स्वागत तर संजय उंबरे यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.
 
@@AUTHORINFO_V1@@