कारवाईतील भेदाभेद

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Jan-2018
Total Views |
 

 
२८ डिसेंबर २०१७ रोजी लोअर परळ भागातील उच्चभ्रू समजल्या जाणार्‍या कमला मिल कंपाऊंड भागातील दोन ठिकाणी आग लागली. या आगीत तब्बल १४ जणांचा श्वास गुदमरून मृत्यू झाला. त्यानंतर पालिकेच्या प्रशासनाने जी तत्परता दाखवली त्याला तोडच नाही. ३० डिसेंबरला पालिकेने तब्बल ३१४ ठिकाणी अनधिकृत बांधकामांवर कारवाई केली, तर दुसर्‍या दिवशी म्हणजे रविवारीही ३५७ ठिकाणी कारवाई केली गेली.
 
या सगळ्या गदारोळात एक गोष्ट थोडी बाजूलाच राहिली. ती म्हणजे १८ डिसेंबर रोजी अंधेरीतल्या साकीनाका भागात फरसाणच्या कारखान्यात आग लागून १२ कामगारांचा होरपळून मृत्यू झाला. अतिशय कोंदट जागेत हा कारखाना चालत होता. तसेच कुठल्याही प्रकारची आपत्कालीन सुविधा येथे उपलब्ध नव्हती. मृत्यू पावलेल्या कामगारांची ओळख पटतच नव्हती इतकी आग भयानक होती. थोडी आग लागल्याने तेथील सिलिंडर आगीच्या भक्ष्यस्थानी पडले, स्फोट झाले आणि आगीचा आगडोंब उसळला. सविस्तर माहिती देण्याचे कारण ज्या कामगारांचा मृत्यू झाला ते अत्यंत दुर्दैवी होते.
 
प्रश्न उरतो असा की, १० दिवसांच्या फरकानंतर दुसरी घटना घडली. ही तत्परता जर तेव्हा दाखवली असती तर २८ डिसेंबरची दुर्घटना घडली असती का? सेनेचे युवराज घटनास्थळी पोहोचले आणि म्हणतात की, काही दिवसांपूर्वी ते येथे आले होते आणि अशा दुर्घटनेची शंका उपस्थित केली होती. युवराजांनी ही शंका उपस्थित केल्यानंतरही पालिका प्रशासन ढिम्म असेल, तर नागरिकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाची काय तर्‍हा? मृत्यू हा कधी ना कधी येणारच. तो गरीब-श्रीमंत पाहून येत नाही, पण गरिबांच्या मृत्यूला काहीच किंमत नाही? कायद्याचे राज्य म्हटल्यावर नियम सर्वांना सारखे हवे, कुणालाही त्यातून सूट अथवा जाच नको. अशा घटना जेव्हा घडतात तेव्हा तातडीने त्यावर उपाययोजना करणे गरजेचे आहे, पण जिथे हितसंबंध असतात तिथे कायदा दुर्लक्षित केला जातो आणि हे सामान्य जनतेच्या जिवावर येते.
 
ज्या तत्परतेने अनधिकृत हॉटेल्स आणि इतर बांधकामांवर कारवाई झाली त्याच तत्परतेने जिथे जिथे सुरक्षेचे नियम डावलले जातात, तिथे कारवाई करणे गरजेचे आहे. जिथे मंत्रालयाला आग लागू शकते तिथे इतर ठिकाणांबद्दल काय बोलणार? अर्थात, हे काम एकट्या प्रशासनाचे नाही. सामान्य नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी वावरताना या गोष्टी लक्षात घेणे गरजेचे आहे. कुठल्याही हॉटेलमध्ये प्रवेश करण्यापूर्वी तिथल्या काऊंटरवर याची चौकशी करावी जेणेकरून अशा दुर्घटना टाळता येतील. ’प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर’ हे तत्त्व अंगी बाळगणे गरजेचे आहे.
 
- तुषार ओव्हाळ 
@@AUTHORINFO_V1@@