इंग्रजीची भीती दूर करण्याचा वसा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Jan-2018   
Total Views |

 
 
मराठी माध्यमातल्या विद्यार्थ्यांमध्ये किंवा ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांमध्ये एका भीतीचे साम्य असते ते म्हणजे अस्खलित इंग्रजी बोलणे. हां, पण वेळ आली की ते पण सगळं शिकतात. कदाचित इंग्रजी माध्यमांच्या विद्यार्थ्यांपेक्षाही जास्त चांगलं इंग्रजी बोलायला लागतात. असाच एक तरुण ज्याने ग्रामीण भागातील असूनदेखील इंग्रजी भाषेवर असामान्य प्रभुत्व मिळविले आणि त्याचा उपयोग त्याने ग्रामीण भागातल्या मुलांमध्ये इंग्रजी भाषा रुजविण्यासाठी एका संस्थेची स्थापना केली. सचिन बुरघाटे, वय वर्ष फक्त ३३. त्याने ’अस्पायर’ या संस्थेची स्थापना केली. विदर्भातल्या अकोला शहरात चालू झालेली ’अस्पायर’ संस्था फक्त भाषेपुरतीच मर्यादित न राहता संपूर्ण व्यक्तिमत्त्व विकास घडविण्याचे कार्य करते. अकोला जिल्ह्यातल्या अकोट तालुक्यातील लाडेगाव हे सचिनचे जन्मस्थान. घरची परिस्थिती अत्यंत गरीब. आई-वडील दुसर्‍यांच्या शेतात मजुरीने पोट भरणारे. आई दुसरीपर्यंत, तर वडील तिसरीपर्यंत शिकलेले, पण तरी स्वाभिमानी. त्यांनी मुलांना परिस्थितीशी हार न मानता पुढे जाण्याचा कानमंत्र दिला आणि कदाचित तोच सचिनला भावी आयुष्यात जास्त उपयोगी पडला.
 
सचिन सातवीपर्यंत एक सर्वसाधारण विद्यार्थी होता. आठवीत सचिनला गणिताच्या शिक्षकांनी वर्गात शिकवायला सांगितले. त्यानंतर त्याला कौतुकाची थाप मिळाली. ही कौतुकाची थाप त्याच्या आयुष्याला कलाटणी देणारी ठरली. आपण काहीतरी करू शकतो, ही जाणीव त्याला पहिल्यांदा तिथे झाली आणि इंग्रजीची आवडही निर्माण झाली. दहावीत ५२.६६ टक्के गुण त्याने मिळवले, पण बेताची आर्थिक परिस्थिती पाहता वडिलांनी पुढील शिक्षण नाकारून घरच्याच लहानशा किराणा दुकानात मदत करायला सांगितले. पण, शिक्षणाची आवड सचिनला स्वस्थ बसू देईना. नंतर त्याने कॉमर्समधून ११ वी आणि १२ वी पूर्ण केले. नंतर बी. कॉम, पुढे पुण्यात जाऊन एम. बी. ए., नंतर सिंटेल या आय. टी. कंपनीत सहा महिने नोकरी केली. नंतर आय. सी. ए. या कंपनीत कॉर्पोरेट ट्रेनर म्हणून नोकरी केली. त्यानंतर तिथेच ब्रांच मॅनेजर म्हणून त्याला बढतीही मिळाली. तोपर्यंत सचिन पूर्णपणे बदलला होता. इंग्रजीवर त्याने कमालीचे प्रभुत्व मिळवले होते. प्रतिकूल परिस्थितीतून आपण शिकलो, भाषेवर, बोलण्यावर प्रभुत्व मिळवले. आता देण्याची वेळ आली आहे याची जाणीव त्याला झाली. यातूनच ५ सप्टेंबर २००९ या शिक्षक दिनी ’अस्पायर’ संस्थेचा जन्म झाला.
 
मुलांना इंग्रजी शिकवत त्यांचा सर्वांगीण विकास घडवून आणावा, हे सचिनचे ध्येय होते. सुरुवातीला संस्थेचे नाव ’एसपीएस’ होते. (SPS - S-Sure P- Pure S-Standard) आणि विद्यार्थ्यांची संख्या होती फक्त १६. मात्र, अवघ्या सात वर्षांमध्ये ’अस्पायर’ने अकोल्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती केली. इंग्रजी भाषा, व्यक्तिमत्त्व विकास, संभाषण कौशल्य, उच्चारशास्त्र शिकविणारी ’अस्पायर’ ही विदर्भातलीच नव्हे, तर राज्यातली आज एक अव्वल संस्था बनली आहे. ‘अस्पायर’ची तीन मजली देखणी वास्तू सर्वांच्या आकर्षणाचा विषय आहे. सध्या तिथे २२ प्रकारचे कोर्सेस शिकविले जातात. विशेष म्हणजे, तिथे प्रवेशासाठी वय, शैक्षणिक पात्रता असे कुठलेही बंधन नाही. या संस्थेमध्ये ’हो, हे तुम्ही नक्की करू शकता,’ हा विश्वास निर्माण केला जातो. येथील विद्यार्थ्यांना इंग्रजीचे धडे द्यायला ब्रिटन, सिंगापूर, मलेशिया, कॅनडाहून तज्ज्ञ मार्गदर्शक हजेरी लावतात, तर ’अस्पायर’च्या अनेक मुलांना विदेशात जाऊन शिकण्याची संधीही मिळाली आहे. त्यामुळे सर्वांसाठीच ’अस्पायर’ प्रेरणेचे केंद्र ठरलेय. अनेक हालअपेष्टा सहन करून अखेर यशाच्या अशा टोकावर पोहोचूनदेखील गावातल्या मातीशी प्रामाणिक असलेल्या सचिनला त्याच्या कामाबद्दल सलाम आणि शुभेच्छा.
 
 
- पूजा सराफ 
@@AUTHORINFO_V1@@