परिवर्तनाचा मंत्र घेऊन रजनीकांत राजकारणात !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Jan-2018
Total Views |
 
 
 
 
दक्षिणेतील जनतेवर चित्रपट क्षेत्रातील अभिनेते-अभिनेत्री यांचा फार मोठा प्रभाव आहे, हे सर्वविदित आहे. आंध्र प्रदेश, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू या राज्यातील काही चित्रपट कलाकारांनी आपली लोकप्रियता लक्षात घेऊन राजकारणात प्रवेश करून आमदारकी, खासदारकी मिळविली. काही मंत्रीही झाले. आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू या राज्यात जे अभिनेते राजकारणात उतरले होते त्यातील एन. टी. रामाराव, एम. जी. रामचंद्रन, जयललिता, सुप्रसिद्ध पटकथालेखक आणि फर्डे वक्ता असलेले द्रमुक नेते करुणानिधी यांनी त्या राज्याच्या राजकारणावर आपला प्रभाव तर पाडलाच, पण अनेक वर्षे सत्ता आपल्या ताब्यात ठेवली. आपल्या अंगभूत जादूने या कलाकारांनी जनतेला प्रभावित केले होते. प्रत्यक्ष जीवनातही हे कलाकार आपल्याला तारतील या भाबड्या समजुतीतून जनतेने भरभरून मते देऊन त्यांना निवडूनही दिले.
 
तामिळनाडूच्या राजकारणावर द्रमुक नेते एम. करुणानिधी, एम. जी. रामचंद्रन, जयललिता यांचा प्रभाव असल्याचे दिसून आले आहे. आज त्या तिघांपैकी एम. जी. आर. आणि जयललिता हयात नाहीत. असे असले तरी त्यांच्यावर प्रेम करणारी जनता मोठ्या संख्येने आहे. तामिळनाडूच्या राजकारणात द्रमुक आणि अण्णा द्रमुक हे प्रमुख पक्ष आहेत. आता त्या राजकारणात लोकप्रिय अभिनेता रजनीकांत यांनीही उडी घेण्याचा निर्णय घेतला आहे. रजनीकांत राजकारणात प्रवेश करणार असल्याची चर्चा काही काळापासून चालू होती. आपण राजकारणात प्रवेश करीत असल्याची घोषणा रजनीकांत यांनी रविवार, ३१ डिसेंबर रोजी केली आणि या चर्चेला पूर्णविराम दिला. रजनीकांत हे तामिळनाडूमधील अत्यंत लोकप्रिय अभिनेते. त्याचे चाहते प्रचंड. राजकारणातही ही चाहते मंडळी आपल्यामागे उभी राहतील, अशी खात्री असल्याने रजनीकांत यांनी राजकारणात उडी घेतली आहे.
 
रजनीकांत यांनी आपल्या पक्षाचे नाव अजून जाहीर केले नाही; तसेच पक्ष कोणत्या मार्गाने वाटचाल करणार हेही स्पष्ट केले नसले तरी रजनीकांत यांच्या राजकारण प्रवेशाने त्या राज्यातील राजकीय समीकरणे बदलत जाणार, हे मात्र नक्की. रजनीकांत यांच्याप्रमाणे अभिनेते कमल हसनही तामिळनाडूच्या राजकारणात सक्रिय राहण्याच्या दिशेने पावले टाकत आहेत. गेल्या ७ नोव्हेंबरला त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी, आपण राजकारणात प्रवेश केला असल्याची घोषणा कमल हसन यांनी केली. पण त्यापलीकडे काही ठोस असे त्यांच्याकडून घडले नाही. आता रजनीकांत यांनी राजकारण प्रवेशाची घोषणा केली आहे. तसेच आपला पक्ष पुढे काय करणार आहे, हेही स्पष्ट केले आहे. तामिळनाडू विधानसभेच्या २०२१ साली होणार्‍या निवडणुकीत सर्वच्या सर्व म्हणजे २३४ जागा लढविण्याची घोषणा रजनीकांत यांनी केली आहे, पण २०१९ साली होणार्‍या लोकसभा निवडणुकीबाबत, योग्य वेळी निर्णय घेण्यात येईल, असे सांगून त्यावर अधिक भाष्य करण्याचे टाळले.
 
आपल्या राजकारण प्रवेशाची घोषणा करताना, प्रत्येक गोष्टीत बदल करण्याची गरज असल्याचे तसेच ‘आध्यात्मिक राजकारण‘ आवश्यक असल्याचे रजनीकांत यांनी सांगितले. ‘आध्यात्मिक राजकारण म्हणजे जात, धर्म यास कसलाही थारा नसलेले पारदर्शी राजकारण,’ अशी रजनीकांत यांनी त्याची फोड केली!
 
’’मी कोणत्याही पदासाठी व मानमरातब मिळविण्यासाठी राजकारणात आलेलो नाही. मला या गोष्टी हव्या असत्या तर १९९६ मध्येच त्या मला मिळाल्या असत्या. सर्व राजकीय यंत्रणाच बदलायला हवी. लोकशाही भ्रष्टाचाराने लडबडली आहे. ती घाण काढून टाकण्याची गरज आहे. कठोर परिश्रम, प्रामाणिकपणा, जातपातविरहित राजकारण ही आपल्या पक्षाची ठळक वैशिष्ट्ये असतील,’’ असे रजनीकांत यांनी सांगितले.
 
रजनीकांत हा लोकप्रिय अभिनेता ६७ वर्षांचा आहे. त्यांचे मूळ नाव शिवाजी गायकवाड. जन्माने मराठी असलेल्या रजनीकांत यांनी स्वत:च्या कर्तृत्वावर तामिळ चित्रपटसृष्टीत आपला भक्कम जम बसविला. रविवारी आपल्या चाहत्यांपुढे बोलताना रजनीकांत म्हणाले, ’’गेल्या वर्षभरात राज्यात खूप काही घडले आहे. अन्य राज्ये आपल्याकडे बघून हसत आहेत. ही स्थिती लक्षात घेऊन राजकारण प्रवेश करून राजकीय पक्ष स्थापन करण्याचा निर्णय मी घेतला आहे. संपूर्ण यंत्रणेत परिवर्तन करण्याची गरज आहे. मी राजकारण प्रवेशाचा निर्णय आताच न घेतल्यास मी स्वत:ला दोषी समजेन. लोकशाहीच्या नावाखाली राजकारणी आपल्याच भूमीत, आपले पैसे लुबाडत आहेत. आपल्याला मुळापासून बदल घडविण्याची गरज आहे.
 
रजनीकांत यांनी राजकारणात प्रवेश करण्याची जी घोषणा केली, त्याचे अभिनेता कमल हसन यांनी स्वागत केले आहे. रजनीकांत यांनी सामाजिक दायित्व लक्षात घेऊन जो राजकारण प्रवेश केला आहे, त्याचे मी स्वागत करतो,’’ अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे. अमिताभ बच्चन यांनीही रजनीकांत यांच्या या कृतीचे स्वागत केले आहे. रजनीकांत यांच्या या निर्णयाचे द्रमुक, भाजपने स्वागत केले असले तरी भाजप नेते डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी मात्र त्यावर टीका केली आहे. स्वामी म्हणतात, ’’आणखी एक अभिनेता राजकारणात आला, पण त्याचा इतका गाजावाजा कशासाठी? तो अभिनेता आहे आणि भ्रष्टाचाराचे उच्चाटन करू शकू, असे तो म्हणतो. चित्रपट अभिनेते भ्रष्टाचार नष्ट करू शकतात? तामिळनाडूसाठी हा अभिनेता काय करणार? त्यांच्याकडे काही तपशील नाही वा कागदोपत्री माहिती नाही. तो अशिक्षित आहे. माध्यमांनी उगाच वारेमाप प्रसिद्धी दिली आहे. राजकारण समजण्याइतकी तामिळनाडूची जनता हुशार आहे,’’ अशी पुस्तीही त्यांनी जोडली. काही भाजप नेत्यांनी रजनीकांत यांच्या कृतीचे स्वागत केले असताना स्वामी यांचा वेगळा सूर न समजण्यासारखा आहे. रजनीकांत यांच्या पक्षाच्या रूपाने तामिळनाडूमध्ये मित्रपक्ष मिळाला, असे काही भाजप नेत्यांना वाटत आहे. तसे संकेतही काही वरिष्ठ नेत्यांनी दिले आहेत. गेल्या महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तामिळनाडू दौर्‍यादरम्यान रजनीकांत याची भेट घेतली होती. काही महिन्यांपूर्वी भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी, ’’रजनीकांत राजकारणात आल्यास आम्हाला आनंदच होईल,’’ असे म्हटले होते. तामिळनाडू भाजप अध्यक्ष तामिलीसाई सुंदरराजन यांनी रजनीकांत यांच्या निर्णयाचे स्वागत करताना, भ्रष्टाचारमुक्त सुशासन देण्याची जी घोषणा रजनीकांत यांनी केली आहे ती भाजपच्या ध्येयाशी मिळतीजुळती आहे, असे म्हटले आहे. दुसरीकडे, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते सीताराम येचुरी यांनी रजनीकांत यांच्या पक्षाची धोरणे काय, मुद्दे काय हे स्पष्ट करण्याची गरज आहे, असे म्हटले आहे.
 
रजनीकांत यांच्या राजकारण प्रवेशाच्या घोषणेने तामिळनाडूमधील द्रमुक, अण्णाद्रमुक या पक्षांपुढे आव्हान उभे राहणार आहे. जयललिता यांच्या निधनानंतर अण्णाद्रमुक पक्ष गटबाजीने त्रस्त आहे. असे असले तरी अण्णाद्रमुकचे मुख्यमंत्री के. पलानीस्वामी यांनी, ’’अण्णाद्रमुकचा पाडाव करणारा कोणी जन्मलेला नाही आणि पुढेही जन्मणार नाही,’’असे सांगून रजनीकांत यांच्या निर्णयास महत्त्व देत नसल्याचे दाखवून दिले आहे. एम. करुणानिधी, एम. जी. रामचंद्रन, जयललिता यांच्याप्रमाणे तामिळनाडूच्या राजकारणावर स्वत:ची पकड बसविण्यात रजनीकांत यशस्वी होतात का? ते भावी काळात दिसून येणार आहे.
 
 
- दत्ता पंचवाघ
 
@@AUTHORINFO_V1@@