जलप्रदुषणाच्या विरोधात पाण्याची शुद्धता तपासण्यासाठी जलमापक यंत्र

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Jan-2018
Total Views |


 
नाशिक : गोदावरी नदीतील प्रदूषण रोखण्याच्या दृष्टीने तसेच पाण्याची गुणवत्ता तपासण्यासाठी येत्या महिन्याभरात रामकुंडासह विविध पाच ठिकाणी जलमापक यंत्र बसविण्यात येणार आहे. गोदावरी संवर्धन विभागामार्फत ६३ लाख रुपयांची यंत्रणा पाण्याची शुद्धता तपासण्यासाठी खरेदी केली जाणार आहे.
 
गोदावरी गटारीकरणविरोधी मंचतर्फे उच्च न्यायालयात दाखल याचिकेनुसार न्यायालयाने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी मनपा प्रशासनाकडून केली जात आहे. त्यादृष्टीने एक एक उपाययोजना हाती घेण्यात आली आहे. गोदावरी नदी व परिसरातील प्रदूषण कमी होण्यासाठी मनपाने उपायुक्त रोहिदास दोरकुळकर यांची गोदावरी संवर्धन विभागाच्या अधिकारीपदी नियुक्ती केली आहे. याच कार्यालयामार्फत जलमापक यंत्र खरेदी करण्यात येणार आहे. त्यासाठी दोन वेळा बोलविण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेला प्रतिसाद न मिळाल्याने तिसर्‍यांदा निविदा प्रक्रिया राबविण्यात आली.
 
त्यात तीन निविदाधारकांनी सहभाग घेतला असून, येत्या आठ दिवसांत ही निविदा उघडण्यात येणार आहे. नदीपात्रात निर्माल्य यासह विविध प्रकारचा कचरा टाकला जातो. नदीत आंघोळ करणे, भांडी व कपडे धुणे तसेच वाहनेही धुतली जात असल्याने प्रदूषणावर नियंत्रण येऊ शकलेले नाही. गोदावरीतील पाण्यात बीओडीचे प्रमाणही अधिक आढळून येत असल्याने जलप्राण्यांचे जीवनही धोक्यात येत आहेत.
 
यामुळे पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण लक्षात येऊन त्यानुसार तत्काळ उपाययोजना करण्याच्या अनुषंगाने जलमापक महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्यासाठी रामकुंडावर पहिले जलमापक प्रायोगिक तत्त्वावर बसविले जाणार आहे. त्यानंतर महापालिकेच्या वतीने आणखी पाच ठिकाणी हे जलमापक बसविले जाईल.
@@AUTHORINFO_V1@@