प्रिंटींग इंडस्ट्रीमधला ‘दादा’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Jan-2018
Total Views |

 

१९५३चा काळ. भारताला स्वातंत्र्य मिळून पाचंच वर्षे झाली होती. जानेवारी महिन्यातील ती कोकणची थंडी. या थंडीच्या महिन्यात नुकताच मिसरुडं फुटलेला १७ वर्षांचा सदाशिव आपल्या तुळस गावातून निघाला. अंगावर धड कपडे नव्हते. सदाशिवला १५ किलोमीटर चालत जायचं होतं. सगळा जीव दोन्ही पायात उतरवून तो पायवाट चालायला लागला. बोट सुटायला नको. त्याचं ध्येय होतं मुंबई. मुंबईला जाणारी ती बोट. खरंतर बोट का म्हणावी, असा प्रश्न पडावा इतकी जीर्ण झालेली. पण, सदाशिवचं ज्याला सगळेचजण प्रेमाने ‘दादा’ म्हणत, त्या दादाचं तिकडे लक्षंच नव्हतं. बोटीत एका कोनाड्यात जागा मिळाली. बोट सुरु झाली. वेंगुर्ल्याहून ती गोव्याला, तिथून परत वेंगुर्ला आणि वेंगुर्ल्याहून मुंबईला निघाली. दोन दिवसांच्या प्रवासानंतर बोट भाऊच्या धक्क्याला लागली. जणू काही हा भाऊचा धक्का परुळकरांच्या दादाला म्हणत होता, ‘‘दादा, मुंबईत आलास. आता काहीतरी बनूनच दाखव!’’ काही वर्षांतच जीर्ण बोटीतून प्रवास करणारा दादा अलिशान बोटीतून दुबईची सफर करुन आला. ही कथा आहे प्रिटींग इंडस्ट्रीमधल्या खर्‍या ‘दादा’ची, दादा परुळकरांची.
दादाचे बाबा खंडाने शेती करत. ‘‘मुलं मोठी झाल्यावर जमीन तुझ्या नावावर करतो,’’ म्हणणार्‍या उच्चवर्णियांनी जमीन कधीच नावावर केली नाही. घरात पाच भावंडं. आर्थिक परिस्थिती अत्यंत बेताची. कुटुंबात मोठा असल्याने शिक्षण पण घेता आले नाही. कारण, शिक्षणापेक्षा पैसे कमाविणे हे खूप महत्त्वाचे होते. गावात एक रुपया रोजंदारीवर मजुरीसुद्धा केली. पण, त्यात काही भविष्य नव्हते. त्यामुळेच भविष्य घडविण्यासाठी मित्रासोबत दादा मुंबईला आला. मुंबईत आल्यानंतर सुद्धा लगेच नोकरी मिळाली नाही. जवळपास आठ महिने बेरोजगार म्हणूनच राहावे लागले. मुंबई आपल्याला काही लाभत नाही, आपलं गोव्याला गेलेलं बरं, असं वाटून दादा गोव्याला जाण्याच्या तयारीत होता. तेव्हा दादाच्या काकांनी सांगितले की, ‘‘आलायसंच मुंबईला तर मुंबईचे गणपती तरी बघून जा.’’ दादा थांबला. नेमकं हे थांबणं दादाच्या पथ्यावर पडलं. दादाला एका ऍसिड केमिकलच्या कंपनीत १ रुपया रोजंदारीवर नोकरी मिळाली. मात्र, ते कामअत्यंत धोक्याचं होतं. दादाने ते कामतीन महिन्यात सोडून दिलं. दादाला एका कोकणातल्या चाकरमान्याने प्रिटींग प्रेसमध्ये नोकरीस लावले. सव्वा रुपये पगार होता. अगदी मन लावून कामकेले. सुरुवातीला हेल्पर म्हणून नंतर मशीन चालवू लागला. ही नोकरी सोडली तेव्हा दादाला ४० रुपये पगार होता. यानंतर दादाने वरळीमध्ये एका प्रिटींग प्रेसमध्ये कामकेले. तब्बल १५० रुपये पगार होता. याचदरम्यान दादाची गाठ प्रिटींग इंडस्ट्रीमधल्या एका मोठ्या उद्योगपतीशी झाली. त्याने दादाच्या कामाविषयी ऐकले होते. त्या उद्योगपतीने खास जर्मनीहून मशिन्स मागवलेले. दादा अशा मशिन्स हाताळण्यात वाकबगार होता. त्या उद्योगपतीने दादाला थेट १००० रुपये पगाराच्या नोकरीची ऑफर दिली. दादा प्रामाणिकपणे कामकरु लागला. काही महिन्यानंतर एक अघटीत घडले. काही कारणास्तव मालकाने एका कामगाराला धक्काबुक्की करुन हाकलून दिले. चूक नसताना मारहाण केली म्हणून कामगारांनी संप केला. दादाचे मालक ऐकतो म्हणून दादाला मध्यस्थी करण्यास सांगितले. मात्र, दादाचे देखील मालकाने ऐकले नाही आणि कामगारांनी दादालाच नेतृत्व करण्यास सांगितले. श्रीफळाची शपथ घेऊन सगळ्या कामगारांनी दादाच्या पाठिशी उभे राहण्याचे वचन दिले. संप झाला. साडेचार महिन्यांनी मालकाने दादाला व कामगारांना बोलाविले. कामावरुन काढलेल्या कामगारांना न घेता इतरांना व दादाला कामावर घेण्याचे मालकाने मान्य केले. मात्र, १० जणांना कामावर घेतले नाही म्हणून दादाने ती नोकरी सोडून दिली. दादा परत बेकार झाला. पुढे नोकरी न करण्याची प्रतिज्ञा दादाने घेतली. दादाची पाचलेगावकर महाराजांवर फार मोठी श्रद्धा होती. महाराजांना दादाने नोकरी न करता व्यवसाय करण्याचे निश्चित केल्याचे सांगितले. महाराजांनी आशीर्वाद दिला. याच दरम्यान वडाळा येथे एक प्रिंटींग प्रेस बंद होती. त्याच्या मालकाने दादाला कोणी गिर्‍हाईक असल्यास प्रेस विकायची असे सांगितले. दादा एकाला घेऊन गेले. मालक १ लाखाखाली येत नव्हता, तर दादासोबत गेलेल्या गृहस्थांकडे फक्त ८५ हजारच होते. सौदा फिस्कटला. दादा जाण्यास निघाले. तेव्हा मालकाने दादाला जरा थांबण्यास सांगितले. मालकाने दादाला थेट विचारले, ‘‘तू का नाही प्रेस विकत घेत?’’ दादाला हसूच फुटले. मात्र, हसू आवरत म्हणाले, ‘‘माझ्याकडे एक लाख रुपये नाहीत.’’ मालक म्हणाला, ‘‘आता किती देशील? उरलेले हफ्त्याने कधी देशील?’’ दादा बोलले, ‘‘आता १० हजार रुपये देईन, उरलेले चार-पाच वर्षांत देईन.’’ दादा बोलले, ‘‘मात्र सुरुवातीचे सहा महिने मी काही देणार नाही. एकदा सेट झालो की त्यानंतरच देईल.’’ मालक तयार झाला.
हाच दादांच्या आयुष्यातला ‘टर्निंग पॉईंट’ ठरला. जास्मिन प्रेस दादांची झाली. सकाळी ८ ते रात्री ११ असे १६ तास कामदादांनी केले. त्यातूनच जास्मिन आर्ट प्रिंटर्स, जास्मिन प्रिंट पॅक प्रा.लि., परुळकर ग्रुप ऑफ कंपनीज असं प्रिंटींगमधलं ‘परुळकर संस्थान’ दादांनी उभारलं. दादा दर महिन्याला चाप ते पाच मोठे कन्टेनर्स भरुन प्रिंट पॅक्स परदेशी निर्यात करतात. ‘वॉलमार्ट’सारखा तगडा ग्राहक दादांचा आहे. सोबत रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडियासारख्या अनेक बँकांचे अहवाल, नियतकालिके दादांची कंपनी प्रकाशित करतात. निव्वळ कोटी रुपये मूल्य असलेले कागद कोठारात असतात. एका रंगापासून ते अगदी पाच रंगांपर्यंत जर्मनी व जपानी बनावटीच्या मशिन्स दादांच्या कंपनीत कार्यरत आहेत. २०० कामगारांना प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष रोजगार आज परुळकर ग्रुप पुरवितात. सध्या कंपनीची अंदाजे ३० कोटी रुपयांची उलाढाल आहे. कोकणी माणूस म्हटला की, तो सुखासीन असतो या समजाला दादांनी छेद दिला. प्रचंड मेहनत, जिद्द या जोरावर सध्या ८४ आयुर्मान असलेले दादा परुळकर आज प्रिंटींग इंडस्ट्रीमधले ‘दादा’ ठरले आहेत.

-प्रमोद सावंत
@@AUTHORINFO_V1@@