मनपा अंदाजपत्रक जानेवारीतच सादर होणार!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Jan-2018
Total Views |

 
नाशिक : महापालिका आयुक्तांची जानेवारी महिन्यातच अंदाजपत्रक सादर करण्याची योजना असल्याचे वृत्त आहे. फेबु्रवारी महिन्यात अंदाजपत्रक सादर केल्यानंतर स्थायी समिती त्याला आकार देते आणि त्यानंतर महासभेवर अंदाजपत्रक पाठविले जाते, परंतु ही प्रक्रिया पार पाडताना आयुक्तांचे अंदाजपत्रक अपुरे असल्याचा दावा करीत स्थायी समिती विविध प्रकारच्या उत्पन्नात वाढ सुचविते आणि त्या आधारे काही कोटींनी अंदाजपत्रक वाढविले जाते. महासभेतदेखील सर्वपक्षीय नगरसेवकांना सामावून घेण्यासाठी तसेच सत्तारूढ पक्षाच्या विविध योजना आणून आणखी उत्पन्नवाढीचे आकडे वाढवून त्यावर आधारित योजना आखल्या जातात, परंतु अखेरीस हा फुगा फुटतो. 

कित्येकदा तर आयुक्तांनी सादर केलेल्या अंदाजपत्रकानुसारही वार्षिक उत्पन्न मिळत नाही आणि त्यामुळेच सर्व अंदाज कोसळतात. चालू आर्थिक वर्षात म्हणजे २०१७-१८ या आर्थिक वर्षासाठी आयुक्तांनी १,४०० कोटी रुपयांचे अंदाजपत्रक सादर केले होते. ते स्थायी समितीने १,७९९.३० कोटी इतके फुगवले. महासभेत त्याचा आकार आणखी वाढला आणि ते २ हजार १७६ कोटी ४१ लाख इतके झाले. परंतु प्रत्यक्षात महासभेने दर्शविलेले मात्र सातशे कोटी रुपयांचे उत्पन्नच मिळणार नसल्याची चिन्हे आहेत. आयुक्तांनी व्यक्त केलेल्या अंदाजानुसार जेमतेम १,४०० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळेल. म्हणजे आयुक्तांचे अंदाजपत्रक खरे ठरण्याची शक्यता आहे. जानेवारी महिन्यात प्रशासन स्थायी समितीला सुधारित अंदाजपत्रक सादर करणार असून, त्यात ही आकडेवारी मांडण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
सुधारणा : दोन्ही अंदाजपत्रक एकदाच
 
महापालिकेचे अंदाजपत्रक हे गेल्या काही वर्षांपासून फेबु्वारी महिन्यात मांडतात. याच महिन्यात स्थायी समितीचे सोळापैकी आठ सदस्य निवृत्त होत असल्याने घाईघाईने सदस्य अंदाजपत्रक तयार करतात. यंदा तसे होऊ नये यासाठी स्थायी समितीचे सभापती शिवाजी गांगुर्डे यांनी २०१८-१९ या वर्षाचे अंदाजपत्रक जानेवारी महिन्यातच सादर करण्याच्या सूचना प्रशासनाला केल्या होत्या. त्यानुसार सरत्या वर्षाचे सुधारित अंदाजपत्रक आणि नव्या वर्षाचे अंदाजपत्रक एकाच वेळी मांडण्यात येणार आहेत.
@@AUTHORINFO_V1@@