गुप्तहेरांच्या अंधार्‍या जगात...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |
 
 
 
लेखक इयान फ्लेमिंग हा ‘जेम्स बॉंड’ या लोकप्रिय गुप्तहेर नायकाचा जनक. जेम्स बॉंड हा नायक चित्रपटांमुळे जगभर अत्यंत लोकप्रिय आहे. जेम्स बॉंडचे चित्रपट कायमच तुफान गल्ला गोळा करीत असतात. यशस्वी चित्रपटांचा सगळा मसाला त्यात ठासून भरलेला असतो. चित्रपटांनी जेम्स बॉंडला महानायक वास्तवाच्या पलीकडला सुपरहिरो बनवून सोडला आहे.
 
मुळात इयान फ्लेमिंगचा ‘बॉंड’ असा अतिमानुष नाही. तो माणूसच आहे. त्यालाही मानवी मन आहे. तो निराश होतो. पराभूतही होतो. त्याच्या आकलनाच्या पलीकडच्याही गोष्टी असू शकतात. तो फसूदेखील शकतो, पण कधीच पराभूत होत नाही. तो, त्याची जिद्द आणि या अफाट जिद्दीच्या जोरावरच तो जवळजवळ संपूर्णपणे निसटलेलं यश खेचून आणताना दिसतो.
 
बॉंडच्या या व्यक्तिरेखा निर्मितीच्या मागे स्वतः इयान फ्लेमिंगचा दांडगा अनुभव आहे. स्वतः फ्लेमिंग अनेक वर्षे ब्रिटिश शाही नौदलात सेवारत होता. दुसर्‍या महायुद्धाच्या काळात तो गुप्तहेर खात्यात काम करीत होता. त्यामुळे बॉंडच्या कादंबर्‍यांमध्ये त्याने चितारलेले प्रसंग हे त्याने स्वतः अनुभवलेले किंवा त्याच्या खात्यातल्या सहकार्‍यांच्या स्वानुभवावर आधारलेले आहेत. खुद्द बॉंडची व्यक्तिरेखा ही स्वतः फ्लेमिंग व त्याचे अनेक सहकारी मित्र यांची व्यक्तिमत्त्वं एकत्र करून तयार झालेली आहे.
 
फ्लेमिंगच्या एका बॉंड कादंबरीचं नाव आहे ‘मूनरेकर.’ यातला खलनायक हा फार मोठा शास्त्रज्ञ आहे. ब्रिटिश समाजात त्याला अतिशय मान आहे. त्याला ’सर’ ही पदवीदेखील मिळालेली आहे. आता तो ब्रिटनसाठी ‘मूनरेकर’ नावाचं अत्याधुनिक क्षेपणास्त्र बनवित आहे. सर्वसामान्य ब्रिटिश जनता तर त्यांच्यावर फिदा आहेच, पण ब्रिटिश गुप्तहेर कमांडर जेम्स बॉंड हा देखील त्याचा चाहता आहे. अशा स्थितीत बॉंडचे बॉस ’एम’ साहेब यांना काहीतरी बारीकशा कारणाने या शास्त्रज्ञांचा संशय येतो. ते बॉंडला त्याच्या मागावर सोडतात आणि मग बॉंडच्या डोळ्यांवरचं मोहपटल जेव्हा दूर होतं, तेव्हा तो आश्चर्याने वेडा होतो. पण, अशावेळी तो पूर्णपणे खलनायकाच्या तावडीत सापडलेला असतो.
 
मूनरेकर क्षेपणास्त्राची चाचणी समुद्रात करतो आहोत, असं दाखवून प्रत्यक्षात ते अण्वस्त्रधारी क्षेपणास्त्र खुद्द लंडन शहरावरच डागायचं आणि स्वतः सोव्हिएत रशियात पळून जायचं, असा त्या शास्त्रज्ञ खलनायकाचा जय्यत बेत असतो. बॉंडला त्याने केव्हाच नामोहरमकरून सोडलेलं असतं. पण, इथेच तो चुकतो. देशासाठी जीवाची बाजी लावणारी माणसं वाट्टेल ते करू शकतात, हे तो विसरतो. जिवावर उदार झालेला बॉंड खलनायकाच्या कैदेतून निसटून अगदी शेवटच्या क्षणी क्षेपणास्त्राची दिशा बदलतो. खलनायक ज्या सोव्हिएत जहाजातून पळून चाललेला असतो, त्यावरच क्षेपणास्त्र कोसळतं. लंडन बचावतं. लंडनच्या लक्षावधी नागरिकांना हे कधीच समजत नाही. प्राणांतिक जखमा झालेला कमांडर बॉंड इतर चार सामान्य प्रवाशांसारखाच विश्रांतीसाठी फ्रान्सला जातो.
 
इयान फ्लेमिंगच्या या चित्तथरारक कथेत शेवटी बॉंड आणि त्याचा देश विजयी होतात. या कथानकात अनेक सत्य आणि काल्पनिक घटनांची गुंफण असणारच, पण अखेर नायक विजयी होतो. जिवंत राहतो, प्रत्यक्षात असं घडतंच असं नाही. गुप्तहेराचं जीवन मोठं कठीणच असतं. यश मिळालं तरी प्रसिद्धी, कीर्ती, पैसा यातलं काहीही मिळत नाही. कारण कामगिरी गुप्त असते. खात्यातले लोक कौतुक करतात, बढती मिळते. खात्याशी संबंधित मंत्री खरा शहाणा असेल, तर त्याच्याकडून कौतुकाचे चार शब्द ऐकायला मिळतात. पण, अपयश आलं तर खात्याकडून मेमो मिळू शकतो. अर्थात, तो घेण्यासाठी हेर जिवंत राहिला पाहिजे. अपयशी मृतहेराच्या बायका-पोरांना तर काहीच मिळत नाही.
 
नुकताच ब्रिटनमधल्या अशा एका गूढ प्रकरणावरचा पडदा किंचितसा बाजूला झाला आहे. एप्रिल १९५६ मध्ये तत्कालीन सोव्हिएत सत्ताधारी निकिता कु्रश्चेव याने ब्रिटनला सदिच्छा भेट दिली होती. त्याकरिता रशियाच्या काही युद्धनौका ब्रिटनच्या पोर्टस्‌माऊथ बंदरात येऊन उभ्या होत्या. ब्रिटनचा एक ख्यातनामनौसेनिक कमांडर लायोनेल बस्टर क्रॅब हा त्यावेळी एकाएकी नाहीसा झाला. लोकांना एरवी ही घटना कधीच कळली नसती. पण, वृत्तपत्रांना कुठून तरी सुगावा लागला. कमांडर क्रॅबच्या एकाएकी नाहीसे होण्यावर मोठमोठे मथळे सजले. काहींनी असा तर्क लढवला की, ब्रिटिश गुप्तहेर संस्था ‘एम.आय ६’ करिता क्रॅब काम करीत होता. तसा तो आदल्याच वर्षी म्हणजे १९५५ साली रीतसरपणे नौदलातून निवृत्त झाला होता. पण, क्रॅब ही लहानसहान आसामी नव्हती. दुसर्‍या महायुद्धाच्या काळात पाण्याखालचे जहाजरोधक पाणसुरुंग शोधून ते निकामी करण्याच्या जीवघेण्या कामगिर्‍या यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल त्याला ‘जॉर्ज पदक’हा अत्यंत सन्माननीय पुरस्कार मिळालेला होता. या पराक्रमामुळेच नौदलातून निवृत्त झाल्यावर गुप्तहेर खात्याने त्याला उचलला. ‘एम.आय ६’ करिता काहीतरी कामगिरी पार पाडण्यासाठी कमांडर क्रॅब सोव्हिएत युद्धनौका नांगरून पडलेल्या पोर्टस्‌माऊथ बंदरात पाण्यात उतरला आणि नाहीसा झाला. काहींनी असा तर्क लढवला की, या सोव्हिएत युद्धनौकांचे तळ काही विशेष पाणसुरुंग रोधक बनावटीचे आहेत किंवा कसं याचा तलाल लावण्यासाठी क्रॅब पाण्यात उतरलेला असताना सोव्हिएत नाविकांनी त्याला पकडून बंदिवान केलं किंवा सरळ गोळी घातली. काहींनी तर इथपर्यंत तर्क बांधला की, क्रॅब हा दुहेरी हेर होता आणि आपलं हे बिंग काही कारणामुळे उघडकीस येणार, असा संभव दिसताच तो सोव्हिएत युद्धनौकांचा आश्रय घेऊन पळून गेला. वृत्तपत्रांमधल्या या चर्चेवर कोणत्याही सरकारी खात्याने कसलीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. विषय हळूहळू आपोआपच मागे पडला.
 
पण, वर्षभरानंतर तो एकदम जोरात उसळला. कारण पोर्टस्‌माऊथच्या किनार्‍यावर एक प्रेत वाहून आलं. त्याला मुंडकं नव्हतं. प्रचंड गदारोळ झाला. वृत्तपत्रांच्या पाठोपाठ संसदेतही सरकारला धारेवर धरण्यात आलं. त्यावर तत्कालीन पंतप्रधान अँथनी ईडन यांनी उत्तर दिलं की, कमांडर क्रॅबचा मृत्यू कसा झाला हे जाहीर करणं समाजहिताच्या विरुद्ध होईल. यावर कुणालाच काही बोलण्यासारखं शिल्लक राहिलं नाही.
 
आता कमांडर क्रॅब मृत्यू प्रकरणाच्या फाईल्स ‘डी-कमिशन्ड’ झाल्या आहेत. सरकारी गुप्त कागदपत्रं ठराविक वर्षानंतर खुली होतात. म्हणजे ती सर्वांना पाहायला मिळतात. या ठिकाणी थोडं विषयांतर करून सांगायचं म्हणजे, लंडनच्या इंडिया ऑफिस लायब्ररीत भारताविषयी अवाढव्य दस्ताऐवज आहेत. त्यापैकी कित्येक, विशेषत: क्रांतिकारकांविषयीचे काही दस्ताऐवज अगदी आजसुद्धा ‘डी-कमिशन्ड’ झालेले नाहीत म्हणजे गुप्तच आहेत. अर्थात, जे खुले आहेत ते अभ्यासायला तरी कोण लेकाचा जातोय? कुणाला एवढा वेळ आहे? लंडनला जायचं ते मौजमजा, नाच-गाणी, तमाशे करण्यासाठी! आणि लंडनची इंडिया ऑफिस लायब्ररीच कशाला, भारतातली कित्येक उत्तमोत्तमग्रंथालये आणि तिथले अनमोल, दुमीर्र्ळ दस्तऐवज यांच्याकडे तरी कोण वळतोय? ज्ञान कुणाला नकोच आहे. हवी आहेत पदव्यांची कागदी भेंडोळी. त्यातून मिळणारा पैसा नि कथित प्रतिष्ठा !
 
तर ते असो. कमांडर क्रॅबच्या मृत्यूवर प्रकाश टाकणारी जी काही कागदपत्रं खुली झाली आहेत, त्यावरूनही स्पष्ट असं काही समजत नाही. समजतं ते एवढंच की, १९ एप्रिल १९५६च्या रात्री पोर्टस्‌माऊथ बंदरात दक्षिणेकडच्या रेल्वे मालधक्क्यावरून, स्कूबा पाणबुड्याचा पोशाख चढवून कमांडर क्रॅबने पाण्यात उडी घेतली, तेव्हा नौदलाचा एक अधिकारी त्याच्याबरोबर होता. क्रॅब पाण्यात शिरल्यावर हा अधिकारी परतला. काही तासानंतर त्याला काहीतरी गडबड असल्याचा संदेश मिळाला. तो त्याने वरिष्ठांना कळवला. पण, सोव्हिएत राष्ट्राध्यक्षांच्या खास काफिल्यातल्या युद्धनौका उभ्या असलेल्या भागात उघडउघड शोध घेणं शक्यच नव्हतं. या वृत्तांतातल्या अनेक ओळी, नावं गाळून टाकण्यात आलेली आहेत. वर्षभरानंतर जेव्हा क्रॅबचं शिरविरहित प्रेत सापडलं, तेव्हा ते साहजिकच कॉरोनरकडे पाठविण्यात आलं. शवचिकित्सेनंतर कॉरोनरने ते कमांडर क्रॅबचंच असल्याचा निर्वाळा दिला. पण, मृत्यचं कारण नक्की सांगण्याबद्दल मात्र असमर्थता दर्शवली. सगळ्यात दु:खाचा भाग म्हणजे क्रॅबच्या पत्नीने जेव्हा भरपाई मागितली, तेव्हा नौदलाने चक्क कानावर हात ठेवले. त्यांनी सांगितलं की, क्रॅब आदल्या वर्षीच निवृत्त झाला नि त्यावेळेस त्याला त्याची सर्व सेवा रक्कमरीतसर मिळालेली होती. त्यामुळे आता त्याच्याशी आमचा कायदेशीर संबंध काहीही नाही. ‘एम. आय. ६’ कडून भरपाई मागण्याचा प्रश्र्नच नव्हता. कारण अधिकृतपणे असं कोणतंही खातंच अस्तित्वात नव्हतं.
 
प्रिय वाचक, मला वाटतं की आपण खूप हुशार आहात. आपण असंख्य गुप्त पोलीस कथा, गुप्तहेर कथा, तपास कथा नक्कीच वाचलेल्या असणार. अगदीच काही नाही तर गेला बाजार, आपण अनेक साहसपूर्ण हिंदी चित्रपट नक्कीच बघितले असणार. त्यामुळे वरील कमांडर क्रॅबच्या खर्‍याखुर्‍या साहसकथेतल्या रिकाम्या जागा आपण स्वत:च नक्कीच भरून काढू शकाल. मात्र, या कथेतला नायक अपयश घेऊन मेलेला आहे. कथा दु:खान्त आहे. कल्पना आणि वास्तव यात बरेचदा असा फरक असतो.
 
- मल्हार कृष्ण गोखले
@@AUTHORINFO_V1@@