माय मरो, मावशी जगो !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Jan-2018   
Total Views |
 
 
 
 
 
 
मराठी भाषेतल्या काही म्हणी फारच अतिरेकी वाटतात. ’माय मरो अन मावशी जगो’ ही म्हण अशीच अतिरेकी गटातली. ही म्हण मी लहानपणी जेव्हा पहिल्यांदा ऐकली तेव्हाच माझ्या मनात एक स्वाभाविक शंका आली की मावशी जगो, हे ठीक आहे पण त्यासाठी माय कशाला मरायला हवी ? अर्थात ’अतिशयोक्ती अलंकाराशी’ माझी ओळख नंतर झाली आणि एखाद्या गोष्टीची तीव्रता दर्शविण्यासाठी केलेली अशी अतिरेकी शब्दरचना त्यातला भाव अचूकपणे मांडते हेही त्यामुळे लक्षात आलं. शिवाय नात्याच्या आणि बिननात्याच्याही अनेक मावश्यांचे वात्सल्य प्रत्यक्षात अनुभवता आल्याने ही म्हण अगदीच चुकीची नाही हे देखील पटले. जनकल्याण रक्तपेढीमध्ये आल्यानंतर इथल्या मावश्यांची अर्थात मदतनीस म्हणून काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांची ओळख झाली आणि आधीच्या मावश्यांमध्ये आणखी दहा-बारांची भर पडली. यातल्या बऱ्याच जणी दीर्घ काळापासून इथे काम करणाऱ्या. त्यामुळे रक्तपेढीचे काम म्हणजे त्यांच्या दृष्टीने घरातल्या कामाइतकेच महत्वाचे असते. आपल्या घरात आपण नेहमीच पहातो की घरातली गृहिणी ही कायमच गृहित धरलेली व्यक्ती असते. मुलांचे आवरुन देणे, मुलांचा अभ्यास सांभाळणे, स्वयंपाक-धुणे इ. नित्यकर्मांच्या वेळा सांभाळणे, वडीलधाऱ्यांची काळजी घेणे, आल्या-गेल्यांचे आदरातिथ्य करणे अशा वर वर छोट्या वाटणाऱ्या पण अत्यंत महत्वाच्या कामांमध्ये गृहिणीची भूमिका किती महत्वाची असते, हे वेगळे सांगण्याची अजिबात गरज नाही. पण हे सर्व माहिती असूनही यातले एखादेच काम जेव्हा काही कारणाने होत नाही तेव्हाच गृहिणीची खरी किंमत लक्षात येते, हे सामान्यत: दिसणारे वास्तव आहे. रक्तपेढीला जर घराची उपमा दिली तर या मदतनीस मावश्या खऱ्या अर्थाने या घरातल्या गृहिणी आहेत. कारण खूप छोटी छोटी पण महत्वाची कामे त्यांच्याशिवाय तडीला नेताच येत नाहीत. रक्तदान शिबिराच्या वस्तुंची ने-आण, रक्तपेढीची अंतर्गत स्वच्छता, चहा – कॉफ़ीचे व्यवस्थापन, प्रयोगशाळेशी संबंधित छोटी-छोटी कामे अशा मुख्य कामांबरोबरच अन्यही अनेक किरकोळ कामांमध्ये मावश्या अखंड मग्न असतात.
 
 
एकदा रक्तपेढीच्याच कुठल्या तरी कार्यक्रमात सौ. विद्या देशपांडे यांनी एक आठवण सांगितली होती. वाडिया कॉलेजमध्ये तत्वज्ञानाच्या प्राध्यापिका म्हणून काम केलेल्या आणि सध्या कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या संचालिका असलेल्या विद्याताई रक्तपेढीच्या स्थापनेपासून रक्तपेढीच्या सर्व छोट्या-मोठ्या उपक्रमांशी जवळून संबंधित आहेत. विद्याताई म्हणाल्या, ’अगदी सुरुवातीच्या काळात जनकल्याण रक्तपेढी शनिवार पेठेत खडीवाले वैद्यांच्या इमारतीत तिसऱ्या मजल्यावर होती. त्या काळी रक्तसंकलनासाठी काचेच्याच बाटल्या वापरल्या जात. त्यामुळे रक्तदान शिबिरांतून या बाटल्या व्यवस्थित सांभाळून रक्तपेढीत आणणे आणि तिसऱ्या मजल्यावर चढवणे हे काम मोठ्या जिकिरीचे असे. पण हे कष्टाचे आणि कौशल्याचे कामही मावश्या हसत हसत पार पाडत असत.’ हे ऐकल्यानंतर त्यांच्या त्या वेळच्या कामांची मला कल्पना आली. आता नवीन जागेत लिफ़्ट आहे, काचेच्या बाटल्यांचाही काळ गेला. पण सर्व अवघड कामे मात्र संपली असे नाही. अजून देखील - रक्तदान शिबिराचे सामान गाडीत चढविणे, जनरेटर चालु करणे, जनरेटरचे पंपिंग करणे, उंचावरची कामे करणे अशी सामान्यत: पुरुषांच्या खाती असलेली कामेही वेळ पडल्यास या मावश्या सहजपणे निभावून नेत असतात.
 
 
प्रत्येक मावशीचा स्वभाव भिन्न आहे. कुणाच्या बोलण्यात नम्रतेची पराकाष्ठा असते तर कुणी कायम रणरागिणीच्या आवेशात असते, कुठे समजुतीचे स्वर ऐकायला मिळतात तर कुठे तांडवही पहायला मिळतो. पण असे असले तरी या सर्वांमध्ये एक समान सूत्र मला नेहमीच पहायला मिळाले आहे. ते सूत्र आहे सहृदयतेचे. नेहमी आवेशातच बोलणाऱ्या एखाद्या मावशी सतत धावपळीचे काम करणाऱ्या आणि मुलाच्या वयाच्या एखाद्या कर्मचाऱ्याला दम देत देतच चहा-सरबत घ्यायला लावतील, रक्तपेढीमध्ये क्वचित एखाद्या रक्तदात्याकडे हवे तसे लक्ष दिले गेले नाही तर ’मला हे अजिबात आवडलं नाही’ म्हणून रोखठोकपणे अधिकाऱ्यांसमोर बोलुन टाकतील किंवा काही चांगली गोष्ट घडली तर त्या गोष्टीचे अगदी भरभरुन कौतुकही करुन मोकळ्या होतील. सहृदयता सर्वांमध्ये आहेच, प्रत्येकीची प्रकट करण्याची पद्धत मात्र निराळी आहे. रक्तसंकलन, रक्तप्रक्रिया इ. तांत्रिक प्रक्रियांशी त्यांचा तसा संबंध येत नसला तरी इथे येणारा रक्तदाता आपला वेळ खर्च करुन, कुठल्याही अपेक्षेशिवाय, रुग्णशय्येवर असलेल्या आपल्याच बांधवांसाठी रक्तदान करतो आणि म्हणूनच तो आपल्यासाठी अतिमहत्वाचा आहे, याची मात्र सर्वच मावश्यांना पुरेपूर जाण आहे. ही जाण या रक्तदात्यांना कॉफ़ी/बिस्किट्स देत असताना किंवा क्वचित कुणाला त्रास झाल्यास त्याची सर्वतोपरी काळजी घेताना त्यांच्या देहबोलीतून सहजपणे स्पष्ट होत असते. सर्व मावश्यांची स्वभावप्रकृती भिन्न असली तरी इतरांची, विशेषत: रक्तदात्यांची काळजी घेण्याच्या बाबतीत मात्र कुठलीच मावशी अपवाद नाही. रक्तपेढीत आणि शिबिरांतून रक्तदान करुन गेलेले रक्तदातेही मावश्यांची मनापासून आठवण ठेवतात. एकदा एका रक्तदात्याने बाहेर रस्त्यात थांबून आमच्या एका मावशींना नमस्कार केला. या मावशींनीच सांगितल्यानुसार त्यांनीच त्याला ओळखले नाही आणि याचीही त्यांना खंत वाटत होती. हजारो रक्तदात्यांचे आतिथ्य या मावश्यांनी आजवर केले आहे, पण तरीही हे काम करताना त्यांच्या कामात ’सरकारी खाकीपण’ कधीच आलेले नाही. कारण अर्थातच ही सहृदयता.
 
 
आणखी एक खूप चांगली गोष्ट मावश्यांच्या बाबतीत पहायला मिळाली ती म्हणजे या सर्वांचा रक्तपेढीच्या सर्व वरिष्ठांशी असलेला मनमोकळा संवाद. रक्तपेढीचे संस्थापक सदस्य वैद्य प. य. खडीवाले ऊर्फ़ दादा, डॉ. शरदभाऊ जोशी, कै. आप्पासाहेब वज्रम, सध्या कार्यकारी विश्वस्त असलेले डॉ. अविनाश वाचासुंदर आणि अन्यही सर्व विश्वस्त तसेच रक्तपेढीचे माजी वैद्यकीय संचालक डॉ. दिलीप वाणी या सर्वांबद्दल मावश्यांच्या मनात अपार आदर आहे. याचे महत्वाचे कारण म्हणजे या सर्वांबरोबर त्यांचा खूप चांगला संवाद आहे. तो अर्थात दोन्ही बाजुंनी आहे. रक्तपेढीच्या वातावरणात सुरुवातीपासून मिळालेली सुरक्षितता आणि वरिष्ठांशी उत्तम संवाद या आधारावर यातील बऱ्याच मावश्यांनी अत्यंत प्रतिकुल परिस्थितींमध्ये आपली घरे सावरली आहेत, उभी केली आहेत. ही उत्तम संवादाची परंपरा आजही तशीच चालु आहे. सध्याचे रक्तपेढी संचालक डॉ. अतुल कुलकर्णी यांनादेखील गराडा घालुन आपल्या मागण्या ठेवण्याचा मोकळेपणा त्यांच्याकडे आहे. अन्यही सर्व डॉक्टर्स आणि अधिकारी यांनाही काळजीपोटी हक्काने चार गोष्टी सांगण्याचा अधिकार या सर्वांनी आपल्या निरंतर कष्टांतून मिळवला आहे.
 
  
कामामधील आव्हाने ही तर नित्याचीच असतात. अगदी अलिकडच्या काळात रक्तपेढीच्या समोरील उड्डाणपुलाचे काम चालु असल्याने मुख्य रस्ता सुमारे एक-दीड महिना बंद होता. हा कालावधी आमच्या दृष्टीने खूपच मोठा होता. कारण रक्तपेढीची शिबिरे जवळपास रोजच असतात. या रस्त्याच्या कामामुळे वरील पूर्ण कालावधीत आमची बस रक्तपेढीच्या पार्किंगपर्यंत येऊच शकत नव्हती. त्यामुळे या काळात शिबिराचे साहित्य साधारणपणे शंभरेक मीटर दूर उभ्या असलेल्या बसमध्ये नेऊन ठेवणे आणि शिबिरानंतर पुन्हा घेऊन येणे अशा अतिरिक्त कामाचा भार हा सर्वच कर्मचाऱ्यांवर अपरिहार्यपणे पडला. यावेळी डॉक्टरांपासून सर्वांनीच आपापल्या परीने हातभार लावला असला तरी सर्वाधिक कष्ट घेतले ते मावश्यांनीच. अर्थात हे सर्व करत असतानाही कुणाच्याही चेहेऱ्यावर कधीही वैताग दिसला नाही, हे खरोखरीच विशेष. अर्थात पुढे हा ’बॅड पॅच’ संपल्यानंतर शिबिरात जाणाऱ्या डॉक्टरांनीही याची दखल घेत सर्व मावश्यांना एक छानपैकी पार्टी दिली. पण डॉक्टरांना अशी पार्टी उस्फ़ूर्तपणे द्यावीशी वाटणे यामागेदेखील होते ते मावशी मंडळींचे कष्टच. या पार्टीवर त्यांचा अधिकार होताच.
आज जनकल्याण रक्तपेढीची पुण्यात एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे. शिबिरसंयोजक, रक्तदाते, देणगीदार या सर्वांनीच रक्तपेढीवर भरभरुन प्रेम केलेले असल्याने रक्तपेढीच्या कामाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढते आहे. या वृद्धीमध्ये अन्य सर्वांबरोबरच घरातल्या गृहिणीप्रमाणे always taken for granted असलेल्या या मावश्यांचेही मोलाचे योगदान आहे. रक्तपेढीने दिलेली सुरक्षितता, आत्मसन्मान, जिव्हाळा आणि आधार या सर्व गोष्टींची नित्य जाणीव या सर्वांना असते.
 
 
इतक्या वर्षांच्या प्रदीर्घ सहवासात रक्तपेढीने जसे रक्ताचे ’आपलेपण’ जपले आहे तसेच या मावश्यांनीही आपले ’मावशीपण’ टिकवून ठेवले आहे. हे ’आपलेपण’ असेच बहरत राहो आणि मावश्यांचे ’मावशीपण’ही चिरायु होवो !
 
 
- महेंद्र वाघ
@@AUTHORINFO_V1@@