हृदयातील भगवंत राहतो, हृदयातच उपाशी...!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Jan-2018
Total Views |

व्हॉटस्अ‍ॅप हा काही फार गांभीर्याने घेण्याचा प्रकार नाही. मात्र, आजकाल अशा अपराधी सुखांची रेलचेलच आपल्या आयुष्यात झालेली आहे. ती थांबविताही येत नाही अन् स्वीकारताही येत नाही. समाजमाध्यमांवर विखारी विचारवंतांचे व्यावसायिक ओरखडे पाडणे सुरू असते. त्यांना कुणालातरी आपल्या निष्ठा दाखवायच्या असतात. ही मंडळी मुलगा पाळण्यात निजला असताना, नाग मारून रक्ताळलेले तोंड धन्याला दाखविणार्‍या मुंगसासारखी असतात... हे मात्र खरे की, दरवेळी मुलाचे प्राण धोक्यात नसतातच आणि यांचे तोंडही नागाच्याच रक्ताने माखलेले नसते... असो. विषय तो नाही. व्हॉटस्अ‍ॅपच्या ग्रुपवर काही ठिकाणी अत्यंत निष्ठेने ग्रुप स्थापन करण्याचा उद्देश पाळण्यात येतो. अशाच एका कलावंतांच्या ग्रुपवर परवा विकास समुद्रे या व्यावसायिक अभिनेत्याबद्दल वाचनात आले. पुन्हा तेच... ते व्हॉटस्अ‍ॅप असल्याने चटकन त्यावर विश्वास बसला नाही, कारण आतावर अशोक सराफ, सचिन यांच्यासह अनेक कलावंतांचे अपघाती निधन झाल्याच्या बातम्या अगदी त्यांच्या कारसह समाजमाध्यमांवर भिरकावण्यात आल्या आहेत. दिलीपकुमार यांना तर श्रद्धांजल्याही वाहून झाल्या आहेत! त्यामुळे विकास समुद्रेंच्या बातमीवर विश्वास बसला नाही. नंतर मात्र दिलेल्या हॉस्पिटलच्या पत्त्यावरच काही मंडळी जाऊन आली आणि त्याला ब्रेन हॅमरेज झाल्याची ती बातमी वाईट असली तरीही खरी आहे, हे स्वीकारावे लागले. आता त्याला मदत करायला हवी, असे आवाहन करण्यात आले आहे...

गेल्या पंधरा दिवसांतली ही तिसरी पोस्ट असावी. समाजमाध्यमांवर आवाहन करण्यात आले आणि दुर्दैवाने या बातम्या मात्र खर्‍या निघाल्या. अमरावतीचा मुकुंद फणसळकर या तरण्या कलावंताच्या बाबतही खेदकारक असे वाचनात आले. ‘स्मरणयात्रा’, ‘नक्षत्रांचे देणे’ या कार्यक्रमातील एक गायक व ‘चैत्रबन’, ‘आनंदघन’, ‘आठवणीतली गाणी’ अशा अनेक लोकप्रिय कार्यक्रमांतील प्रमुख गायक मुकुंद फणसळकर हा सध्या अमरावती येथे अत्यंत हलाखीचे जीवन कंठत आहे... असे सांगणारी ती पोस्ट. त्यानंतर नाशकात काही मंडळींनी त्याच्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन केले. मधल्या काळात त्याचे काही व्यावसायिक आडाखे चुकले असतील. नंतर तो अमरावतीत गाण्याचे वर्ग सुरू करण्यासाठी परतला, पण त्यातही त्याला फटका बसला. आता अगदी घरभाडेही देऊ शकत नाही, मोबाईल रीचार्ज करायलाही पैसा नाही, अशी त्याची अवस्था असल्याचे सांगण्यात येत होते. ‘सारेगमप’ या कार्यक्रमाचा तो पहिला महागायक! दीनानाथ मंगेशकर शिष्यवृत्तीही त्याला देण्यात आली होती. या पोस्टमध्ये त्याचा ९८६००७०५५६ हा क्रमांकही देण्यात आला होता. त्याच्या बँक अकाऊंटचे डिटेल्सही देण्यात आले होते. मात्र, पुन्हा तेच. या माध्यमाची विश्वासार्हता आम्हीच मातीमोल केली आहे. त्यामुळे कुणी एकदम त्यावर विश्वास ठेवत नाही. फोन केल्यावर एखाद्या कलावंताला अशी मदत मागणे फार लाजिरवाणे वाटते, तेही समजून घ्यायला हवे.

तिसरी घटना... लिहिणार्‍याने नीट लिहिले आहे. ते काही प्रमाणात त्याच्याच भाषेत- ‘काल मुंबईतील आकाशवाणी आमदार निवासच्या लिफ्टशेजारी एक म्हातारी बसलेली दिसली. मला वाटलं, कदाचित गोंधळून म्हातारी पत्ता विसरली असेल म्हणून तिला काही मदत करता येईल यासाठी तिच्याकडे चौकशी केली. परंतु, ज्या वेळी तिच्याबद्दल माहिती जाणून घेतली त्या वेळी आश्चर्याचा मोठा धक्काच बसला. कारण ती म्हातारी कोणी साधारण व्यक्ती नव्हती तर... ‘धुमधडाका’ या सुपरहिट मराठी चित्रपटातील ‘वख्खा विख्खी वुख्खू’फेम अशोक सराफ यांची प्रियत्तमा (नायिका) होती! ऐश्वर्या राणे त्या. अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोबत त्यांनी काही चित्रपटांत नायिका रंगविली आहे. ‘शराबी’, ‘नमक हलाल’ यांसारख्या हिंदी चित्रपटात त्यांनी भूमिका केली आहे. अमिताभ बच्चन, परबीन बाबी, निळू फुले, जयश्री गडकर यांसारख्या दिग्गज कलाकारांसमवेत त्यांनी सहायक कलाकार म्हणून काम केले आहे. दुर्दैवाने त्यांची कारकीर्द ऐन बहरात असताना अमिताभ बच्चन यांच्या ‘मर्द’ या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान घोड्यावर पडून त्यांचा मोठा अपघात झाला.

यामध्ये त्यांच्या पाठीचे हाड मोडल्याने कारकीर्दीला ब्रेक लागला. त्या उपचारासाठी त्यांना मुंबईतील त्यांची संपत्ती विकावी लागली. पुढे हाती काम न राहिल्याने आणि नातेवाईकांनीही पाठ फिरविल्याने नियतीने त्यांच्यावर हलाखीची परिस्थिती आणली आहे...एकेकाळी प्रभावळीत असलेली ही अभिनेत्री आता कोकणातील सावंतवाडी येथे भाड्याच्या घरात राहते...

या कलावंतांबद्दल वाचताना अनेक कलावंतांच्या बाबतच्या अशाच घटना आठवल्या. अगदी मास्टर भगवान यांच्यापासून दुर्लक्षित अवस्थेत मरून पडलेल्या ललिता पवार यांच्यापर्यंत अनेकांवर अशी वेळ आल्याचे स्मरत गेले आणि मग खूपसारे सवाल डोके पिंजून काढत गेले.

अशा वेळी या कलावंतांना सरकारने मदत करायला हवी, असे मत नोंदविले जाते आणि मग सरकार कसे बेफिकीर आहे, संस्कृतीच्या बाबत ते कसे चंगेजखानी वृत्तीचे आहे, अशी मस्तपैकी टीका करता येते. ती केलीही जाते. सरकारने मदत करायलाच हवी, हे खरेच आहे. अखेर सरकार हे जनतेचे प्रतिनिधित्वच करत असते. आता या राणेबाईंनाही महाराष्ट्र सरकारच्या वतीने ‘क’ श्रेणी कलावंतांना देण्यात येणारी पेन्शन देण्यात येते. त्यांना ‘अ’ श्रेणीची किमान २१०० रुपये महिना पेन्शन मिळावी, अशी त्यांची मागणी आहे... या पोस्टची देखील सत्यासत्यता तपासून पाहण्यात आली. बाईंचा मोबाईल क्रमांक देण्यात आला होता. (८६०५९८८३२१) त्यावर संपर्क साधल्यावर त्या बोलतात, मात्र कधीकाळी तालेवार अभिनेत्री म्हणून स्वत:ची प्रभावळ असलेल्या त्यांना याचकाची ही भूमिका लाजिरवाणी वाटत असल्याचे जाणवत राहते.

या समोर आलेल्या काही घटना आहेत. ते व्यावसायिक कलावंत होते आणि त्यांच्या या कलाव्यवसायात त्यांना अपयश आले, तर समाजाने त्यांचा भार का उचलायचा, हा सवाल केला जाऊ शकतो आणि केलाही जातो. त्यात तथ्य नसतेच असेही नाही. व्यावसायिक कलावंत म्हणून आधीच्या काळात फार पैसा मिळत नव्हता, मात्र आता तो मिळतोही. त्यांनी पैशांचे नीट नियोजन करायला हवे... हे सगळेच खरे असले, तरीही ते सामान्य पांढरपेशा गणितांमध्ये बसणारे सत्य आहे, कलावंतांसाठी नाही. तिथे सारेच बेभरवशाचे असते. अचानक काही झाले तर सगळेच हातून निसटून जात असते. कलावंत सोडून बाकी सारेच (निर्माते, आयोजक, प्रायोजक) व्यवसायच करत असतात. कलावंताची अवस्था मात्र फुलांच्या झाडासारखी असते. फुलांचे घोस हा त्या झाडाचा सोस नसतो. तो ते वागवितो. त्याचा समाजाला आनंद मिळतो. कलावंत ही समाजाचीच जबाबदारी असली पाहिजे. त्यांना त्यांच्या सर्व कळांनी सांभाळणे म्हणजेच सुसंस्कृतपण आहे. माधव गडकरींना शांताबाई हुबळीकर या एका वृद्धाश्रमात भेटल्या. ‘माणूस’ या चित्रपटाच्या नायिका. ‘आता कशाला उद्याची बात...’ हे गाणे गाजलेले. कधीकाळी तमाशात असताना गोण्यात नोटा भरणारी ही बाई, घरच्यांनी आणि बाहेरच्यांनीही ओरबाडली आणि वृद्धाश्रमात टाकून दिली होती... कलावंत हे नक्षत्रांचेच देणे असते. व्यावसायिक असले तरीही खर्‍या अर्थाने त्यांचा व्यवहार ‘नरहरी सोनारा’चाच असतो! त्यांच्या कलेला दाद मिळाली की त्यांना बिदागी मिळाल्याचे समाधान लाभत असते. त्यांच्या भरोशावर व्यवसाय करणारे कोट्यवधीने कमावून घेत असतात. रसिकांनाही मिळणारा आनंद हा अनेक पिढ्यांना पुरणारा असतो. चार-दोन पैशांच्या व्यवहारात साकारलेले अनंत काळासाठी अमूल्य असेच असते. मुळात आपल्याला किंमत आणि मूल्य यांतला फरकच कळलेला नाही, त्यामुळे आम्ही चिरंतन आणि अमूल्य अशा कलाविष्काराची किंमत चांदीच्या चंद चमकत्या काही तुकड्यांमध्ये करत असतो. कला स्वस्थ असली तर समाजही सुदृढ असतो. कलावंत हा काळजातला भगवंत आहे. तो कला प्रसवतो तेव्हा त्याने काही समाजाची परवानगी घेतलेली नसते, काही करार केलेला नसतो, हे जितके खरे आहे तितकेच हेही खरे आहे की, त्याच्या कवितेचा, गाण्याचा, नृत्याचा, चित्रांचा... आनंद आपल्या असंख्य पिढ्या घेतात तेव्हा याचे आम्ही काही देणे लागतो का, असे विचारायला त्याच्याकडे जात नाही. बर्‍याचदा तर त्या कलावंताचे नावही माहिती नसते... काळजातल्या या भगवंताला उपाशी ठेवण्याचा करंटेपणा आम्ही करायचा का?


-श्याम पेठकर
@@AUTHORINFO_V1@@