मोदी यांची लोकप्रियता भारतातच नाही, तर जगातही!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Jan-2018
Total Views |

जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेत्यांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसरे स्थान मिळवल्याची बातमी सर्व भारतीयांच्या दृष्टीने आनंददायी आणि अभिमानास्पद म्हणावी लागेल. याच काळात न्यायव्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगण्याचे खळबळजनक प्रकरण समोर आल्यामुळे, जागतिक महत्त्वाची ही बातमी काहीशी दबून गेली. भारतीय माध्यमांमध्ये या बातमीला पाहिजे तसे महत्त्वाचे स्थान मिळाले नाही, ही अतिशय खेदाची बाब आहे.

देशातील सर्व विरोधी पक्ष आणि त्यांचे नेते मोदी यांच्या नावाने रात्रंदिवस शंख करत असताना; तसेच मोदी यांच्या लोकप्रियतेला ओहोटी लागली असल्याचा दावा करत असताना, मोदी यांची लोकप्रियता फक्त भारतातच नाही, तर जगातही असल्याचे या सर्वेक्षणाने दाखवून दिले आहे. विशेष म्हणजे हे सर्वेक्षण गॅलप इंटरनॅशनलसारख्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील एका प्रतिष्ठित संस्थेने केले असल्यामुळे, मोदी यांनी ते मॅनेज केले, असे म्हणायचीही सोय नाही! अन्यथा मोदी यांच्या विरोधकांनी तसा आरोप करायलाही मागेपुढे पाहिले नसते!

गॅलप इंटरनॅशनल ही प्रतिष्ठित अशी आंतरराष्ट्रीय संस्था ४० वर्षांपासून जगातील ५५ देशांत सर्वेक्षण करून, जगातील सर्वाधिक लोकप्रिय अशा १२ नेत्यांची यादी जाहीर करत असते. विशेष म्हणजे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, चीनचे अध्यक्ष शि जिनपिंग, रशियाचे ब्लादिमिर पुतीन, ब्रिटनच्या थेरेसा मे आणि सध्या भारत दौर्‍यावर असलेले बेंजामिन नेतान्याहू यांना मागे टाकत नरेंद्र मोदी यांनी या यादीत तिसरे स्थान मिळवले आहे. या सर्वेक्षणात पहिल्या स्थानावर फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रोन, तर दुसर्‍या स्थानावर जर्मनीच्या चॅन्सलर अ‍ॅन्जेला मेरकेल या आहेत. ऑक्टोबर-डिसेंबर २०१७ या काळात गॅलप इंटरनॅशनलने जगातील प्रमुख अशा ५० देशांतील ५३,७६९ लोकांशी संपर्क करत जगातील लोकप्रिय नेत्यांचा आढावा घेतला. यात प्रत्येक देशातील सरासरी एक हजार लोकांशी संपर्क साधण्यात आला. यात मोदी यांची लोकप्रियता भारतातच नाही, तर भारतीय उपखंडातही असल्याचे दिसून आले.

भारतात पंतप्रधान नरेंद्र मोदींची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. आजवर एवढी लोकप्रियता भारतात तरी अन्य कोणत्याही नेत्याला मिळाली नाही. प्रतिस्पर्धी राजकारण्याला हेवा वाटावी एवढी लोकप्रियता मोदी यांनी आपल्या कर्तृत्वाने, नेतृत्वाने आणि वक्तृत्वाने मिळवली आहे. २०१४ मध्ये पंतप्रधान म्हणून विराजमान झाल्यानंतर मोदी यांच्या लोकप्रियतेचा आलेख सतत उंचावत राहिला आहे. मोदी यांच्या या लोकप्रियतेचीच देशातील विरोधी पक्षांनी आणि त्यांच्या नेत्यांनी धास्ती घेतली आहे. या नेत्यांची स्थिती सांगताही येत नाही आणि सहनही करता येत नाही, अशी झाली आहे. त्यामुळे ऊठसूट नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करून हे नेते आपल्या तोंडाची वाफ गमवत आहेत. मोदी मात्र आपल्या टीकाकारांकडे दुर्लक्ष करत आपला लोककल्याणकारी अजेंडा राबवत आहेत. ‘हाथी चले बाजार तो .. .. हजार’ या उक्तीप्रमाणे मोदी या टीकेकडे दुर्लक्ष करत आतापर्यंत आपली वाटचाल करत आले आहेत. मोदी यांची ही शैलीच भारतीय जनतेला मनापासून भावली आहे. मोदी यांच्या लोकप्रियतेचे रहस्य त्यांच्या कार्यशैलीत दडले आहे.

मोदी यांना जशी दैवदुर्लभ लोकप्रियता लाभली तेवढेच विरोधकांच्या कठोर प्रहारांनाही त्यांना सामोरे जावे लागत आहे. कदाचित मोदी यांच्या या लोकप्रियतेत त्यांच्या विरोधकांचेही तेवढेच योगदान असावे, असे म्हटले तर ते चुकीचे ठरू नये. कारण विरोधक मोदी यांच्यावर जेवढ्या ताकदीने तुटून पडतात, तेवढी मोदी यांची लोकप्रियता वाढत असते. पंतप्रधान झाल्यावरच मोदी यांच्यावर टीकास्त्र सुरू आहे, असे नाही. विरोधकांच्या टीकेचा नरेंद्र मोदी यांना, ते गुजरातचे मुख्यमंत्री असल्यापासूनच सामना करावा लागत आहे.

राजकारणात असलेल्या व्यक्तीला विरोधक असतात, त्यांच्या निर्णयावर, कृतीवर आणि धोरणावर टीकाही केली जाते. यात गैर असे काही नाही. मात्र विरोधकांनी टीका करतानाही संयम, सभ्यता आणि शालीनता पाळली पाहिजे. विरोधक नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करत नाहीत, तर अक्षरश: तुटून पडतात! मोदी यांच्यावर टीका करताना संयम, सभ्यता तसेच शालीनतेचा विरोधकांना जणू विसर पडतो. त्यामुळे ‘मौत के सौदागर’पासून अनेक असंसदीय शब्दांचा वापर मोदी यांच्यावर टीका करताना केला गेला. विरोधक मोदी यांच्यावर जेवढी टीका करतात, तेवढेच मोदी यांचे नेतृत्व उजळून निघते.

मोदी यांच्या लोकप्रियतेमुळेच भाजपाने २०१४ च्या लोकसभा निवडणुकीपासून आतापर्यंत जेवढ्या विधानसभा निवडणुका झाल्या, त्यात बिहार आणि पंजाबचा अपवाद वगळता कोणत्याच राज्यात पराभवाचे ताोंड पाहिले नाही. प्रत्येक राज्यात भाजपाच्या जागा आणि मतांच्या टक्केवारीत लक्षणीय वाढ होत गेली. त्यामुळे आज देशातील १९ राज्यांत भाजपाची वा मित्रपक्षांची सरकारे आहेत. १९८४ मध्ये लोकसभेत फक्त दोन जागा जिंकणार्‍या भाजपाचा प्रवास २०१४ मध्ये स्वबळावर २८२ पर्यंत गेला! हे फक्त नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेमुळेच शक्य होऊ शकले. भाजपा स्वबळावर २८२ पर्यंत पोहोचेल, याची स्वप्नातही कुणी कल्पना केली नव्हती, मात्र मोदी यांनी ते करून दाखवले.

नरेंद्र मोदी यांनी आपल्या नेतृत्वाने आधी भारतीय जनतेच्या अपेक्षा उंचावल्या आणि नंतर आपल्या कर्तृत्वाने त्या पूर्णही केल्या. सामान्यपणे कोणत्याही नेत्याची लोकप्रियता पहिले दोन वर्ष असते, त्यानंतर तिसर्‍या वर्षापासून लोकप्रियता घसरायला लागते, कारण तोपर्यंत लोकांचा अपेक्षाभंग होणे सुरू झाले असते. मात्र, मोदी यांच्या बाबतीत असे काही झाले नाही. उलट, आता मोदी सरकारला येऊन जवळपास चार वर्षांचा कालावधी पूर्ण होत आहे, मात्र यानंतरही मोदी यांच्या आणि त्यांच्या लोकप्रियतेत कोणतीही घट झाली नाही. उलट, त्यांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे.

विशेष म्हणजे या काळात मोदी यांनी घेतलेले सर्वच निर्णय लोकप्रिय स्वरूपाचे आणि जनतेला खुष करणारे होते, असे नाही. नोटबंदी तसेच जीएसटीसारख्या त्यांच्या काही निर्णयाने सुरुवातीला जनतेलाही त्रास झाला, पण मोदी यांचे हे निर्णय दीर्घकालीन देशहिताचे आहेत, त्यामुळे या निर्णयांमुळे सुरुवातीला झालेला त्रासही जनतेने आनंदाने सहन केला. कारण मोदी जो निर्णय घेतील, तो देशहिताचाच राहील, देशाच्या आणि देशातील जनतेच्या विरोधात कोणताही निर्णय मोदी घेणार नाहीत, याची देशातील जनतेला खात्री होती.

आजपर्यंत देशात अनेक पंतप्रधान होऊन गेले, या नेत्यांची लोकप्रियताही काही कमी नव्हती. पण, मोदी यांच्या सभेत त्यांचे आगमन होताक्षणी जशा मोदी... मोदी...च्या घोषणा सुरू होतात, तशा आतापर्यंत अन्य कोणत्याही नेत्याच्या सभेत झाल्या नाही! ही बाब मोदी यांची लोकप्रियता दर्शवण्यासोबतच भारतीय जनमानसावर त्यांचे कसे गारूड आहे, हेही दाखवणारी आहे.

मोदी यांच्या कामाचा झपाटा आणि आवाका तर थक्क करणारा आहे. दिवसातील जवळपास २० तास मोदी अव्याहतपणे काम करत असतात आणि सकाळी ६ वाजता ते जेवढे फ्रेश आणि उत्साहाने सळसळले असतात, तेवढेच रात्री दोन वाजता शेवटच्या बैठकीत प्रसन्नचित्त असतात. विशेष म्हणजे हा प्रकार २४ बाय ७ सुरू असतो. त्यामुळे मोदी झोपतात केव्हा आणि किती, असा प्रश्न सर्वांनाच पडत असतो. फक्त त्याचे उत्तर मोदी यांनाच माहीत आहे. त्यामुळे व्यंकया नायडू यांनी उपराष्ट्रपती होण्याआधी म्हटलेले ‘‘मोदी ही दैवी देणगी आहे,’’ हे वाक्य खरे वाटते. आचार्य अत्रे आज असते तर त्यांनी नक्की म्हटले असते- ‘‘नरेंद्र मोदींसारखा पंतप्रधान मागील दहा हजार वर्षांत झाला नाही आणि पुढील दहा हजार वर्षांत होणार नाही!’’


श्यामकांत जहागीरदार
९८८१७१७८१७   
@@AUTHORINFO_V1@@