दुर्मिळ ग्रंथांच्या डिजिटायजेशनचे काम सुरु

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Jan-2018
Total Views |

 
 
पुणे : शतकोत्तर दशकपूर्तीचा टप्पा पार केलेल्या आणि महाराष्ट्रातील आद्य साहित्य संस्था असा नावलौकिक असलेल्या महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या (कै.) वा. गो. आपटे संदर्भ ग्रंथालयातील दुर्मीळ ग्रंथांच्या डिजिटायजेशनचे काम सुरु झाले आहे. १८०० सालापासूनच्या दुर्मीळ ग्रंथांचा त्यात समावेश आहे. या कामासाठी भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिरानेही सहभाग घेतला आहे. या ग्रंथांचे डिजिटायजेशन पूर्ण झाल्यानंतर मसाप संकेतस्थळावरील ई-ग्रंथालयात हा अनमोल ठेवा वाचकांसाठी, संशोधकांसाठी आणि अभ्यासकांसाठी उपलब्ध होणार आहे, अशी माहिती परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी दिली. 
 
प्रा. जोशी म्हणाले, "महाराष्ट्र साहित्य परिषदेचे वैभव असलेले (कै.) वा. गो. आपटे संदर्भ ग्रंथालय नेहमीच संशोधकांच्या आणि अभ्यासकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू राहिलेले आहे. ५०,००० हून अधिक मौलिक संदर्भग्रंथांनी समृद्ध असलेल्या या ग्रंथालयात साहित्यप्रेमी वाचकांबरोबरच स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचा नेहमीच राबता असतो. दोनशे-अडीचशे वर्षांपूर्वीचे दुर्मिळ ग्रंथ हाताळणे जिकिरीचे झाले होते. हा अनमोल ठेवा जतन करण्यासाठी परिषदेच्या कार्यकारी मंडळाने या दुर्मीळ ग्रंथाचे डिजिटायजेशन लोकसहभागातून करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला असे जोशी म्हणाले.
 
 
 
कै. वा. गो. आपटे संदर्भ ग्रंथालयाचा इतिहास -
परिषदेचे संस्थापक चिटणीस कै. वा. गो. आपटे यांच्या नावाचा 'वा. गो. आपटे इस्टेट ट्रस्ट' सदाशिव पेठेत होता. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे तत्कालीन कार्याध्यक्ष श्री. म. माटे यांनी त्या ट्रस्टच्या विश्वस्तांशी संपर्क साधून १९४९ साली १०,००० रुपयाची देणगी मिळवली, ट्रस्टच्या अटीनुसार आपटे यांच्या स्मरणार्थ संदर्भ ग्रंथालय उभारण्यात आले. १९५१ च्या मे महिन्यात वा. गो. आपटे संदर्भ ग्रंथालयाची प्रतिष्ठापना झाली. या ग्रंथालयातून दुर्मीळ आणि संदर्भात्मक ग्रंथ सोडून कोणतेही पुस्तक सभासदांना घरी वाचण्यासाठी दिले जाते. दुर्मीळ ग्रंथांचे डिजिटायजेशन करण्यासाठी परिषदेने सुरु केलेल्या 'ग्रंथ दत्तक योजनेला' साहित्यप्रेमींनी भरघोस प्रतिसाद द्यावा असे आवाहन प्रा. मिलिंद जोशी यांनी केले आहे.
@@AUTHORINFO_V1@@