ज्येष्ठांच्या सभागृहातील सरस्वतीपुत्र...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Jan-2018
Total Views |

विधान परिषदेचे माजी सभापती आणि भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष प्रा. ना. स. फरांदे यांचे मंगळवारी सकाळी पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. ते ७८ वर्षांचे होते. आपल्या अभ्यासू, साहित्यिक शैलीसाठी तसेच अमोघ वक्तृत्वासाठी ते खासकरुन सुपरिचित होते. राज्यातील भाजपच्या जडणघडणीत फरांदे यांचे मोठे योगदान असून १९९१ ते १९९५ या कालावधीत ते भाजपचे प्रदेशाध्यक्ष होते, तर १९९८-२००४ या कालावधीत त्यांनी विधान परिषदेचे सभापतीपद भूषविले. अशा या प्रतिभासंपन्न आणि आपलुकीने संवाद साधणार्‍या फरांदे सरांच्या आठवणींना उजाळा देणारा हा लेख...
विधान परिषदेचे माजी उपसभापती वसंतराव डावखरे यांच्यापाठोपाठ माजी सभापती प्रा. ना. स. फरांदेही गेले. सन २०१८ या नववर्षाचा प्रारंभ अशा दु:खद घटनांनी व्हावा, हे खरोखरच क्लेशदायक. ‘ज्येष्ठांचे सभागृह’ अशी ओळख असलेल्या विधान परिषदेमध्ये १९८६ साली फरांदेसरांनी नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघातून प्रवेश केला. विधान परिषद सदस्य, १९९४ ते १९९८ उपसभापती आणि १९९८ ते २००४ या कालावधीत सभापती असा त्यांच्या कारकीर्दीचा प्रवास संसदीय लोकशाहीच्या अभ्यासकांसाठी अनेक दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे. एम. ए मराठी आणि संस्कृतमध्ये सुवर्णपदक प्राप्त करणार्‍या फरांदेसरांचे आवडीचे क्षेत्र म्हणजे अध्यापन. म्हणूनच तर ते प्राध्यापकी आणि प्राध्यापकांच्या आंदोलन कार्यात प्रारंभी रमले. आणीबाणीविरोधी आंदोलनानंतर जनता पक्षाच्या माध्यमातून ते राजकारणाकडे ओढले गेले.
 
महाराष्ट्रातील विधान परिषदेचे सभागृह खरोखरच वैशिष्ट्यपूर्ण आहे. घटनात्मक तरतुदीनुसार विधानसभा ठरावाद्वारे नव्याने विधान परिषद हे सभागृह निर्माणही करू शकते आणि अस्तित्वात असलेले सभागृह ठरावाद्वारे बरखास्तही करू शकते. दक्षिणेच्या राज्यात असे अनेकदा घडले आहे. महाराष्ट्रात मात्र अस्तित्वात आल्यापासून या सभागृहाची उपयुक्तता लक्षात घेता, हे सभागृह कधीही बरखास्त झालेले नाही. फरांदेसरांचे यासंदर्भातील विश्लेषण त्यांच्या सुंदर मराठीत ऐकणे हा खरोखरच संस्मरणीय अनुभव असायचा. प्राध्यापकी पेशामुळे विषयाची अत्यंत सुस्पष्ट मांडणी आणि संस्कृतोद्भव मराठी शब्दांचा नेमका वापर श्रोत्यांना बांधून ठेवायचा. अध्यापन आणि शेती या आवडीच्या क्षेत्रांतील संदर्भ त्यांच्या व्याख्यानात नेहमी यायचे.
 
स्वभाव शीघ्रकोपित्वाकडे झुकलेला असला तरी निवेदनशैलीत अनेकदा नर्मविनोदही असायचा. सभागृह कामकाजाचे संचालन करताना त्यांचे व्यक्तित्व दोन्ही बाजूंना आश्वासक वाटायचे. मी विधान परिषद कामकाजाचे पत्रकार म्हणून वार्तांकन करीत असतानाचा प्रसंग. त्या दिवशी प्रश्नोत्तराच्या तासानंतर खूप औचित्याचे मुद्दे उपस्थित व्हायला लागले. एक झाला की दुसरा हात लगेच वर असायचा. शेवटी सभापतीपदावरून उठून उभे राहत फरांदेसर मिश्किलपणे म्हणाले- ‘‘आज वारंवार इतके औचित्याचे मुद्दे उपस्थित होत आहेत... मला सांगा आपले कामकाज खरंच इतक्या ’अनुचित’ पद्धतीने सुरू आहे का...?’’ यानंतर मात्र कोणाचा हात वर झाला नाही.
 
संसदेमध्ये अर्थसंकल्प चिकित्सेसंदर्भात विभाग संलग्न स्थायी समित्यांचे कार्य उत्तमप्रकारे चालते. या समित्यांद्वारे खातेनिहाय खर्चाची, योजनांची सखोल चिकित्सा होते, समित्या शिफारसी करतात, त्याअनुरूप कार्यवाहीदेखील होते. महाराष्ट्र विधिमंडळानेही नियमित समित्यांच्या बरोबरीने या पद्धतीचा अंगीकार करावा, अशी सभापतीपदी असताना फरांदे सरांची आग्रही भूमिका होती. विधानसभा अध्यक्षपदी तेव्हा अरुणभाई गुजराथी हे होते. दोहोंच्या प्रयत्नाने अशा एकूण १५ समित्या स्थापनही झाल्या. १० समित्यांचे प्रमुखपद विधानसभा सदस्यांना देण्यात आले. माजी विधानसभा अध्यक्ष दत्ताजी नलावडे यांच्याकडेही एका विभाग समितीचे अध्यक्षपद सुपूर्द करण्यात आले. अर्थसंकल्पानंतर अशा प्रकारे या समित्यांनी एक वर्ष कामकेले. पण, दुसर्‍या वर्षानंतर ही पद्धत बंद करण्यात आली.
 
 
विधानमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांचे तैलचित्र लावण्यात यावे, अशी अनेक वर्षांपासूनची मागणी होती. फरांदेसर आणि अरुणभाई गुजराथी यांच्या प्रयत्नांनी, त्यांच्याच कार्यकाळात एका विशेष समारंभात हे तैलचित्र मध्यवर्ती सभागृहात झळकले.
 
विधान परिषदेचे सभापतीपद भूषविणारे वि. स. पागे, रा. सु. गवई, जयंतराव टिळक या परंपरेचे आपण मानकरी आहोत, याचे कृतज्ञ स्मरण त्यांच्या बोलण्यातून नेहमी जाणवायचे. आपल्याकडे ’Once a Speaker always a Speaker’ हा संसदीय लोकशाहीतील संकेत रूढ नाही. त्यामुळे पीठासीन अधिकारीपदावर विराजमान झाल्यावर पक्षीय राजकारणापासून दूर व्हावे, अशी अपेक्षा बाळगली जाते. परंतु, पुन्हा निवडून यायचे असेल तर पक्षाकडे जाणे अपरिहार्य असते. सभापतीपद सांभाळताना फरांदेसरांनी हा संकेत कटाक्षाने पाळला.
 
पत्रकार म्हणून कार्यरत असतानाचा आणखी एक प्रसंग माझ्या लक्षात आहे. १९९९ ते २००४ एनडीएच्या कार्यकाळात पंढरपूर येथे तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. फरांदे सर तेव्हा सभापती होते. त्यांना अटलजींना भेटायचे तर होते. पण, या सभेचा भाग मात्र व्हायचे नव्हते. अशावेळी व्यासपीठाच्या मागील बाजूस ते सभा संपेपर्यंत थांबले आणि पंतप्रधान महोदय व्यासपीठावरून खाली आल्यानंतर सभापती महोदय त्यांच्या भेटीसाठी पुढे आले.
अधिवेशन काळात प्रश्नोत्तराच्या छापील यादीत त्या-त्या विभागाची ५० ते ६० प्रश्नोत्तरे असतात. प्रश्नोत्तराच्या एका तासात जास्तीत जास्त ८ ते १० प्रश्न प्रत्यक्ष चर्चेला येतात. उर्वरित प्रश्नांमध्ये अनेक महत्त्वाचे विषय चर्चेविना राहून जातात. फरांदे सरांनी प्रश्नोत्तराच्या यादीतील महत्त्वाचा असा एक प्रश्न निवडून तो शेवटच्या पाच मिनिटांसाठी चर्चेला घेण्याची प्रथा सुरू केली होती. यामुळे व्यापक समाजहिताचे अनेक प्रश्न (अनुक्रमांक ८ ते १० व्यतिरिक्त) सभागृहात प्रत्यक्ष चर्चेसाठी येऊ शकले.
 
सभापतीपदाची कारकीर्द २००४ मध्ये संपल्यानंतर फरांदे सर राजकारणात फारसे सक्रिय राहिले नाहीत. लोकसभा निवडणुकीत त्यांना पराभव स्वीकारावा लागला. जन्मवाई, शिक्षण पुणे-कोल्हापूर, प्राध्यापकी धुळ्यात, कोपरगावात, विधान परिषद मतदारसंघ नाशिक विभाग पदवीधर आणि निवृत्तीनंतरचे वास्तव्य पुणे. सरांच्या निधनानंतर आता हा प्रवास संपला आहे. राजकारणातील धनाढ्यांचा मुक्तसंचार आता रुढाचार होत असताना विद्वत्तेच्या आधारे विधानमंडळाच्या इतिहासावर स्वत:च्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटविणार्‍या फरांदे सरांचे वेगळेपण संसदीय लोकशाहीच्या अभ्यासकांना नेहमीच खुणावत राहिल. सरांना भावपूर्ण श्रद्धांजली...
 
- निलेश मदाने 
@@AUTHORINFO_V1@@