आफ्रिकेच्या 'लुंगी'ने वाजवली 'पुंगी'; भारताने कसोटी सामन्यासह मालिकाही गमावली

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Jan-2018
Total Views |
 
दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात दक्षिण आफ्रिकेची भारतावर १३५ धावांनी मात
 

 
 
सेंच्युरियन : दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर असणाऱ्या भारतीय संघाचा आज सलग दुसरा पराभव झाला आहे. याआधी देशात झालेल्या कसोटी तसेच एकदिवसीय सामन्यात भारताला वर्चस्व राखता आले, परंतु परदेशातील हाराकिरीचे सत्र अजूनही कायम असल्याचेच आज पुन्हा एकदा समोर आले आहे. दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात आज अखेरच्या दिवशी भारतीय संघाचा तब्बल १३५ धावांनी पराभव झाला आहे. देशात एका मागे एक शतक-द्विशतक ठोकणारे भारतीय 'शेर' आफ्रिकेच्या लुंगी एन्गिडीच्या (लुंगीसानी) माऱ्यासमोर अक्षरशः 'ढेर' झाले. एन्गिडीने भारताच्या दुसऱ्या डावात सहा गडी बाद केले. १५१ धावांमध्ये भारताचा संपूर्ण संघ गारद झाला. २१ वर्षीय लुंगीला या सामन्याचा सामनावीर म्हणून गौरविण्यात आले.
 
 
 

दक्षिण आफ्रिकेने भारतासमोर २८६ धावांचे खडतर आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना काल म्हणजेच चौथ्या दिवशीच भारताची दयनीय सुरवात झाली. कालच्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताने तीन गड्यांच्या मोबदल्यात केवळ ३५ धावा केल्या होत्या. आज दिवसाचा खेळ सुरु झाल्यावर अवघ्या १४ धावा झाल्यावर भरवशाचा खेळाडू चेतेश्वर पुजारा धावबाद झाला. त्यानंतर पार्थिव, हार्दिक, आश्विन किंवा बुमराह यापैकी कोणालाच मैदानावर तग धरून कामगिरी करता आली नाही. भारताकडून रोहित शर्माने सर्वाधिक ४७ व त्यानंतर मोहंमद शामीने २८ धावा केल्या.
 

 

आफ्रिकेकडून लुंगी एन्गिडी या वेगवान गोलंदाजाने सर्वाधिक सहा बळी घेत भारतीय संघाच्या विजयात मोठा अडसर निर्माण केला. त्याने लोकेश राहुल, विराट कोहली तसेच हार्दिक पांड्या या महत्वाच्या फलंदाजांना तंबूत पाठविले. विशेष म्हणजे एन्गिडीचा हा पहिलाच सामना आहे. याशिवाय राबडाने तीन बळी घेतले, यामध्ये रोहित शर्माचा बळी सर्वात महत्वाचा ठरला. केपटाऊन नंतर सेंच्युरियन मध्येही पराजय पत्करावा लागल्याने दक्षिण आफ्रिकेने ही मालिका जिंकली आहे. ३ सामन्यांच्या मालिकेत आता आफ्रिका २-० ने आघाडीवर आहे.
 

 
 
 
@@AUTHORINFO_V1@@