खारफुटींच्या संरक्षणासाठी ‘इस्रो’चा टेहळणी उपग्रह

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Jan-2018   
Total Views |


अनेक ठिकाणी मौल्यवान खारफुटी वनांवर बिल्डर किंवा झोपडपट्टीसारख्या अनधिकृत बांधकामांनी कब्जा केलेला दिसतो. तेव्हा, अशा अतिक्रमणांपासून संरक्षण मिळविण्यासाठी व अतिक्रमणकार्‍यांवर कारवाई करण्यासाठी महाराष्ट्राने आता ‘इस्रो’च्या उपग्रहाच्या साहाय्याने खारफुटीचे संरक्षण करण्याचे ठरविले आहे. ‘इस्रो’कडून खारफुटींचा नकाशा तयार करण्याचे व त्यानुसार ओपन सोर्स सॉफ्टवेअर बनवून डिजिटल ट्रॅकिंग उपग्रह पाठविण्याचा प्रकल्प पुढील सहा महिन्यांत तयार होईल, असे ‘इस्रो’च्या अधिकार्‍यांचे म्हणणे आहे. त्याविषयी सविस्तर जाणून घेऊया...
 
सध्या महाराष्ट्रात एकूण १५ हजार ०८८ हेक्टर क्षेत्रामध्ये खारफुटीची वने आहेत, तर केवळ मुंबई महानगर प्रदेशात ६,९७१ हेक्टर क्षेत्र हे सरकारी मालकीच्या व १८०० हेक्टर क्षेत्र हे खाजगी जमिनीवर आहे. हे खारफुटी क्षेत्र मुंबई शहर (२७७ हे.), उपनगरे (३,७२३ हे.), नवी मुंबई (१,४७१ हे.), ठाणे (१,५०० हे.) असे विखुरले आहे.
 
 
खारफुटीची जैवव्यवस्था
 
भारत, रशिया, अमेरिका, ब्राझील, चीन, कॅनडा, कॉंगो, ऑस्ट्रेलिया, इंडोनेशिया व सुदान हे जगातील १० देश ६७ टक्के खारफुटीच्या जंगलांनी समृद्ध आहेत. भारतातील २४.१ टक्के भाग हा खारफुटीच्या जंगलांनी समृद्ध आहे. विशेष म्हणजे, या खारफुटीच्या जंगलात शाकाहार्‍यांना व मांसाहार्‍यांना पूर्णपणे जेवण मिळण्याची सोय आहे.
 
जंगली व शहरी फळफळावळ, भाज्या, वनस्पतीबिया, सुपारी-जायफळासारखी टणक फळे, तेले, औषधी वनस्पती, प्राणी, कर्ब, प्रथिने, नत्रयुक्त व इतर रासायनिक द्रव्ये व जीवनसत्त्वे खारफुटीच्या वनांत मिळू शकतात. त्यामुशे या मौल्यवान जंगलांचे जतन करणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे.
 
 
नैसर्गिक पाणथळी म्हणजे काय?
 
ही पाणथळी ठिकाणे थोड्या काळाकरिता वा कायमची पाण्याने मोसमाप्रमाणे भरलेली असतात. ही नदीतीरावर, समुद्रकिनार्‍यालगत, नदी मुखाजवळ, खाडीजवळ चिखल वा पाण्याने भरलेली असतात. नद्या-नाले खाड्या, समुद्राचे पाणी, मानवनिर्मित तलाव इत्यादी जलसमुदायांचा या पाणथळीत समावेश होतो.
 
 
खारफुटी म्हणजे मुंबईचे सुरक्षाकवच
 
खारफुटीची वने ही अनेक प्रकारच्या माशांच्या प्रजाती, अनेक जाती-उपजातींच्या वनस्पती व प्राणी यांचा नैसर्गिक अधिवास आहे. त्यामुळे शिवडी असो अथवा ठाणे, या खारफुटीच्या खाडी परिसरात फ्लेमिंगो, हेरॉन वगैरे सुंदर प्रवासी पक्षी वास्तव्याला येतात. खारफुटीची वने जलप्रलय संकटकाळी व जमीन खचण्यापासून वाचविण्याकरिता आधार देतात. याचे उत्तमउदाहरण म्हणजे, तामिळनाडूमधील पिचावरमव मुथुपेठ. या गावांत २००४ सालच्या त्सुनामीवेळी खारफुटीवनांनी संरक्षण केल्याने तेथे जीवितहानी आणि वित्तहानी कमी झाली. तसेच २००५ साली मुंबईतल्या जलप्रलयाच्यावेळी एक हजार जणांचे बळी गेले असले तरी तज्ज्ञांच्या मते, खारफुटीची वने नसती तर मृत्यूमुखी पडणार्‍या मुंबईकरांच्या संख्येत भर पडली असती.
 
खारफुटीच्या वनस्पती हवेतील कार्बनडाय ऑक्साईडचे आठपटींनी अधिक शोषण करून वायू प्रदूषण कमी करण्यास साहाय्यभूत ठरतात. ‘इस्रो’चा मॅपिंग प्रकल्प पूर्ण झाल्यावर राज्य सरकारच्या खारफुटी विभागाकडून खारफुटीच्या संरक्षणासाठी सहा प्रशिक्षित अधिकारी ‘इस्रो’च्या वैश्विक माहिती प्रणाली (GIS) संस्थेशी संपर्क साधण्याकरिता पाठविले जातील. व्यावसायिकांपैकी अनेक जणांची एक पद्धत असते की, व्यवसायवाढीकरिता ते कुठल्याही थराला जाऊ शकतात. मुंबईतील बिल्डर वा कंत्राटदार जमात अशाच कुळातील समजतात. इमारत बांधकामासाठी ते खारफुटीवनांवर संक्रांत आणतात. ती वने दिसेनाशी झाली की, त्या जागेवर बांधकामकरण्यास ते मोकळे. तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे, या मंडळींनी १९८० सालापासून मुंबई पूर्व व पश्चिमकिनार्‍यावरील ७० टक्के जमीन लुटली आहे. मुंबईच्या पश्चिमकिनार्‍याच्या ३५ ते ४५ चौ.किमी. क्षेत्रावर ही खारफुटी वने आढळतात.
 
खारफुटींवर अतिक्रमणांची संक्रांत येतेच आहे. कारण, २०१६ मधील जमिनींचे प्रती चौ. फूटाचे भाव खाली दर्शविल्याप्रमाणे गगनाला पोहोचले होते - दहिसर-बोरिवली (रु. १०,००० ते १३०००), वर्सोवा, अंधेरी व लोखंडवाला (रु. २०,०००), मढ आयलंड (रु.१३,०००). मुंबई शहर क्षेत्रात (उपनगरातील भावापेक्षा दुप्पट ते तिप्पट).
 
तज्ज्ञांच्या माहितीप्रमाणे, खारफुटीवनांचा प्रथमउगमआग्नेय आशियामधील देशांत झाला. त्यानंतर आता उष्ण व समशीतोष्ण कटिबंधातील बहुतेक क्षेत्रांत अशा जंगलांचा प्रादुर्भाव झाला आहे. ही सगळी जंगले कायमअधिकृत वा अनधिकृत अतिक्रमणांच्या संकटात गेलेली आढळतात. ही नष्ट होणे म्हणजे ती जमीन रॅबिट, डेब्रिज वा घनकचर्‍याच्या भरावाखाली जाऊन रस्ते वा इमारतींचे बांधकामकरण्यास ती पात्र ठरावी. अशी जमीन किनार्‍यावर असल्याने बांधकामकरोडोंच्या भावात विकले जाणार, ही व्यावसायिकांना कल्पना असतेच. पालिका अजून सर्व ठिकाणच्या मलजलावर प्रक्रिया करत नसल्याने ती मलजलाची घाण पण या खारफुटीवनांवर पडते.
 
 
न्यायालयाची तंबी
 
ही पाणथळी व खारफुटीवने किनार्‍यावर वाढतात व पर्यावरणाच्या दृष्टीने संवेदनशील असतात, म्हणून २००५ मध्ये उच्च न्यायालयांनी आदेश काढून मुंबई शहरातील खारफुटीवनांचा वनापुढच्या ५० मीटरपर्यंत क्षेत्रांचा यापुढे र्‍हास होऊ देऊ नये, अशी तंबी दिली आहे. ही वनक्षेत्रे जास्त मूल्याची असल्याने या न्यायालयाच्या बडग्यानंतरही २०१६ सालात खारफुटीवने नष्ट झालेली १०९ कृत्ये उघडकीस आली. त्यानंतर सरकारी खारफुटी नियंत्रण विभागाला १५०० ठिकाणी पाणथळांवर (wetland) भराव घालून झोपड्यापट्‌ट्या बांधल्याचे आढळले. सरकारने व पालिकेने या खारफुटींचे जतन करण्यासाठी भोवताली कुंपणभिंती बांधण्याचे ठरविले आहे.
 
 
टेहळणी उपग्रहाचे आणखी फायदे
 
खारफुटीच्या संरक्षणाबरोबर, अनधिकृत रेती उपसा, झोपडपट्ट्यांची घुसखोरी, फेरीवाले, स्वच्छतेकरिता जे मार्शलकडून उपाय सुरू आहेत, त्यावर नजर ठेवता येईल, दहशतवाद्यांच्या सागरातल्या फेर्‍या वा इतर कारवायांवर टेहळणी करता येईल.
 
मुंबईची कितीतरी विकासकामे म्हणजे रस्ते, इमारती, बागा, उद्याने, नालेसफाई, मलजल वाहिन्या, प्रक्रिया केंद्राची कामे, रस्त्यातील वा इतर रेल्वे, मेट्रो वाहतूक यावर नजर ठेवता येईल की नाही, हे तितके स्पष्ट नाही. विशिष्ट खारफुटी व ठिकाणे सुंदरबन - जगातील सर्वात मोठे खारफुटीवन, असे ज्याचे वर्णन करतात ते सुंदरबन बांगलादेशमध्ये आहे. त्याचा महत्त्वपूर्ण छोटा भाग भारतातील पश्चिमबंगालमध्ये आहे. यात सुंदरीची असंख्य आकर्षक झाडे असल्याने या वनाला ’सुंदरबन’ असे नाव पडले. गंगा व ब्रह्मपुत्रा नद्यांच्या संगमातून अतिसुपीक अशा दलदली प्रदेशाची छोटीछोटी ५४ बेटे तयार झाली आहेत. हे ठिकाण रॉयल बेंगॉल वाघांचे माहेरघर बनलेले आहे. सायबेरिअन क्रेन, येलो वग्टेल, सुतार पक्षी असे अनेकविध प्रवासीपक्षी येथे बघायला मिळतात.
 
 
ऍपल खारफुटी
 
गेल्या सहा वर्षांपासून विलक्षण असे व वेगळ्या वनस्पतींच्या जातीची असलेली वने नवी मुंबई, ठाणे व मुंबईच्या उपनगरातील पाणथळी व खाडीमध्ये दिसू लागली आहेत. १० वर्षांपूर्वी होती, त्यापेक्षा आता २०११ पासून ती तिपटीने झाली आहेत. अशा वनातील झाडे पाणथळातून वायूप्रदूषण कमी करण्याच्या प्रयत्नात उत्तमकामगिरी करतात. या ऍपल खारफुटी वनांची मुळे लांब असतात व त्यांना इतर वनस्पतींपेक्षा जास्त प्राणवायू व जास्त खाद्य लागते आणि त्यामुळे त्या जास्त काळ तग धरतात, असे मत जंगल विभागाचे मुख्य वासुदेवन यांनी दिले. ही झाडे १.५ मी.पर्यंत उंच वाढतात, रात्री पांढरी वासाची फुले व हिरवी विचित्र सफरचंदासारखी फळे देतात. मडफ्लॅटमध्ये यांची वाढ वेगाने होते. या झाडांच्या पानांपासून ऍन्टी मायक्रोबायल औषधे तयार करता येतात व बाधित रोगांवर (infectious diseases) गुणकारी ठरतात. साठ्ये कॉलेजमधील तज्ज्ञांनी यावर संशोधन करून अमेरिकन जर्नलमध्ये लेख छापले आहेत. यांच्या फळापासून लोणची देखील बनतात.
 
 
खारफुटीवनाचे प्रकार
 
तिवरवने, कांदळवने, मंगलवने, खारफुटीवने आणि सुंदरवने अशा विविध खाजण वनस्पतीच्या जाती आहेत. काही दशकांपूर्वी येथे दलदलीमुळे डास वा चिलटांचा प्रादुर्भाव होत असल्याने लोक या जागेला निषिद्ध मानीत. या वनझाडांचे अनेक प्रकार आहेत. महाराष्ट्राच्या किनार्‍यावर ११ कुळातील १९ वृक्षप्रकार आहेत. जास्त ठिकाणी तिवरवनात झाडांना असंख्य फुले येतात. सिंधुदुर्गच्या आचरा खाडीवर कांजळवने मोठ्या प्रमाणात दिसतात. ती १०-१५ मी. उंचीची होतात. यावर २५-३० सें.मी.च्या शेंगा येतात. तसेच बंगालमधील तिवरसमृद्ध सुंदरवन प्रसिद्ध आहे. अंदमानच्या चिडिया टापूतील झाडे तर २५ मी. उंच होतात. मरांडींच्या झुडपांचा फैलाव बियांद्वारे होतो. त्यांचा पसारा वाढतो तो जलपर्णींच्या फांद्यांमुळे. याशिवाय काजळा, किरकिरी, गुरिया, फुंगी, चिर्पी इत्यादी प्रकारही आहेत. खारफुटीवनाची नर्सरी वसई खाडीच्या पाच ठिकाणी ठाणे पालिकेकडून खारफुटींची लागवड करण्यात आली आहे व त्याकरिता २ लाख ५० हजार रोपवाटिका वापरल्या आहेत. कांदळ नर्सरी गोव्यात चोराव बेटावर आणि विक्रोळीच्या ठाणे खाडीलगत उभारल्या गेल्या आहेत. डहाणूत सावता खाडीकाठी तिवरवने नव्याने प्रस्थापित करण्यात यश मिळाले आहे. अमेरिकेतील फ्लोरिडामध्ये कांदळ रोपट्यांना कागदाचे पंख लावून हेलिकॉप्टरमधून सोडून पेरणी करून खाजणवनाखाली फार मोठे क्षेत्र आणले आहे.
 
- अच्युत राईलकर
@@AUTHORINFO_V1@@