प्रा. ना. स. फरांदे यांचे निधन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Jan-2018
Total Views |


पुणे : महाराष्ट्र विधानपरिषदेचे माजी सभापती व भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रा. नारायण सदाशिव फरांदे यांचे मंगळवारी सकाळी पुणे येथे निधन झाले. ते ७८ वर्षाचे होते. तीनच दिवसांपूर्वी घरात पाय घसरून पडल्याने त्यांच्या डोक्याला दुखापत झाल्याने पुण्यातील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते.
मूळचे सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यात ओझर्डे येथील असलेले ना. स. फरांदे यांची राजकीय कारकीर्द अहमदनगर जिल्ह्यात कोपरगाव येथून सुरू झाली. कोपरगाव शहर अध्यक्षपदापासून पुढे भाजपचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष व महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदही फरांदे यांनी भूषवले. नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघातून ते दोन वेळा निवडून आले, तर एकदा विधानसभा आमदारांमधून त्यांची परिषदेवर निवड झाली. १९९८ ते २००४ या काळात विधानपरिषदेचे सभापतीपदही त्यांनी भूषवले होते.
ना. स. फरांदे यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, तीन मुली असा परिवार आहे. फरांदे यांच्या निधनाच्या वृत्तानंतर राजकीय-सामाजिक वर्तुळातील अनेक मान्यवर व्यक्तींनी शोक व्यक्त व्यक्त केला.
निरलस, निष्कलंक आणि ध्येयवादी व्यक्तिमत्व हरपले
“प्रा. ना. स. फरांदे हे एक ध्येयवादी अध्यापक, चिंतनशील अभ्यासक, अभ्यासू वक्ते आणि चौफेर प्रतिभेचे साहित्यिक होते. सामाजिक बांधिलकीपोटी ते राजकारणात सक्रीय झाले. त्यांच्या निधनाने राजकीय-सामाजिक क्षेत्रातील एक निरलस, निष्कलंक आणि ध्येयवादी व्यक्तिमत्व आपण गमावले आहे.”
- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
 
ज्येष्ठ मार्गदर्शक गमावला
“प्रा. फरांदे यांचा संतसाहित्याचा गाढा अभ्यास होता व त्यांना वक्तृत्वाची देणगी लाभली होती. शांत व संयमी स्वभाव तसेच कार्यकर्त्यातील नेता हे त्यांचे वैशिष्ट्य होते. भाजपच्या राज्यातील जडणघडणीत त्यांचे मोठे योगदान होते. फरांदे यांच्या निधनाने भाजपने एक अभ्यासू, सुसंस्कृत नेतृत्व तसेच ज्येष्ठ मार्गदर्शक गमावला आहे.”
- खा. रावसाहेब पाटील-दानवे,
प्रदेशाध्यक्ष, महाराष्ट्र भाजप
@@AUTHORINFO_V1@@