बनावाचे राजकारण

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Jan-2018
Total Views |
 
गेल्या काही महिन्यांपासून ज्यांनी न्या. लोया यांच्या मृत्यूचे प्रकरण उकरून काढले, त्यावरून देशभरात गदारोळ उडवून दिला आणि आम्हीच खरे सत्याचे पुरस्कर्ते असल्याचा टेंभा मिरवला, त्याच मंडळींचा यामागे हात असेल. नक्कीच त्यांनीच अनुजवर हे प्रकरण वाढवण्याचा दबाव आणला असेल. पण, शेवटी यातील खरी माहिती आणि हे प्रकरण उकरून काढणार्‍यांची लायकी काय, हे जनतेसमोर येणेही अत्यावश्यक आहे. त्यामुळे आता या प्रकरणात खरेतर सरकारनेच लक्ष घालून अनुजवर दबाव आणणार्‍यांचा शोध घेण्याची, त्यांचे हेतू तपासण्याची, त्यांची चौकशी करण्याची आणि त्यांचे कपटी चेहरे जनतेपुढे आणण्याची गरज आहे.
गुजरातमधील सोहराबुद्दीन शेख चकमक प्रकरणाची सुनावणी करणार्‍या न्या. लोया यांच्या मृत्यूप्रकरणाचे भांडवल करण्याचा उद्योग देशभरातील तमाम पुरोगामी, बुद्धिजीवी आणि लोकशाही रक्षणाचा आव आणलेल्या मंडळींनी सुरू केल्याचे दिसते. भाजपच्या विचारसरणीला विरोध करणार्‍या या भणंगांनी लोया यांच्या मृत्यूप्रकरणी केंद्र सरकार आणि भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्यावर आरोपांचा धुरळा उडविण्याचा सपाटा लावला. पण, ही आरोपांची धूळ या मंडळींच्याच हातापायाला, बुद्धीला आणि मनाला माखत चालल्याचे रोज घडणार्‍या सत्यदर्शी घटनांवरून लक्षात येते. न्या. लोया यांचा मृत्यू नैसर्गिक नसल्याचे म्हणत देशातील न्यायव्यवस्था सुरक्षित नसल्याची, न्यायव्यवस्थेवर गंडांतर आल्याची कोल्हेकुई एका इसमाने सुरू केली. त्यानंतर त्याभोवती तशाच जातकुळीची माणसे जमत गेली. भाजपविरोधाचे कोणतेही तार्किक कारण दिसत नसल्याने या मंडळींनी सुरुवातीला न्या. लोया प्रकरणी आरोप करणार्‍यांच्या कोल्हेकुईत आपली कुई कुई मिसळली. पण, रविवारी खुद्द न्या. लोया यांच्या मुलानेच या मंडळींच्या आरोपांत दम नसल्याचे म्हणत लोया मृत्यूप्रकरणातील संशयाला शेवटचा खिळा ठोकला. तरीही विरोधकांचे शेपूट वाकडे ते वाकडेच! न्या. लोया यांच्या मुलाने दबावाखालीच असे वक्तव्य केल्याचा आरोप करायला या भावनाशून्य लोकांनी मागेपुढे पाहिले नाही. आपल्या हिडीस राजकारणापायी २१ वर्षीय अनुजच्या भावभावनांचा कसलाही विचार न करता तो राजकारणात सामील असल्याचा आरोप या भणंगांनी स्वार्थापायी केला. म्हणजेच, ‘तुमच्या वडिलांच्या मृत्यूचे आम्हाला राजकारण करायचे आहे आणि तुम्ही कितीही त्यांच्या मृत्यूविषयी संशय नसल्याचे म्हटले तरी आम्ही म्हणू तेच सत्य,’ या पुरोगामी न्यायावर ही मंडळी ठाम असल्याचे दिसते. त्यामुळे न्या. लोया हे स्वतः जरी पृथ्वीवर अवतरले आणि माझा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे त्यांनी म्हटले, तरी त्यांनाही तुम्ही दबावाखालीच बोलत असल्याचे ही उडाणटप्पूंची टोळी म्हटल्याशिवाय राहणार नाही.
 
दुसरीकडे अनुजने पत्रकार परिषदेत सुरुवातीला आमच्या मनात न्या. लोया यांच्या मृत्यूबद्दल संशयाचे धुके असल्याचे आणि नंतर ते दूर झाल्याचे सांगितले. पण त्यानंतरही प्रश्न विचारणार्‍यांनी प्रश्नांचा भडीमार सुरुच ठेवला. आपल्या प्रश्नांमुळे त्या मुलाच्या मनावर काय परिणाम होईल, याचा जरासुद्धा विचार विरोधकांनी आणि प्रश्न विचारणार्‍यांनी केला नाही. हे खरे तर दुर्दैवी. आम्हाला तुमच्या राजकारणात ओढू नका, अशी विनंतीही यावेळी अनुजने केली. पण, लोकांच्या मृत्यूचेही राजकारण करणार्‍यांना त्याच्या विनंतीचा आवाजही ऐकू गेला नसेल. अनुजने रविवारी आणखी एका गोष्टीचा खुलासा केला. तो गंभीर आहे. काही राजकीय नेतेमंडळी आणि संघटनांकडून आमच्यावर दबाव टाकला जात असल्याचा आरोप भर पत्रकार परिषदेत अनुजने केला. म्हणजेच न्या. लोया यांच्या मृत्यू प्रकरणामुळे आपला राजकीय फायदा होऊ शकतो असा माणुसकीशून्य विचार करणार्‍यांचेच हे कुभांड असल्याचे कोणाच्याही लक्षात येईल. भाजप अध्यक्ष अमित शाह यांना या प्रकरणात गोवण्याचे, त्यांच्या बदनामीचे हे सूत्रबद्ध कारस्थान असल्याचे यावरून स्पष्ट होते. शाह यांच्यावर केलेल्या आरोपांतून ज्यांचा राजकीय फायदा होईल, त्याच लोकांचा हा डाव असल्याचे नाकारता येणार नाही. तसे पाहिले तर ही मृताच्या टाळूवरची लोणी खाणारी जमात कोण, हे समजणे काही फारसे अवघड नाही. गेल्या काही महिन्यांपासून ज्यांनी न्या. लोया यांच्या मृत्यूचे प्रकरण उकरून काढले, त्यावरून देशभरात गदारोळ उडवून दिला आणि आम्हीच खरे सत्याचे पुरस्कर्ते असल्याचा टेंभा मिरवला, त्याच मंडळींचा यामागे हात असेल. नक्कीच त्यांनीच अनुजवर हे प्रकरण वाढवण्याचा दबाव आणला असेल. पण, शेवटी यातील खरी माहिती आणि हे प्रकरण उकरून काढणार्‍यांची लायकी काय, हे जनतेसमोर येणेही अत्यावश्यक आहे. त्यामुळे आता या प्रकरणात खरेतर सरकारनेच लक्ष घालून अनुजवर दबाव आणणार्‍यांचा शोध घेण्याची, त्यांचे हेतू तपासण्याची, त्यांची चौकशी करण्याची आणि त्यांचे कपटी चेहरे जनतेपुढे आणण्याची गरज आहे.
 
आज आपल्या देशाला सीमेपलीकडून केल्या जाणार्‍या हिंसक, दहशतवादी कारवाया, नक्षलवाद, माओवाद, त्यांचे पाठीराखे, हितचिंतक यांचा धोका असल्याचे कोणीही मान्य करेल. वर उल्लेख केलेल्या लोकांचा धोका उघड्या डोळ्यांना दिसणारा, लक्षात येणारा असा आहे. पण, जे लोक अतिशय योजनाबद्धरित्या लोकांच्या मनात विष कालवून सरकारविरोधात, काही डाव आखतात, देशात अराजक माजवण्याचा प्रयत्न करतात, त्यांचे कारस्थान कसे ओळखणार? ते लक्षात कसे येणार? आज न्या. लोया यांच्या मृत्यू प्रकरणाचा बभ्रा समाजात ज्यांना विचारवंत असे म्हटले जाते, त्यांनी जास्तच केल्याचे दिसते. पण, न्या. लोया यांच्या मृत्यूआधीही देशातील कितीतरी महनीय व्यक्तींचा संशयास्पद मृत्यू झाल्याचे धडधडीत लक्षात येते. पण, त्याची चौकशी करण्याची मागणी आज न्या. लोया प्रकरणावरून घसा खरवडून आरोप करणार्‍यांनी कधी केली नाही. माजी पंतप्रधान लालबहादुर शास्त्री, उत्तर प्रदेशातील कॉंग्रेसचे नेते राजेश पायलट, माधवराव शिंदे, बालयोगी, एकात्ममानवदर्शनाचे प्रणेते पंडित दीनदयाळ उपाध्याय, जनसंघाचे संस्थापक श्यामाप्रसाद मुखर्जी, राजीव दीक्षित ही यादी आणखीही मोठी होऊ शकेल. या सर्वांचाच मृत्यू संशयास्पदरित्या झाल्याचे आढळले आणि नंतर त्यावर पडदा टाकला गेला. या सर्वांच्याच मृत्यूवेळी देशात कॉंग्रेसचेच सरकार होते, तरीही त्यांच्या मृत्यूच्या चौकशीची कोणी मागणी केली नाही की यात भाजपनेत्यांवर संशय घ्यायला जागा नाही. ज्या कॉंग्रेसने त्यांना पोसले, त्यांच्यावरच कसा आरोप करणार या धर्मसंकटात आज ही आरोप करणारी मंडळी अडकली होती? आता तर न्या. लोया यांच्या मृत्यूप्रकरणातील सत्य दुधाइतके स्वच्छ आणि स्पष्ट दिसत असूनही या मंडळींनी त्यावरून देशात काहूर माजवले. म्हणजेच सत्ताधारी पक्ष, त्याची विचारसरणी याला कोणाच्या तरी मृत्यूचा आधार घेत विरोध करायचा आणि त्या माध्यमातून आपली देश तोडणारी वृत्ती लोकांमध्ये पसरवायची ही या मंडळींची कुटिल खेळी. त्यामुळे देशाला जसा हिंसक कारवाया करणार्‍यांकडून धोका असल्याचे दिसते, तसाच किंवा त्यापेक्षा जास्तच धोका या बुद्धिजीवी म्हणवणार्‍यांकडूनही आहे. कारण, त्यामुळे थेट लोकांच्या मन आणि मेंदूवर कुविचार थोपवले जातात. या लोकांचे हे बनावाचे राजकारण वेळीच ओळखून खरे तर या लोकांच्या मुसक्या आवळल्या पाहिजे, तरच देशात शांतता नांदू शकेल. अन्यथा, ही मंडळी आपल्या राजकीय पोळ्या शेकण्यासाठी मृतांच्या चितांचा वापर असाच करत राहील.
 
 
@@AUTHORINFO_V1@@