स्वत:च्या लढाईचे एकाकी शिलेदार...!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Jan-2018
Total Views |
 


 
म्हटलं तर त्याचं काम फार मोठं. नच म्हटलं तर एका नजरेत बात खल्लास! म्हटलं तर तोंड भरून कौतुक करावं असं. आणि म्हटलंच तर सर्वांनी अनुकरण करावं असंही... दूरवरच्या ओरिसातल्या आडवळणावरच्या एका दुर्गम गावात राहणारा एक आदिवासी माणूस. शहरात राहणार्‍यांच्या लेखी कवडीचीही किंमत नसलेला. अशिक्षित, अडाणी, मागासलेला, दुर्लक्षित, अदखलपात्र... पण, परवा खुद्द कलेक्टरसाहेबांनी त्याला बोलावलं आपल्या दालनात. चारचौघांत त्याचं कौतुक केलं. सत्कार केला अन गुमसाही नावाच्या एका छोट्याशा गावातल्या जालंधर नायकच्या कार्याची ब्रेकिंग न्यूज झाली! एकीकडे, विपरीत परिस्थितीशी लढा देत गावकुसातल्याच कशाला, अगदी शहरातल्या शाळांचे संचलनही महत्कठीण ठरत असताना, दूरवरच्या शाळेत जाण्यासाठी ‘आड’ येणारे डोंगर खोदून काढत गावातील पोरांसाठी शाळेपर्यंतचा रस्ता तयार करून देण्यासाठी उभारलेला एक लढा एकट्यानं पण जिद्दीने लढणारा तो शिलेदार ठरला!
 
तसे गुमसाही गाव अगदीच छोटे. आदिवासी समूहातली काही मोजकी घरं या गावची ओळख सांगत आपलं अस्तित्व जपून आहेत. इथल्या असुविधांचा बाऊ करत कित्येकांनी शेजारची मोठी गावं जवळ केलीत कधीचीच. पण, जालंधर मात्र इथेच राहिला- गावचे सारे उणेपण मनात साठवून. आजघडीला तो वयाच्या पंचेचाळिशीत आहे. स्वत: नाही गेला कधी शाळेत, पण आता घरातली पोरं शिकावीत असं त्याला वाटतं- अगदी मानापासून. पण करणार काय, गावात शाळा नाही. शाळा आहे ती डोंगरापल्याडच्या फुलबनी गावात. तिथवर जायला रस्ता नाही. खूप दूरवरून जायचं तर जरासं जिकिरीचंच होतं पोरांसाठी. मग शाळेत न जाण्याचे बहाणे शोधतात मुलं. जालंधरच्या मनात ही सल खूप दिवसांपासून घर करून बसली होती. मतदारांची फारशी संख्या नसल्याने राजकीय नेते, सरकार, प्रशासन, अधिकारी यांच्यापैकी कुणाच्याही अजेंड्यावर हे गाव असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. परिणामी तिथल्या समस्या, शाळेची गरज, पलीकडच्या गावात जाण्यासाठीचा रस्ता, यांपैकी कुठलीही बाब कुणाच्याही लेखी दखलपात्र ठरली असती तरच नवल! तसली नवलाई घडू न देण्याची काळजी सर्वांनीच घेतलेली! त्यामुळे मूठभर लोकांची ही वस्ती वर्षानुवर्षे तशीच राहिली. उपेक्षित... पण, जालंधरनं एक गोष्ट मनावर घेतली. कसेही करून गावातल्या चारदोन पोरांना शाळेत पाठविण्याची.
 
नजरेसमोर दिसणार्‍या एका डोंगराचा काही भाग फोडून दूर केला तर फुलबनीपर्यंतचा रस्ता तयार होऊ शकतो, ही कल्पना मनात येण्याचाच अवकाश, हातात सब्बल अन छन्नी घेऊन तो कामाला लागला. दिवसभरातून जमेल तेवढा वेळ काढायचा. सारे शरीर घामाने ओलेचिंब होईपर्यंतकाम करीत राहायचे. कधी कुणी येऊन, काय करतोस म्हणून विचारून जाई. कधी गावातली पोरंबाळं, बाया-बापुडे उभे राहात. याचं काय चाललंय ते कौतुकानं बघत. हा आपला कधीमधी बघायचा त्यांच्याकडे हसर्‍या चेहर्‍याने, तर कधी सर्वांकडे दुर्लक्ष करून आपल्या कामात रममाण व्हायचा. काबाडकष्ट करून डोंगराचा जमेल तेवढा भाग खोदून काढायचा. दगड, माती एका बाजूला करायचा. दोन वर्षे झालीत त्याच्या या एकाकी लढाईला. खरंतर समोर एवढे मोठे डोंगर अन त्याचा सामना करायला निघालेला हा निधड्या छातीचा एकटा गडी. पण, हे भले मोठे काम एकट्याने कसे होईल, कधी होईल, असले प्रश्न त्याला कधी पडले नाहीत. अविरत मेहनत आणि समर्पणातून एक लढा साकारला. एव्हाना सुमारे आठ किलोमीटरचा रस्ता तयार झालाय. फुलबनी गाठायला अजून सात किलोमीटरचे अंतर बाकी आहे. पण, पुढील काळात तेही दूर करत गावातील लेकरांसाठी हा रस्ता तयार करूनच मोकळा श्वास घेण्याचा त्याचा निर्धार आहे. खरंतर त्याचं काम गेली दोन वर्षे निर्वेध सुरू आहे. रस्ता पूर्ण होईपयरत ते तसेही सुरू राहणारच होते. पण, मधल्या काळात कुठूनतरी जिल्हा प्रशासनार्यंत ही वार्ता पोहोचली. चारदोन पत्रकारांनी त्याच्या बातम्या केल्या. कलेक्टरसाहेबांनीही त्याची दखल घेतली अन मग जालंधर हिरो झाला- खर्‍या अर्थाने हिरो!
 
जिल्हा प्रशासनाने त्याचं कौतुक केलं. साहेबांनी सत्कार केला. पण, हा रस्ता आता यापुढे शासन पूर्ण करेल, असं आश्वासन मात्र आलं नाही अजून कुठूनच. त्यामुळे नायक याचा एकाकी लढा पुढील काळातही सुरूच राहणार आहे. गावातली पोरं या मार्गाने शाळेत जातील, त्या दिवसापर्यंत... उद्दिष्ट होतं पोरांना शाळेत धाडण्याचं. त्यासाठी हवी होती शाळा. घरापासून शाळेपर्यंतच्या भल्या मोठ्या अंतराची चिंता नव्हतीच कधी कुणालाही. फक्त शाळेपर्यंत पोहोचण्यासाठी रस्ता तेवढा हवा होता. काळ्याशार गुळगुळीत रस्त्याची तर कल्पनाही स्वप्नांपलीकडची ठरली असती गुमसाहीवासीयांसाठी. दगडधोंड्यांचाच असला तरीचालेल, फक्त ‘मार्ग’ असावा, एवढीच त्यांची माफक अपेक्षा. स्वातंत्र्याच्या सात दशकांनंतर एवढी साधी सोयही आपल्या वाट्याला येत नाही, याची कुठे खंत नाही, की त्या अधिकारासाठी लढण्याची गरजही नाही. आपल्या स्तरावर आपण काय करू शकतो, एवढं एकानं ताडलं अन लागला कामाला. परिणाम समोर आहेत...
 
बिहारमधला तो दशरथ मांझी आठवतो- ‘माऊंटन मॅन’ म्हणून प्रसिद्धी पावलेला? गयाजवळच्या गेहलौर गावातून पहाडापलीकडच्या शेतात काम करणार्‍या दशरथसाठी फाल्गुनीदेवी रोज डबा घेऊन जाई. पूर्ण पहाड चढायचा अन मग पलीकडच्या बाजूने उतरून नवर्‍याच्या हातात डबा सोपवायचा. परतीचा प्रवास तसाच. पहाड चढणे अन उतरणे. पावसाळ्यात खूपदा पाय घसरायचा. इजा व्हायची. दुखणे अंगावर यायचे. एकदाचे घसरणे तिच्या जिवावर बेतले. दशरथ अस्वस्थ झाला. शेत काय नि दवाखाना काय, सारंच डोंगराच्या पल्ल्याड. रस्ता नावाचा प्रकार अस्तित्वात नाहीच कुठे. दशरथ एक दिवस कुठल्याशा निर्धाराने उठला. हातात सब्बल, छन्नी घेतली अन लागला कामाला. दोन गावांच्या मध्ये उभ्या राहिलेल्या डोंगरातून एक रस्ता तयार करायला तब्बल २२ वर्षे लागली त्याला.
 
लोकांनी खिल्ली उडवण्यापासून तर कधीमधी खायला शिदोरी आणून देण्यापर्यंत आणि बघ्याच्या गर्दीने मूर्खात काढण्यापासून, तर पाणावलेल्या डोळ्यांनी कुणी ‘दुवा’ देईपर्यंतचे अनुभव गाठीशी बांधत दशरथ मांझीचं काम अविरत चाललेलं असायचं. टर उडवली गेल्याची खंत नाही, की आपल्या कामाची कुणी दखल घेतल्याचा आनंद नाही. गाठीशी बांधलेल्या निर्धाराच्या पूर्ततेसाठी तब्बल दोन दशक खपला तो माणूस. एक पहाड खोदून काढत, भलेमोठे दगडधोंडे बाजूला करत, ९ मीटर रुंदीचा मार्ग तयार करण्याची प्रक्रिया म्हणजे तपश्चर्याच होती. म्हटलं तर, तोही एक सामाजिक लढाच होता- त्यानं एकाकी लढलेला... उद्दिष्ट प्राप्तीनंतर सारेच सरसावले होते कौतुकाची थाप पाठीवर ठेवायला. पण, प्रत्यक्षातील लढाईदरम्यान मात्र सर्वांनी रून तमाशा बघण्याची भूमिका स्वीकारली होती. १९६० ते १९८३ या काळात पूर्ण केलेला रस्ता लोकांसाठी उपलब्ध करून दिल्यानंतर दशरथ मांझीच्या डोळ्यांत उमटलेले भाव कुणाला टिपता आलेत ठाऊक नाही, पण डोंगर खोदून तयार केलेला तो मार्ग आजही ‘माऊंटन मॅन’ची आठवण करून देतो. मांझी यांना जाऊनही आता जवळपास एक दशक पूर्ण झालंय. अशात, गुमसाहीच्या जालंधर नायकचा किस्सा समोर आला आहे.
 
एवढ्यातेवढ्या गोष्टींसाठी सरकारदरबारी रडगाणी गाणारी, कायम मागण्या करीत राहणारी, त्यासाठी मोर्चे काढणारी, न झालेल्या कामांसाठी शासन-प्रशासनाच्या नावाने बोटे मोडणारी माणसं काय थोडीथोडकी आहेत आपल्या समाजात? पण, असल्या कुठल्याच भानगडीत न पडता स्वत:चा लढा, तो लढण्याची स्वत:ची दिशा, त्यासाठीचा जगावेगळा मार्ग सुनिश्चित करून, कुणाच्याही मदतीची अपेक्षा न करता लढत राहणार्‍या एकाकी शिलेदारांची नोंद घेण्याचा, त्याचे अनुकरण करण्याचा इरादा इतर लोकही जाहीर करतील कधीतरी? कायम रडीचा डाव खेळणारी माणसं, अशी स्वत:ची लढाई निश्चित करून ती खुल्या दिलानं लढायला समर्पित भावनेने समोर येतील कधीतरी...?
 
 
 
- सुनील कुहीकर (9881717833)
 
 
@@AUTHORINFO_V1@@