'भीमा-कोरेगाव'प्रकरणी ७ संशयित नक्षलवाद्यांना अटक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Jan-2018
Total Views |

कल्याण-डोंबिवली, मुंब्र्यात एटीएसची कारवाई
‘भीमा-कोरेगाव’ पेटवण्यात सहभागाचा संशय
 
 

कल्याण : भीमा-कोरेगाव दगडफेक घटना आणि त्यानंतरच्या ‘महाराष्ट्र बंद’दरम्यान झालेला हिंसाचार पेटवण्यात सहभागी असल्याच्या आणि कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (माओवादी) या बंदी असलेल्या नक्षलवादी संघटनेशी संबंधित असल्याच्या संशयावरून महाराष्ट्र पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) कल्याण, डोंबिवली आणि मुंब्र्यात ७ व्यक्तींना अटक केली. हे सर्वच जण मूळचे तेलंगणमधील आहेत.
 
एटीएसने दिलेल्या माहितीनुसार, नक्षलवाद्यांशी संबंधित व्यक्तींची एक टोळी कल्याणला येत असल्याची माहिती एका खबऱ्याकडून एटीएसला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचत एका नक्षलवाद्याला अटक केली. यानंतर या व्यक्तीची अधिक चौकशी केल्यानंतर त्या व्यक्तीने रमाबाई आंबेडकर नगर, कामराज नगर आणि विक्रोळी आदी भागांमध्ये कार्यरत असलेल्या आपल्या सहकाऱ्यांची नावे उघड केली. या माहितीनुसार पोलिसांनी पुढील कारवाई करत वेगवेगळ्या पथकांद्वारे ६ व्यक्तींना वेगवेगळ्या भागांतील त्यांच्या घरांतून अटक केली.
 
कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया ही भारत सरकारने ‘बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायदा, १९६७’ अन्वये बंदी घातलेली संघटना आहे. या अटक केलेल्या व्यक्तींना पकडले असता त्यावेळी या संघटनेशी संबंधित काही कागदपत्रे व इतर साहित्यही सापडले असल्याचे एटीएसने म्हटले आहे. या सातही जणांवर एटीएसच्या काळाचौकी स्थानकात गुन्हाही नोंदवण्यात आला आहे. या सातही व्यक्ती मूळच्या तेलंगणमधील रहिवासी आहेत. ‘भीमा-कोरेगाव’ घटनेत व नंतर झालेल्या हिंसाचारात या व्यक्तींचा व संघटनेचा सहभाग होता का, याबाबत एटीएसकडून अधिक तपास केला जात आहे.
 
@@AUTHORINFO_V1@@