नागरिकांच्या सहकार्यातूनच विकास साध्य करू शकतो - खा. चिंतामण वनगा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Jan-2018
Total Views |
 
 
 
 
पालघर : जिल्हा विभाजनानंतर मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या अनेक गाठीभेटीतून, पायाभूत सुविधांच्या माध्यमातून पालघर हा आदर्श जिल्हा म्हणून निर्माण होत असून शासनाच्या ३१ हजार कोटी रुपयांच्या निधीतून पालघर जिल्ह्यात अनेक मोठ मोठे प्रकल्प निर्माण केले जाणार आहेत. महाराष्ट्र राज्याच्या पर्यटन मंत्र्यांच्या माध्यमातून केळव्याचा पर्यटनाच्या दृष्टीनेही विकास करण्याचा प्रयत्न असून नागरिकांच्या सहकार्यातूनच हा विकास आपण साध्य करू शकतो, असे प्रतिपादन खासदार चिंतामण वनगा यांनी केले. ‘केळवे बीच पर्यटन महोत्सव २०१८’ च्या कार्यक्रमाप्रसंगी वनगा बोलत होते.
 
 
 
सदर कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून कोकण पर्यटन उद्योग संघाचे अध्यक्ष माधव भांडारी, आमदार मनीषा चौधरी, माजी राज्यमंत्री राजेंद्र गावित, कोकण भूमी प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष संजय यादव, वसई-विरार महानगरपालिकेचे माजी महापौर राजीव पाटील, नॉर्थ कोकण चेंबर ऑफ कॉमर्स, अग्रीकॅल्चारल फौंडेशनचे अध्यक्ष राजीव चुरी, हिंदुस्थान प्रकाशनचे रमेश पतंगे, केळवे बीच पर्यटन उद्योग विकास संघाचे अध्यक्ष हरिशचंद्र चौधरी, उपाध्यक्ष आशिष पाटील, केळवे ग्रामपंचायत सरपंच भावना किणी आदी उपस्थित होते. प्रास्ताविकपर भाषणातून हरिशचंद्र चौधरी यांनी केळवे बीच पर्यटनाच्या सध्यस्थितीतील माहिती देताना सांगितले की, मागील २० ते २५ वर्षांपासून पर्यटनाचा उद्योग सुरु आहे. पर्यटकांच्या राहण्यासाठी येथे एकूण ६१ हॉटेल्समध्ये ३६१ रूम्स असून १७५ एसी रूम्सची सुविधा उपलब्ध आहे. यात रात्रीच्या समयी सुमारे २ हजार २५० पर्यटक एकच वेळी राहू शकतात. हॉटेल्ससह समुद्रकिनाऱ्यावर सुकी मच्छी, ताज्या भाज्या, भेळपुरी, वडापाव, चायनीज, नारळपाणी, ताडगोळे, आईस्क्रीम, उंट सफारी, घोडागाडी, बीच बाइक्स यातून सुमारे ५०० हून अधिक जणांना येथे रोजगार उपलब्ध झाला असल्याचे त्यांनी नमूद केले.
 
 
 
विदर्भ, मराठवाडा भागातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाईपोटी शासनाकडून हजारोंची मदत मिळते त्याचप्रमाणे पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाही मिळायला हवी अशी आशा चौधरी यांनी व्यक्त केली. माधव भांडारी यांनी कोकणातील पर्यटनाचा विकासाठी जितके हवे तितके दिले नसल्याचे दुःख व्यक्त करीत या पट्ट्यातील पर्यटनाचा विकास सरकारच्या आधाराविनाच झाला असल्याचेही नमूद केले. सागरी सुरक्षेच्या दृष्टीने पालघर जिल्ह्यातही प्रशिक्षण केंद्र सुरु करण्याचा आपला मानस असून त्यासाठी जिल्ह्यातून पुढाकार घेणे गरजेचे असल्याचे भांडारी यांनी सांगितले.
 
 
 
साप्ताहिक विवेकच्या माध्यमातून पालघर - केळवे भागातील अनेक लेख प्रकाशित केल्याची आठवण करून देत अनेक गोष्टीना उजाळा देत पर्यटनातून विकास होण्यासाठी सा. विवेक आणि मुंबई तरुण भारत नेहमीच पुढाकार घेत राहील अशी रमेश पतंगे यांनी दिली. कार्यक्रमादरम्यान ‘पर्यटन विशेषांक २०१८’ च्या अंकाचे खा. वनगा यांच्या हस्ते प्रकाशन केले तसेच रमेश पतंगे यांच्या हस्ते फेसबुक लिंकचेही प्रसारण करण्यात आले.
 
 
केळवे बीच पर्यटन महोत्सव २०१८
 
केळवे बीच पर्यटन महोत्सव २०१८ चे शनिवारी रोजी खा. चिंतामण वनगा यांच्या हस्ते उद्घाटन झाले. महोत्सवाच्या माध्यमातून खवय्यांची मोठी पर्वणीच झाली आहे. यात विविध खाद्य पदार्थांचे ५० स्टोल उभारण्यात आले आहेत. मकरसंक्रांतीनिमित्त केळवे-माहीम येथील प्रसिद्ध उकडहंडीची चव पर्यटकाना चाखण्यास मिळाली. तसेच खवय्यांना वाडवळी, भंडारी, आगरी, मच्छिमार, मुस्लीम, आदिवासी समाजाच्या खाद्यपदार्थ खाण्यास मिळाले. मुंबई-ठाणे तसेच वापी-सुरत भागातून सुमारे ३० हजार पर्यटक या महोत्सवाला येणार असल्याचा अंदाज केळवे उद्योग संघटनेचे उपाध्यक्ष आशिष पाटील यांनी मुंबई तरुण भारतशी बोलताना व्यक्त केला.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@