सह्याद्रीच्या दरबारातील 'वजीर'

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Jan-2018
Total Views |

 
 
गेले अनेक महिने लिहायला काही सुचत नव्हतं, आणि जेव्हा सुचायचं तेव्हा वेळ नसायचा. ह्या अश्या गुंतागुंतीत लिखाण दूर जातंय ही जाणीव फार बोचत होती. सह्याद्रीमधे उनाडपणे फिरताना कित्येकदा डायरी सुद्धा सोबत नेली. पण मन हे मोठं चंचल आणि उत्सुकतेनं भरलेलं असल्यामुळे सगळा वेळ फिरण्यात, फोटोग्राफी करण्यात आणि माझ्या सह्याद्रीशी गप्पा मारण्यातच जात असे. मी आणि हा बलाढ्य सह्याद्री दोघेही ठार वेडे आहोत. मी तर महावेडाच. आमचं काय चाललेलं असतं कुणास ठाऊक, पण एक हे एक विचित्र असं प्रेम प्रकरण आहे. आणि प्रेमात सगळं माफ असतं, नाही का ?
 
 
इथल्या १ mm च्या खड्यापासून ते १००० फुटी कातळापर्यंत प्रत्येक वस्तूवर, वास्तूंवर आणि जीवांवर फार जीव आहे माझा. इथलं प्रत्येक पान माझ्याशी बोलतं, प्रत्येक फ़ूल माझ्याशी हसतं, इथला प्रत्येक कातळ मला उभारी आणि करारीपणा देतं, क्वचित प्रसंगी हे कातळ मला रागावतात सुद्धा. कुठेही डगमगलो की शिव्या हासडतात आणि त्याला भिडण्यास प्रोत्साहन देतात. इथला बेफाम वारा म्हणजे फिरता दवाखानाच म्हणा, सगळा थकवा, त्रास, घाम एका क्षणात गायब करण्याचं कौशल्य ह्या वाऱ्यात आहे. इथलं आकाश मला भरारी घेण्याची अनेक स्वप्न बघायला भाग पाडतं, पंखांना बळ द्यायची वेळ झालीये असं बजावत असतं. आकाशाकडे टक लाऊन तासंतास बघत बसण्यात जे सुख आहे त्याला काय कशात मोजणार आपण. ढगांचे बदलणारे आकार, पृथ्वी कशी गोल फिरते ह्याचा होणारा भास, हे सगळं फारच चमत्कारिक आहे.
 
हे सर्व चालू असताना अचानक एक शिकारी पक्षी आकाशात घिरट्या घालताना दिसतो आणि एकाकी तो हवेतल्या हवेत स्थिरावतो. बेफाम वाऱ्याला केवळ दोन पंखांवर झेलत तो स्थिर आणि गंभीरपणे आपली ताकद अजमावत असतो. Wildlife च्या भाषेत सांगायचं झालं तर तो 'Hovering' करताना दिसतो आणि पुन्हा हे चंचल मन त्या पक्ष्याच्या विचारांनी घेरलं जातं. इतकी शक्ती ह्या पंखांमध्ये येतेच कशी ? ह्या प्रकारात लहान पक्षीसुधा अतिशय सफाईदारपणे ही कलाकुसर दाखवत असतात. काही क्षणांच्या ह्या खेळात निसर्ग कितीकाही शिकवून जातो.
 
अशी प्रेरणा घेऊन मी पुन्हा भटकायला चालू करतो तोच पावले पुन्हा थबकतात. आपल्या वजनाच्या कितीतरी पट मोठं वजन एक जंगली मुंगी आपल्या खांद्यावर वाहून नेत असते. कैक वेळेला मी तिला प्रवाहाच्या उलट्या दिशेने प्रवास करताना पाहिलं आहे. केवढीशी ती मुंगी, काय तिची अफाट ताकद आणि दुर्दम्य इच्छाशक्ती. तिला मनोमन सलाम ठोकत माझी पावलं पुढे सरकत असतात. नाना प्रकारच्या पानाफुलांनी आणि अक्राळ विक्राळ जुन्या वृक्षांनी भरलेला माझा सह्याद्री पाहताना एक विलक्षण समाधान असतं. ह्या घनदाट अरण्यात लाखो जीवाणू आपली दिनचर्या नियमितपणे पार पाडत असतात. आपण तिथे जातो तेव्हा नक्कीच त्यांना त्रास होत असणार, कारण हे शेवटी हे त्याचं घर आहे, आपलं नाही. पण आपल्यामुळे त्यांना कसलाही त्रास होऊ न देण्याचा माझा आटोकाट प्रयत्न असतो. आपण सर्वांनीच तसा करायला हवा.

 
 
वरील छायाचित्र जे तुम्ही बघताय ते आहे सह्याद्रीमधल्या एका अफाट, रौद्र, एकाकीपण निडर, बुलंद अश्या 'वजीर 'सुळक्याचं. पहिल्या भेटीतच प्रेमात पडून जावं असा हा नेत्रदीपक सुळका. ह्याचं वर्णन करताना मला शब्द कमी पडतात. इतिहास प्रसिद्ध माहुलीगडाच्या मागच्या बाजूस उभा असलेला हा रांगडा सुळका माझ्यासाठी खरंच खूप खास आहे. इथवर पोहोचणं तसं सोपं नाही. तानसा अभयारण्याच्या अतिशय घनदाट वनातून आणि टेकड्यातुन मार्ग काढत इथवर यायला दुबळं मन असून चालत नाही. महाराष्ट्रात आज जी काही निवडक घनदाट जंगल आहेत त्यापैकी एक असं हे तानसाचं जंगल. पावसाळ्यात ह्याचं सौन्दर्य अतिशय देखणं असलं तरी उन्हाळा मात्र कमालीचा उकाडा सहन करावा लागतो. आणि अश्याच एप्रिल महिन्याच्या रणरणत्या ४० डिग्रीच्या उन्हात मी वजीरचा बेत आखला.
 
तुम्ही म्हणाल काय गरज आहे उन्हात जाण्याची ? पण अहो हे आमचं प्रेम प्रकरण आहे. त्याला काय करणार. असो. तर अश्या भर उन्हात ट्रेक चालू झाला. छातीचा भाला फुलून आला होता. दरमजल करत, निसरड्या उन्हाळी मातीवर आणि पाठीवर फोटोग्राफीचा संसार घेऊन स्वारी पुढे जात होती. ओढ एकच होती. 'वजीर 'ची भेट. बास्स्स. ट्रॅव्हल फोटोग्राफरला ह्या अश्या कसरती केल्याशिवाय गत्यंतर नसतं. त्यामुळे मला जेव्हा कोणी सहज म्हणतं 'तुझी मजा आहे', तेव्हा मला हे वजीर सारखे ट्रेक आठवतात आणि अंगावर काटा उभा राहतो. बऱ्याचदा फोटोमागची कहाणी लोकांपर्यंत पोहोचत नाही. ह्या लेखाच्या निमित्ताने ती पोहोचवण्याचा एक छोटासा प्रयत्न. तर असे एक एक आव्हानं पार करत करत अखेर मला वजीरचं दर्शन घडतं. 'अजि म्या ब्रह्म पहिले' चा भास होतो. डोळे भरून आलेले असतात, शरीर सुखावलेलं असतं आणि मन समाधी अवस्थेत गेलेलं असतं. हे अफाट सौन्दर्य साठवण्यासाठी मला देवाने हजार डोळे का नाही दिले असं उगाच मनात येऊन जातं. काय ते रूप, काय तो आकार आणि काय ती सह्याद्रीची किमया. सगळंच दैवी. वजीरच्या सोबतीला असणारे 'ब्रह्मा, विष्णू आणि महेश 'हे सुळक्यांचं त्रिकुट फारच अक्राळ विक्राळ वाटत असले तरी त्यांचीही वेगळी नजाकत आहे.
 

 
 
अश्या ह्या वजीरच्या अगदी माथ्यावर जायला मात्र आधुनिक प्रस्थारारोहण सामग्री आणि तज्ञ सोबत असल्याशिवाय प्रयत्न करणं शक्य नाही. आपण सुळका जिथून सुरु होतो तिथपर्यंत नक्कीच जाऊ शकतो. गावातील वाटाड्या घेणं केव्हाही चांगलं.
 
भेटूया पुढील लेखात अश्याच एका भन्नाट जागेवर. तोपर्यंत फिरत राहा आणि निसर्गावर भरभरून प्रेम करा.
 
 
- अनिकेत कस्तुरे
 
 
@@AUTHORINFO_V1@@