दोन चाकांवर जगभ्रमंती

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Jan-2018
Total Views |

सायकल तसे सगळेच चालवतात किंवा प्रत्येकाने लहानपणी किमान एकदा तरी सायकल चालवली असेल एवढे नक्की. सायकल चालवण्यात एक वेगळाच आनंद सामावलेला आहे आणि त्यातही सायकलवरुन जगभ्रमंतीची कल्पना कुणी प्रत्यक्षात साकारली असेल तर... होय, अशाच सायकलवेड्यांपैकीच एक म्हणजे पुण्याची वेदांगी कुलकर्णी. वाचून तुम्हालाही आश्चर्य वाटले असेलच, पण ध्येयवेड्या वेदांगीने मात्र हेच या वर्षीचं स्वप्न असल्याचं घोषित केलं आणि या स्वप्नाला सत्यात उतरवण्यासाठी तिचा दैनंदिन सरावही जोरदार सुरु आहे. मुळची पुण्याची व सध्या साऊथ वेस्ट इंग्लंड येथे शिक्षण घेणारी वेदांगी कुलकर्णी ही दि. १५ जून ते दि. २२ सप्टेंबर २०१८ दरम्यान १३० दिवसांत सायकलवरून पृथ्वी प्रदक्षिणा करून गिनीज बुक ऑफ वर्ल्डमध्ये आपला विक्रमनोंदविणार आहे.
 
गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डच्या नियमानुसार, वेदांगी जगातील सर्वांत जलद सायकलवरून पृथ्वी प्रदक्षिणा करणारी सायकलस्वार ठरणार आहे. सध्या ती इंग्लंड येथील बोर्नमथ विद्यापीठात स्पोर्ट्‌स मॅनेजमेंटच्या पदवी अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षात शिकत आहे.
 
अवघ्या १९ वर्षांची असलेली वेदांगी या उपक्रमात ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, अमेरिका, कॅनडा, पोर्तुगाल, स्पेन, फ्रान्स, बेल्जियम, जर्मनी, डेन्मार्क, स्वीडन, फिनलंड, रशिया, मंगोलिया, चीन आदी १५ देशांतून रोज ३२० किलोमीटर सायकल प्रवास एकटीने करणार आहे.
 
या उपक्रमातून तिला ‘साहसाची अमर्याद इच्छा ठेवा, विश्वबंधुत्वाची भावना वाढीस लावा, सायकल प्रवास हा पर्यावरणपूरक आहे,’ आदी संदेश द्यायचे आहेत. यापूर्वी तिने युरोप खंडातून सुमारे २० हजार किलोमीटरचा प्रवास सायकलवरून केला आहे. पुण्याच्या या कन्येच्या उपक्रमास सामाजिक व आर्थिक पाठबळ लाभावे, असे आवाहन वेदांगीचे वडील विवेक कुलकर्णी यांनी केले आहे.
जगभरातील प्रत्येक देशामध्ये सायकलवरुन प्रवास करुन नवा विक्रम आपल्या नावावर कोरण्यासाठी वेदांगी सज्ज आहे. वेदांगी आपल्या जगभ्रमंतीला ऑस्ट्रेलियाच्या पर्थ या शहरापासून सुरुवात करणार आहे. वेदांगीला सायकलवरुन स्वार होत संपूर्ण जगाला सर्वात वेगवान फेरी मारुन नवा विक्रमआपल्या नावे करायचा आहे. यासाठी तिने आपली तयारीही सुरु केली आहे. ती रोज ३२० किमी सायकल चालवण्याचा सराव करते. विशेष म्हणजे, जगभ्रमंतीसाठी वेदांगीने कोणत्याही संघटनेचा पाठिंबा घेतला नाही. वेदांगी ऑस्ट्रेलियावरुन अमेरिकेच्या अलास्कावरुन न्यूझीलंडला जाणार आहे. त्यानंतर कॅनडा, पोर्तुगल, स्पेन, फ्रान्स, बेल्जियम, जर्मनी, डेनमार्क, स्वीडन, फिनलँड, रशिया, मंगोलिया आणि चीनला जाणार आहे. या प्रवासापासून ती ’डींशणिि­पवठळवशजप’ हे अभियान सुरू करणार आहे. महिला जगात न घाबरता काहीही करु शकतात. त्यांना घाबरण्याचे कारण नाही, हा या अभियानामागील वेदांगीचा एक उद्देश. हा अविस्मरणीय सायकल प्रवास वेदांगी कॅमेर्‍यामध्ये कैद करणार आहे आणि भविष्यात ‘लिव्हिंग एडव्हेंचर’, ‘शेअरिंग दी एडव्हेंचर’ या नावाने लघुपट निर्मितीचाही तिचा विचार आहे. वयाच्या अवघ्या १७व्या वर्षी वेदांगीने सायकल चालवण्यास सुरुवात केली. तिचे वडील या जगभ्रमंतीचे व्यवस्थापक आहेत. दरम्यान, वेलिंग्टन (न्यूझीलंड) आणि स्पेन येथून प्रवास करणे सर्वात आव्हानात्मक आहे. त्या दोन जागा व्यवस्थित पार केल्यास दोन ग्रह पार केल्यासारखे असल्याचे वेदांगी सांगते. जुलै २०१६ मध्ये वेदांगी कुलकर्णीने भारतातील सर्वात कठीण समजला जाणारा रस्ताही यशस्वीरित्या पार केला होता. तिने मनालीतील अतिशय धोकादायक अशा मार्गाने सायकल चालवली होती.आपल्या हजारो किमीच्या सायकल प्रवासामध्ये अडचण येऊ नये म्हणून रोज सहा ते आठ तास सलग सायकल चालवण्याचा सराव करत आहे. ट्रायल म्हणून तिने १४ हजार किमी सायकल चालवली आहे. तिच्या या धाडसाला आणि विश्वविक्रमाला शुभेच्छा!
 
- तन्मय टिल्लू 
@@AUTHORINFO_V1@@