इतरांपेक्षा वेगळा विचार करून स्वत:ला केले सिद्ध

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Jan-2018
Total Views |
 
 
जळगावच्या समीर देशमुख यांची पर्यटन क्षेत्रात गरूडभरारी 
प्रत्येक युवक काही ना काही स्वप्न उराशी बाळगतो. मात्र, प्रत्येकाला आपले स्वप्न साकार करण्यात यश येतेच असे नाही. आपल्या आवडत्या क्षेत्राशी निगडित स्वप्न साकार करण्यासाठी जे युवक धडपड करतात; त्यांना यश निश्‍चित मिळते. विशेष म्हणजे, हे यश मनाला विलक्षण आनंद देणारे असते. त्यामुळे युवकांनी आपली आवड काय? हे ओळखणे खूप गरजेचे आहे. इतरांपेक्षा वेगळा विचार करून समीर देशमुख यांनी स्वत:ला सिद्ध केले आहे. पर्यटनाची लहानपणापासून आवड असल्याने याच क्षेत्रात पुढे जायचे, असा निश्‍चय त्यांनी केला होता. पुढे पर्यटन हेच एकमेव ध्येय त्यांनी ठरवले. याच क्षेत्रात करिअर करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले. प्रामाणिक प्रयत्नांना मेहनतीची जोड दिल्याने ते आज पर्यटनक्षेत्रातील यशस्वी व्यावसायिकदेखील ठरले आहेत. उल्लेखनीय बाब म्हणजे जगभरातील विविध प्रेक्षणीय स्थळांची माहिती त्यांच्याकडे आहे. आजवर ज्या प्रेक्षणीय स्थळांची माहिती कुणालाही नाही, कुणी त्या ठिकाणी गेलेले नाही, अशी स्थळे शोधून इतरांना त्या ठिकाणी नेणे, ही त्यांची खासियत. नोकरी मिळत नाही, व्यवसाय करावा तर नेमका काय करावा, असे रडगाणे गाणार्‍या तरुणांनी समीर यांचे उदाहरण डोळ्यासमोर ठेवले तर त्यांना निश्‍चितच काहीतरी मार्ग सापडू शकतो.
 
पर्यटनक्षेत्राचे नुसते नाव घेतले तरी जळगावकरांच्या ओठावर समीर देशमुख हे नाव येते. याला कारणही तसेच आहे. जगभरातील नवनवी प्रेक्षणीय स्थळे शोधून काढणे. नव्या प्रेक्षणीय स्थळांची परिपूर्ण इतरांना माहिती देणे, त्याठिकाणी पर्यटकांना नेणे ही समीर यांची ओळख. पर्यटन क्षेत्रातील यशस्वी व्यावसायिक म्हणून त्यांच्या आजवरच्या प्रवासावर एक नजर टाकली तर आपल्याला त्यांची आवड, ध्येय आणि व्यावसायिकतेबद्दल उत्तम माहिती मिळते. शिक्षणानंतर काय करायचे, हा प्रश्‍न समीर यांच्याही समोर होता. डॉक्टर, इंजिनिअर, वकील, शिक्षक तर कोणीही होते. पण आपण काहीतरी वेगळे करू, हा निश्‍चय त्यांनी केला.
 
पर्यटनाची लहानपणापासून आवड असल्याने त्यांनी याच क्षेत्रात पुढे जाण्याचे ठरवले. आवडीला व्यावसायिकतेची जोड दिली तर यशस्वी होता येईल, हे त्यांनी ओळखले. म्हणून पर्यटनक्षेत्राशी निगडित व्यवसाय करण्याच्या दिशेने त्यांनी पाऊल टाकले. आपल्या आयुष्यात प्रत्येक जण अल्पकाळासाठी का असेना पण पर्यटन करत असतो. मग ती लहान सहल असली तरी आणि विदेश दौरा असला तरी. भविष्यात पर्यटनक्षेत्राची गरज वाढेल, हे समीर यांच्या लक्षात आले होते.
 
स्वत:ला पर्यटनाची आवड असल्याने ते नेहमी कुटुंबासोबत, मित्रमंडळीसोबत प्रेक्षणीय स्थळांना भेटी देत असत. अशा वेळी पर्यटकांना कोणत्या गोष्टींची गरज भासते, कोणत्या सुविधा व माहिती आवश्यक असते, याचा अभ्यास त्यांनी केला. या सार्‍या गोष्टी उपलब्ध करून देणार्‍या टुरिस्ट कंपनीची त्यांनी स्थापना केली. आज या कंपनीच्या माध्यमातून ते पर्यटकांना उत्तम सेवा देत आहेत. या व्यवसायातून त्यांची आवडही जोपासली जात आहे. तसेच पैसाही त्यांना मिळत आहे. हा व्यवसाय सुरू केल्यावर सुरुवातीला त्यांनाही असंख्य अडचणींचा सामना करावा लागला. आपल्या कंपनीचे वेगळेपण लोकांना पटवून द्यावे लागले. इतर स्पर्धक कंपन्यांपेक्षा आपली कंपनी कशी वेगळी आहे, हे लोकांना सांगण्यापेक्षा त्यांनी प्रत्यक्ष तसे दाखवून दिले.
जगभरातील नवनवी ठिकाणे ते शोधतात. त्यासाठी खूप माहिती संकलित करावी लागते. शोधलेल्या पर्यटन स्थळाचे महत्त्व, त्याचा इतिहास, भौगोलिक स्थान, नैसर्गिक वेगळेपण याची माहिती काढून तेथे आधी स्वत: जाऊन खात्री करणे. ते स्थळ आपल्या पसंतीला उतरले की मग त्याची माहिती पर्यटकांपर्यंत पोहचवणे.पर्यटकांना तेथे प्रत्यक्ष सफर घडवून आणणे, असे त्यांचे काम चालते.

 
 
 
पर्यटनक्षेत्रातही उत्तम करिअर
कोणत्या क्षेत्रात करिअर करावे, हा प्रश्‍न प्रत्येक युवकाला हमखास पडतो. आज सर्वच क्षेत्रात प्रचंड स्पर्धा निर्माण झाली आहे. स्पर्धा वाढली असली तर खचून जाण्याचे कारण नाही. जसजशी स्पर्धा वाढत आहे, तसतशी प्रत्येक क्षेत्रात संधीही निर्माण होत आहे. आजची गरज काय? हे जर आपल्याला ओळखता आले तर आपण सर्वकाही मिळवले.
आपण ज्या क्षेत्रात करिअर करण्याच्या दृष्टीने पाऊल टाकले आहे, त्या क्षेत्रात जर कमीतकमी चुका केल्या तर आपला वाढण्याचा वेग वाढतो, असे समीर सांगतात. पर्यटनक्षेत्रात करिअरला खूप वाव आहे. जगात असंख्य प्रेक्षणीय स्थळे आहेत. भारतातही नैसर्गिक विविधता आहे. निसर्गाने भारताला खूप काही दिले आहे. त्यामुळे पर्यटनक्षेत्राची दिवसेंदिवस गरज वाढत आहे. ही गरज ओळखून या क्षेत्रात चांगला जम बसवता येऊ शकतो. जगापेक्षा भारतातील नैसर्गिक विविधता वेगळी आहे. भारत विविध अंगांनी नटलेला देश आहे.
 
जगात दुबई, सिंगापूर यासारखी प्रेक्षणीय स्थळे आहेत. परंतु, ती मानवनिर्मित आहेत. या उलट भारतातील वाईल्ड लाईफ, ऐतिहासिक-धार्मिक स्थळे वेगळी आणि सुंदर आहेत. आपली खाद्यसंस्कृतीदेखील जगापेक्षा भिन्न आहे. हीच नैसर्गिक विविधता आणि वेगळेपण अनुभवण्यासाठी जगभरातील पर्यटकांचा भारतात येण्याचा ओढा वाढला आहे. त्यामुळे पर्यटनक्षेत्राची गरज दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे युवकांनी या क्षेत्रात करिअर करण्याच्या दृष्टीने जरूर विचार केला पाहिजे, असे समीर देशमुख आवर्जून सांगतात.
 
स्पर्धेत उतरा, वेगळे करा!
आज सर्व क्षेत्रात स्पर्धा असली तरी संधीच्या वाटादेखील खूप आहेत. फक्त संधी ओळखता आली पाहिजे. कोणत्याही क्षेत्रात उतरल्यावर कमीत कमी चुका करा. त्यामुळे त्या क्षेत्रात वाढण्याचा वेग वाढतो. परफेक्शनही वाढत जाते. स्पर्धेला घाबरू नका. स्पर्धेत उतरा. इतरांपेक्षा वेगळा विचार करा. प्रत्येक क्षेत्रात एक वेगळा विकल्प असतो. त्याचा नक्की विचार करा. हे सर्व करत असताना स्वत:ची क्षमता ओळखा. क्षमतेनुसार स्वत:ला सिद्ध करा. यश निश्‍चित मिळेल, असा मौलिक सल्लाही समीर देशमुख यांनी युवकांना दिला आहे.
@@AUTHORINFO_V1@@