हवी वेगळी ओळख

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Jan-2018
Total Views |
 
 
 
सध्या युवावर्गाला आपली ओळख वा प्रतिमा निर्माण होण्यासाठी समाजमाध्यमांमधील आपला सहभाग तसा महत्त्वाचा वाटतो. हा सहभाग या पिढीची ओळख वा प्रतिमा निर्माण होण्यासाठीच्या घडामोडींवर प्रभाव टाकणारी प्रक्रिया ठरते आहे. माध्यमांच्या प्रसार- प्रचाराच्या जोडीने नजीकच्या काळात हा प्रभाव वाढत जाणार आहे. त्यामुळे राष्ट्रीय युवक दिनाच्या निमित्ताने का होईना, युवकांना सातत्याने त्यांना हवी ती वेगळी ओळख देणार्‍या, त्यामध्ये बदल घडवू शकणार्‍या या एका महत्त्वाच्या मुद्द्याचा विचार करणे रास्त ठरते. 
 
 
 
सध्या तरुणांच्या चर्चांमध्ये समाजमाध्यमे, त्यावरील वेगवेगळे अपडेट्स, स्वतःचेच नव्हे तर इतरांचे, विशेषतः सेलिब्रिटींचे स्टेटस, एकमेकांच्या कमेंट्स- लाइक्स, ट्रोल्स आदी मुद्द्यांना महत्त्वाचे स्थान मिळत आहे. या पूर्वीच्या टप्प्यावर ‘कोणी काय वाचले’, या मुद्द्याला दिले जाणारे महत्त्व आता ‘कोणी कोणाचं ऑनलाइन काय वाचलं’, या मुद्द्याकडे वळले आहे. त्यांच्या आवडी-निवडीवरही समाजमाध्यमांमधून पुढे येणार्‍या वा ऑनलाइन उपलब्ध असलेल्या घटकांचा प्रभाव वाढतो आहे. 
 
 
 
 
हा सहभाग वाढत असताना समाजमाध्यमांच्या अतीवापरातून समोर येणारे दुष्परिणाम तरुणाईला ओळख मिळवून देणार्‍या या व्यासपीठाविषयी साशंकता निर्माण करू लागले आहेत. समाजमाध्यमांच्या वापराच्या सवयीचे गुलाम बनलेल्या अनेकांसाठी या माध्यमांपासून दुरावल्याने अस्वस्थ वाटू लागते. आपल्याला आणि इतरांनाही आदर्श वाटेल अशा पद्धतीचे प्रोफाइल आणि वैयक्तिक आयुष्य यामधील झगडा वाढला आहे. आपली खरी ओळख वेगळी ठेवत, समाजमाध्यमांमधून आभासी ओळख जगापुढे मांडणार्‍यांना ऑनलाइन- ऑफलाइन आयडेंटिटी क्रायसिसला सामोरे जावे लागते. तर, आपली ओळख अनामिक वा भलतीच असल्याचे दर्शविणार्‍यांसाठी वैयक्तिक पातळीवरील आयुष्य हे अगदीच वेगळे भासू लागले आहे. स्वतःची खरी ओळख झाकून ठेवण्याचे प्रयत्न नव्या पिढीसाठी तसे त्रासदायकच ठरू लागले आहेत. नव्याने समोर येणार्‍या माध्यमाधारित सौंदर्याच्या कल्पनांमुळे स्वतःच्या रंग-रुपाविषयी काहीशी अपराधीपणाची भावनाही निर्माण होऊ लागली आहे. 
 
 
 
वास्तविक, स्वतःविषयीची वेगळी जाणीव निर्माण होण्याचे हे वय आहे. आपली स्वतःची नेमकी ओळख निर्माण करण्यासाठीचे एक व्यासपीठ म्हणून समाजमाध्यमांचा वापर सहज शक्य आहे. अर्थातच, त्यासाठी सकारात्मक पद्धतीने त्याचा वापर करण्याची कला आपल्याला शिकून घ्यावी लागणार आहे. समाजमाध्यमे ही नवकल्पनांना वाव देणारी व्यासपीठे ठरतात. जगाच्या कोणत्याही कोपर्‍यापर्यंत तुम्हाला नेऊन पोहोचविणारी, भौगोलिक वा राजकीय सीमारेषांच्या कोणत्याही बंधनांमध्ये न अडकणारी ही व्यासपीठं तुम्हाला काही क्षणांमध्ये ‘लोकल टू ग्लोबल’ प्रवास करवू शकतात. तुम्ही- आम्ही याची जाणीव ठेवायला हवी. त्यातूनच कधी तरी आपल्यातला एखादा कलाकार पुढे येईल, किंवा एखादा लेखकही बहरेल. क्रिया- प्रतिक्रियांमधून एखाद्या गंभीर समस्येवर नाविन्यपूर्ण उपायही कधी तरी सुचेल. अर्थात, त्यासाठी ‘देशाची जबाबदार युवा पिढी’ ही हवीहवीशी ओळख मिळविण्यासाठी युवा पिढीला या समाजमाध्यमांचा वापरही असाच जबाबदारीने करावा लागणार आहे. तरुणाईची ओळख म्हणून समाजमाध्यमे नव्हे, तर ‘समाजाला प्रगतीपथावर ठेवण्यासाठीची कल्पक समाजमाध्यमे पुढे चालविणारी फळी म्हणजे तरुणाई’, ही ओळख केवळ स्वतःलाच नाही, तर समाजासाठीही उपयुक्तच ठरणार आहे. 
 
 
 
वैयक्तिक पातळीवर सातत्याने हव्याहव्याशा वाटणार्‍या स्वातंत्र्याला समाजमाध्यमांनी एक वेगळी वाट करून दिली आहे. समाजमाध्यमांमधून किमान व्यक्त होण्यासाठीची एक सहजसुलभता सर्वांनाच मिळवून दिली आहे. ही सहजसुलभताच तरुणाईला समाजमाध्यमांच्या व्यासपीठाकडे आकर्षित करण्यासाठी तशी कळीचा मुद्दा बनली आहे. केवळ तरुणांचेच नव्हे, तर समाजमाध्यमांचेही हे ‘स्पॉन्टेनियस’ स्वरुप समाजमाध्यमांवर तरुणाईचा सहभाग वाढवतच निघाले आहे. 
 
 
आजच्या तरुणाईचे वैशिष्ट्य कोणते, असा प्रश्न जर तुम्हा- आम्हाला कोणी विचारला, तर कदाचित एकमत होईल तो मुद्दा म्हणजे युवावर्गाकडून होणारा माध्यमांचा, विशेषतः समाजमाध्यमांचा वापर. वयोगटानुसार बाकी सगळे गट एका बाजूला आणि तरुणाई दुसर्‍या बाजूला ठेवली, तरी समाजमाध्यमांच्या वापराबाबत तरुणवर्ग इतरांच्या तुलनेत वरचढ ठरतो, हे आजचे वास्तव आहे. पारंपरिक माध्यमेही या मुद्द्याचा गांभीर्याने विचार करतात. 
 
 
(लेखक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संज्ञापन व वृत्तपत्रविद्या विभागामध्ये सहायक प्राध्यापक आहेत.)
 
 
@@AUTHORINFO_V1@@