अनिष्ट सवयींचा गुलाम होतोय आजचा तरुण...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Jan-2018
Total Views |
 
 
- प्रा.पद्माकर एस.महाजन 
 
शिकागो येथील जागतिक सर्व धर्म परिषदेत My brothers and Sisters असे भावूक उद्गार काढून आपल्या अमृतवाणीने सर्वांची मने जिंकणार्‍या स्वामी विवेकानंद यांची आज जयंती. स्वामीजी म्हणजे भारतीय संस्कृतीचे प्रतिबिंब म्हणूनच कधी कधी मनात विचार येतो की, आजच्या युवा पिढीने स्वामीजींनी दिलेल्या विचारांचं, संस्कारांचं अनुकरण केलं तर...? पण आज युवकांकडे बघून एकच उत्तर मिळत मछेफ. कारण आजचा तरुण बदललाय. हा तरुण स्वामीजींच्या स्वप्नातला तरुण नाहीच. मग तो तरुण कसा होता? तर तो सुसंस्कारी, सुविचारी, सुशिक्षित, आज्ञाकारी, समाज घडवणारा, देश घडवणारा होता. पण का कुणास ठाऊक, आजच्या एकंदर परिस्थितीने तो ग्रासला आहे, गुलाम बनला आहे.
 

 
 
गुलाम कुणाचा? तर व्यसनांचा आणि वाईट सवयींचा. आपण आजचा हा दिवस ‘युवक दिन’ म्हणून साजरा करतो. अर्थातच आपल्या देशाच्या, समाजाच्या प्रगतीची धुरा युवकांच्या हातात असली पाहिजे, त्यासाठी युवकांनी पुढे यावे असा स्वामीजींचा विचार होता. पण आज तशी स्थिती दिसत नाही. खरोखर देशाचा विकास घडवून आणायचा असेल तर तरुणांनी शैक्षणिक, सामजिक, अध्यात्मिक क्षेत्रांमध्ये स्वतःला झोकून दिले पाहीजे. सृजनशिल विचार करुन आपल्या आजूबाजूचा प्रत्येक व्यक्ती सुखसमाधानाने कसे जीवन जगेल? असा विचार करणे प्रत्येक तरूणाचे कर्तव्य आहे. आपल्या सभोवतालच्या तरुणांकडे पाहून प्रत्येक मुलीला सुरक्षित वाटलं पाहिजे. पण स्वामीजींच्या स्वप्नातल्या भारतातली आजची स्थिती खूपच वाईट आहे, देशात स्त्री सुरक्षित नाही. त्यांची छेड काढणारे दहा विकारांचे रावण रस्तोरस्ती मोकाट फिरत आहेत.
 
मला विवेकानंदांचे एक उदाहरण आठवते. त्यांचं तेजस्वी व सुंदर रुप पाहून एका स्त्रीने त्यांना थेट लग्न करण्याची विनंती केली होती. तेव्हा स्वामीजींनी त्या स्त्रीला विचारलं की, तुम्हाला माझ्याशीच लग्न का करायचे? त्यावर त्या स्त्रीने उत्तर दिले. ‘मला तुमच्यासारखाच हुशार, चेहर्‍यावर तेज असणारा मुलगा हवा आहे’ त्यावर विवेकानंदांनी सुंदर उत्तर दिले. त्यासाठी माझ्याशी लग्न करण्याची काय गरज? तुम्ही मलाच आपला मुलगा माना ना? असे उत्तर फक्त विवेकानंदच देऊ शकतात. जर त्यांच्या विचारांचा आधार घेऊन आजचा तरुण समाजात वावरु लागला तर कदाचित निर्भया आणि कोपर्डी सारख्या घटना टळू शकतील. पण आज तशी फक्त कल्पनाच केलेली बरी. कारण व्यसनं, स्वैराचार, दुराचार आणि अविचाराने वागणारा आजचा युवक आपल्या वर्तनात, विचारात, संस्कारात, आचरणात बदल घडवून आणेल तरच चांगल्या गोष्टी शक्य आहेत. खर्‍या अर्थानं हीच स्वामी विवेकानंदांना खरी आदरांजली आणि अभिवादनही ठरेल. तरुणांनी स्वामी विवेकानंद यांच्या विचारांवर चालले पाहिजे. तरच खर्‍या अर्थाने विकास होईल.
 
@@AUTHORINFO_V1@@