विस्मृतीत गेलेल्या म्हणी आणि वाकप्रचार भाग – ५०

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Jan-2018   
Total Views |
 

 
 
अवंती: मेधाकाकू...तुझ्या घरातून खमंग दरवळ पसरलाय सगळीकडे...काय बेत आहे आज...??..हा खमंग दरवळ मला ओळखता आलाच पाहिजे...कारण त्यात खास अशी मराठी संस्कृतीची ओळख आहे...आपल्या तीळ+गुळाच्या लाडवांची...बरोबर आहे ना मेधाकाकू...??
 
 
मेधाकाकू: अवंती...अगदी बरोब्बर ओळखलेस...तिळगुळाचे लाडूच करतायत आजी...!!..आपल्या मागच्या अभ्यासात, तीर्थक्षेत्रे-शहरे-महिने आणि माणसांच्या नावांचा वापर म्हणी-वाकप्रचारातून झाल्याचा उल्लेख मी केला...!!..आपल्या चतुर पूर्वजांनी किती वेगळ्या आणि अनोख्या प्रकारे, या लोकश्रुतींमधून उत्तम समाज व्यवहारांचे अगदी सूक्ष्म संदेश शतकांपासून प्रसारित करायचे महान कार्य केलेले आहे, त्याची कल्पना सुद्धा आपण करू शकणार नाही...!..आज अचानक ज्ञाती-वर्णभेदांचे वणवे नव्याने पेटवले जाताना आपल्याला दिसते आहे. मात्र...काही शतकांपूर्वीपासून प्रचलित असलेला हा वाकप्रचार बघ, तत्कालीन समाजाचे मानसिक आरोग्य किती उत्तम होते त्याचा परिचय...!!.. जगन्नाथका भात जगत् पसारे हात.
 
आधुनिक विज्ञानाला सतत आव्हान देणाऱ्या, जणू पंचमहाभूते वश करून घेणाऱ्या पुरीच्या जगन्नाथ मंदिराचे वैशिष्ट्य इथे नव्याने सांगायची आवश्यकता नाही. त्याच्या अनेक अद्भूत आख्यायिकांपैकी एक म्हणजे... जगत् पसारे हात असे वर्णन या वाकप्रचारात करताना, अगणित श्रद्धाळू-भाविक अतिथी प्रसादाचे भोजन करून गेले तरीहि अक्षयपात्राचा आशीर्वाद प्राप्त झालेल्या जगन्नाथाच्या रसनागृहामधे पदार्थांची कमी कधीच निर्माण होत नाही...!!..मग लक्षात येते कि, जगत् पसारे हात...म्हणजेच श्रद्धाळू-भाविक अतिथीप्रती कुठलाही ज्ञाती-वर्णभेद इथल्या भक्ती परंपरेत केला गेला नाही...!!..समाजातील प्रत्येक भाविक, जगन्नाथाच्या या आशीर्वाद स्वरूप प्रसाद भोजनाचा लाभ अनेक शतकांपासून घेत आला आहे.
अवंती: होय...मेधाकाकू, आदित्यने पुरीतील या जगन्नाथाच्या मंदिराची गोष्ट मला सांगितली आहे...!!..खरेच त्याने खूप विलक्षण अनुभव घेतले आहेत तिथे आणि तू म्हणालीस तसे आधुनिक विज्ञानाला पडलेले न सुटणारे कोडेच आहे हे...!!..
 
मेधाकाकू: अवंती...आपल्या पूर्वजांनी, विज्ञानाच्या पायावरच प्रत्येक सामाजिक आणि व्यक्तिगत व्यवहाराची-सण-समारंभांची-व्रत-वैकल्यांची ऋतुमानानुसार बांधणी केली आहे हे आपल्याला अभ्यासाने जाणवते. मात्र शहरांची-व्यक्तींची नावे वापरतानाच या लोकश्रुतींमधे दुसरा एक गमतीचा स्वाद सुद्धा आहे तो फारच वेगळाहि आहे...!!
ज्याचे खिशात सुर्ती तो मंगलमूर्ती.
 
काही शतकांपासून गुजरातेतील सुरत हे उद्यमी शहर, हिरे घडाई-कापड निर्मितीसाठी फार प्रसिद्ध आहे. शिवाजी महाराजांनी दोनवेळा हे संपन्न शहर लुटले आहे हे सुद्धा आपल्याला माहित आहे. तिथे नोकरी–व्यवसाय करणाऱ्या हुन्नरी नागरिकाला उत्तम मानधन सुद्धा मिळते हे सुद्धा प्रत्येकाला माहित असते. सुरतेहून आलेली अशी सधन व्यक्ती प्रत्येकाला नेहेमीच जवळची वाटते आणि अशा व्यक्तीला समाजात मान दिलं जातो...!!.. ‘ज्याचे खिशात ”सुर्ती”’ या तीन शब्दांतले सुर्ती हे संबोधन, सुरतेहून आलेल्या अशा धनवान व्यक्तीला संबोधित करते आणि ‘तो “मंगलमूर्ती”’ अखेरच्या या दोन शब्दांत त्याच्या विषयी मान आणि आदर व्यक्त करते. अशी विनोदाची हलकीशी छटा आपल्याला अनेक म्हणी आणि वाकप्रचारात दिसते.
 
अवंती: अरेच्या...मेधाकाकू...कित्ती गमतीचे आहे असे सगळे...!!..म्हणजे हि लोकश्रुती नुसती शब्दांची जुळणी नाही तर त्यातून थोडेसे मनोरंजन सुद्धा होत असावे...त्या त्या काळांत...!!..आपल्या मायबोलीची अशी रोज नव्याने होणारी ओळख फारच मजेची आहे...!!..
 
 
मेधाकाकू: अवंती...आज सुरवातीला तुला तिळगुळाचे लाडू बनतायत त्याचा दरवळ जाणवला...म्हणजे सगळ्याना पौष महिन्याचे आणि संक्रांतीचे वेध लागले...!!..पौष-माघ-फाल्गुन हे हिंदू वर्षातील शेवटचे तीन महिने...!!..आता हि वरकरणी अशिक्षित वाटणारी वृद्ध आजी, बोली भाषेत तिच्या नातवंडाना काय सांगते आहे बघूया आपण...!!..
पुस करी हूस, माही येई लाहू, शिमगा म्हणे हळूच जाऊं.
 
बोली भाषेचा अंदाज घेता, माझ्या मते हि आजी मराठवाड्यातील असावी. या वाकप्रचारातून हि आजी या तीन महिन्यांचा महिमा नातवंडाना सागते आहे. ‘पुस करी हुस’ या तिच्या पहिल्या तीन शब्दांत आलेला पुस म्हणजे ‘पौष’ महिना. या महिन्यात ऋतुमानानुसार थंडीचा कडाका असतो आणि प्रत्येकजण हुस-हुस करीत असतो. ‘माही येई लाहु’ मधला माही म्हणजे ‘माघ’ महिना...!!..या महिन्यात शेतातील घान्य पिकलेले असते आणि शेतात राबताना प्रत्येक दिवस मोठा वाटतो. ‘शिमगा म्हणे हळूच जाऊ’ या आजीच्या शेवटच्या चार शब्दांत मात्र आनंद पुरेपूर भरलेला असतो. शिमग्याचा सण म्हणजे वर्षाचा अखेरचा ‘फाल्गुन’ महिना...!!..शेतीची कामे अटोपलेली असतात आणि होळी आणि शिमग्याच्या सणाची गम्मत अनुभवतांना महिना कसा पटपट संपून जातो आणि प्रत्येकाला महिना लवकर संपल्याची हुरहूर लागते. महिन्याला अजून थोडे दिवस जोडता येतील का असा गमतीचा विचार ‘शिमगा म्हणे हळूच जाऊं’ या चार शब्दात आजी नातवंडाना सांगत असावी असे वाटत रहाते.
 
अवंती: आहा...सही...एकदम सही...मेधाकाकू...तुझ्या या वर्णनातली आजी बहुतेक माझ्या आजीसारखीच असावी...विनोदाची उत्तम जाणीव असलेली आजी...!!..मेधाकाकू...मातृभाषे फारच वेगळा स्वाद आज तू चाखायला दिलास...अवाक केलेस...पुन्हा एकदा...!!..
 
 
- अरुण फडके
 
@@AUTHORINFO_V1@@