प्राध्यापकाची नोकरी नाकारत आवडीसाठी धरली वेगळी वाट

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Jan-2018
Total Views |
 
 

 
 
 
 
 
विज्ञान शाखेत उच्च शिक्षण घेतल्यानंतर प्राध्यापकाच्या नोकरीची संधी चालून आलेली परंतु, आवडीच्या क्षेत्रात पुढे जाण्यासाठी ती नाकारली अन् नाटक, चित्रपट क्षेत्रात लहानपणापासूनच विशेष रस असल्याने याच क्षेत्रात करिअर करायचे, अशी जिद्द योगेश कुलकर्णी यांनी मनाशी बाळगली आणि त्यात ते यशस्वीही झाले. अनेक अडचणींतून मार्ग काढत त्यांनी सामाजिक विषयावरील ‘मोल’ या चित्रपटाची निर्मिती केली अन् आपली जिद्द पूर्ण केली. संकटांना न जुमानल्यानेच त्यांना यश मिळू शकले. युवकांनीही आपल्या आवडीच्या क्षेत्रात पुढे जावे. त्यासाठी कोणतीही तडजोड करू नका, आव्हाने स्वीकारा, मेहनत करा, अस सांगतोय खान्देशपुत्र योगेश कुलकर्णी.
 
 
धुळे जिल्ह्यातील साक्री हा फारसा प्रकाशझोतात नसलेला तालुका. या तालुक्यातील कासारे येथील योगेश कुलकर्णी यांनी सामाजिक समस्येवरील ‘मोल’ या खान्देशी बोलीभाषेतील चित्रपटाची निर्मिती केली. अल्पावधितच तो सुपरहिट झाला आणि सर्वांच्या नजरा साक्री आणि योगेश कुलकर्णी यांच्या वळल्या. प्राथमिक, माध्यमिक शिक्षण ग्रामीण भागातच घेतल्यानंतर पुढील शिक्षणासाठी योगेशने गाव सोडले. लहानपणापासून अभ्यासात हुशार. नाटक, चित्रपट क्षेत्राविषयी विलक्षण आकर्षण. महाविद्यालयीन जीवनात अनेक नाटकांमध्ये अभिनय केला. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात एम.एस्सी.चे शिक्षण घेत असताना ‘युवारंग’ महोत्सवात उत्कृष्ट अभिनयाबद्दल सुवर्णपदक पटकावले. पदव्युत्तरचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर प्राध्यापकाच्या नोकरीची संधी चालून आली. परंतु, आवडीच्या क्षेत्रात जाण्याची ओढ असल्याने त्यांनी ही संधी नाकारली. नाटक, चित्रपट क्षेत्रातच करिअर करण्याचे ठरवून ते मुंबईत गेले. त्यांना अभिनयाचा फक्त अनुभव होता. प्रत्यक्ष चित्रीकरण कसे होते, याची माहिती नव्हती. त्यामुळे स्वत:ला ‘प्रूव्ह’ करण्यासाठी ते असंख्य लोकांना भेटले. अशा स्थितीत शिकवण्यादेखील घेतल्या. हळूहळू मार्ग दिसला. मुंबईत सुरुवातीला लहान-सहान जाहिराती आणि नाटकांमध्ये काम केले. थोडा जम बसल्यावर मित्रांच्या मदतीने स्वत: चित्रपटाची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला आणि ‘हमके माफी देई दे’ हा भोजपुरी चित्रपट पहिल्यांदा निर्माण केला. विशेष म्हणजे भोजपुरी सुपरस्टार मनोज तिवारी यांचे याच चित्रपटातून पदार्पण झाले. त्यानंतर निर्माता म्हणून योगेश यांनी ‘पिंजरेवाली मुनिया’ हा दुसरा चित्रपट काढला. या चित्रपटात त्यांनी रवी किशन, मकरंद अनासपुरे, आशिष विद्यार्थी, मोहन जोशी, कुलदीप पवार यासारख्या दिग्गज कलाकारांसोबत काम केले.
 
निर्माता-दिग्दर्शक म्हणून आपल्या खान्देशच्या बोलीभाषेत चित्रपट काढण्याची योगेशची इच्छा होती. परंतु, कोणत्या विषयावर चित्रपट काढायचा? हा मोठा प्रश्‍न होता. ग्रामीण भागात व्यसनाधिनता ही प्रमुख सामाजिक समस्या असल्याचे त्यांच्या ध्यानी आले आणि याच समस्येबाबत प्रबोधन करणारा चित्रपट काढण्याचे ठरवले. चित्रपटाचा आशय अधिक व्यापक व्हावा, यासाठी योगेश यांनी खान्देशातील सुमारे ५० कलाकारांना या चित्रपटातून रजतपटावर येण्याची संधी दिली. या चित्रपटातून त्यांनी व्यसनमुक्तीचा संदेश दिला आहे.
 

 
 
बोलीभाषेत चित्रपट  काढण्याची जिद्द
 
निर्माता-दिग्दर्शक म्हणून आपल्या खान्देशी बोलीभाषेत चित्रपट काढण्याची योगेश कुलकर्णी यांची इच्छा होती. परंतु, कोणत्या विषयावर चित्रपट काढायचा? हा त्यांच्यासमोर प्रश्‍न होता. ग्रामीण भागात व्यसनाधिनता ही प्रमुख सामाजिक समस्या असल्याचे योगेश यांच्या ध्यानी आले. याच समस्येबाबत प्रबोधन करणारा चित्रपट काढण्याचे ठरवले. चित्रपटाचा आशय अधिक स्पष्ट व्हावा, यासाठी योगेश यांनी खान्देशातील ५० कलाकारांना या चित्रपटात काम करण्याची संधी दिली. व्यसनमुक्तीचा संदेश या चित्रपटातून त्यांनी दिला आहे.
व्यसनमुक्तीसाठी कार्य
 
व्यसनाधिनता ही सामाजिक समस्या ग्रामीण भागात अधिक दाहक आहे. अनेक संसार त्यामुळे उद्ध्वस्त होत आहेत. हे कुठेतरी थांबावे, यासाठी योगेश कुलकर्णी पुढाकार घेऊन काम करीत आहेत. शाळा-महाविद्यालयांमध्ये जाऊन व्यसनमुक्तीचा संदेश देत आहेत. विद्यार्थीदशेपासूनच चांगले विचार अंगिकारले तर पुढच्या आयुष्यासाठी चांगली प्रेरणा मिळते, हा विचार 
विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवत आहेत. चित्रपट, नाटकांच्या माध्यमातून योगेश व्यसनमुक्तीसाठी प्रयत्नशील आहेत. व्यसनांच्या आहारी जाऊ नका. क्षणिक मोह टाळा. स्वामी विवेकानंदांच्या विचारांमध्ये प्रचंड शक्ती आहे. हे विचार आत्मसात करा. ध्येय गाठेपर्यंत थांबू नका. हे करीत असताना आवडीच्या क्षेत्रात पुढे जा, असा सल्ला ही योगेश यांनी युवकांना देतात. 
 
 
@@AUTHORINFO_V1@@