नाना करतात कोड असणार्‍यांना बेदाग!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Jan-2018
Total Views |

 रोगमुक्तीसाठी संसाराचा त्याग करून कार्य


हिंगणघाट : ‘दाग अच्छे है’ असे जाहिरातीत कितीही सांगितले तरीही शरीरावर, कपड्यांवर किंवा मग माणसाच्या प्रतीमेवर पडलेले डाग व्यक्तीही स्वीकारत नाही अन् समाजही... एरवी त्वचा गोरीच हवी असते मात्र तेच डाग कोडाचे असतील तर मात्र माणसे दूर पळतात. अशा कोडाच्या डागांवर अक्सीर इलाज सापडल्यावर त्याने समाजाचे भले करण्यासाठी नाना ढोमणे यांनी घरदार सोडले आहे आणि अत्यल्प शुल्कांत ते उपचार करतात. 

नानांचे वय आता ८४ चे आहे. मात्र समाजसेवेची ऊर्जाच त्यांना अगदी ठणठणीत ठेवते आहे. अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यातील जमानापूर या दुर्लक्षित खेड्यांत ते राहतात. वैद्यकशास्त्रात असाध्य समजल्या जाणार्‍या पांढर्‍या डागावर (कोड) आयुर्वेदिक उपचार करून अनेक रुग्णांना त्यांनी दिलासा दिल्याचे सांगतात. 

विशेष म्हणजे जमनापूर या आडवळणाच्या गावी विदर्भातून व विदर्भाबाहेरून येणार्‍या रुग्णाकडून ते फी तर घेत नाहीच उलट त्यांच्या जेवणाची विनामूल्य व्यवस्था करतात. आवश्यकता असल्यास मुख्य मार्गाने ने-आण करण्याची व्यवस्था करतात. या कार्यासाठी कोणतीही वर्गणी किंवा देणगी ते स्वीकारत नाहीत. या आडवळणाच्या गावी रुग्णांना प्रत्येक वेळी येणे शक्य नाही, नाना महिन्यांतून दोन वेळा विशिष्ट दिवशी हिंगणघाट व नागपूर येथे जाऊन रुग्णांवर उपचार करतात.

नाना ढोमणे हे ७ ते ८ वर्षांपासून हिंगणघाट येथील न्यू म्युनिसिपल हायस्कूल सिंधी कॉलनी जवळ दर महिन्याच्या पहिल्या रविवारी व दुसर्‍या दिवशी सोमवारी नागपूर येथील गणेशनगर वनिता महिला महाविद्यालयाच्या मागे असलेल्या हनुमान मंदिरांत रुग्णांची तपासणी करतात.

नानाजी ढोमने यांच्याकडे औषध घेण्यासाठी येणार्‍या अनेक रुग्णांशी चर्चा केली असता त्यांनी नानाजींच्या औषधीचा चांगलाच फायदा झाल्याचे सांगितले. पांढरे डाग या रोगावर औषध नसल्याचे आयुर्वेदाचा अभ्यास करणार्‍या नानाजींच्या लक्षात आले व अविरत परश्रिम करून त्यांनी पांढर्‍या डागावर औषध शोधून काढले. ही औषधे ते नाममात्र केवळ 30 रुपयात देतात. त्यांनी तयार केलेली ही पुडी नियमितपणे घेतल्यास सहा महिने ते एक वर्षाच्या काळात या औषधांचा गुण दिसून येतो व वर्षाच्या आत पांढरे डाग असलेली व्यक्ती पूर्णतः रोगमुक्त होऊ शकते, असा त्यांचा दावा आहे.

सतत आयुर्वेदाचा अभ्यास करण्याची आवड असल्याने त्यांनी स्वत: या असाध्य रोगावरील औषध शोधून काढलेले आहे. नानाजींना चार मुले आहेत. ती सर्व विवाहित असून आपल्या मूळ गावी वडिलोपार्जित शेती सांभाळतात. मुलांचा संसार मार्गी लावून दु:खितांचे अश्रू पुसण्यासाठी संसाराचा त्याग करून आपले संपूर्ण आयुष्य मनुष्यमात्राच्या सेवेत घालवण्याचा संकल्प नानाजींनी सोडलेला आहे.
- सतीश वखरे 
@@AUTHORINFO_V1@@