‘रोबोटी’करण आपलेही...!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Jan-2018
Total Views |
 

 
 
गेल्या आठवड्यात त्या रोबोबाईबद्दल लिहिताना, यंत्रं कशी माणसाळत आहेत, यावरच बोलता आले. रोबो म्हणजे माणसाळलेली यंत्रेच आहेत. ती माणसांची कामे बिनदिक्कत करतात. माणसांनाही जमणार नाही इतक्या कौशल्याने रोबो आता काही कामे करू लागली आहेत. तिकडे जपानमध्ये एका विद्यापीठात आता समुपदेशनाला (अर्थात माणसांच्या) रोबो असतात. ती माणसांचे म्हणणे नीट ऐकून घेतात अन् त्यांचे विश्लेषण करतात. त्यावर मग भाष्य करतात. अगदी मोजक्या शब्दांत बोलतात. अभ्यासक, शास्त्रज्ञांचे म्हणणे असे की, माणसांचे समुपदेशन करण्यासाठी रोबोच उत्तम आहेत! अर्थात, या प्रकारावर टीका झाल्यावर शास्त्रज्ञांनी त्यांची ही बाजू मांडली आहे. माणसानेच माणसांचे समुपदेशन केले तर त्यात पूर्वग्रह येण्याची शक्यता असते, असे त्यांचे म्हणणे आहे. माणसे ग्रह किंवा पूर्वग्रहांनीच एकमेकांशी वागत असतात. अगदी पहिलीच भेट असली, तरीही प्रथमदर्शनी आपले त्या व्यक्तीबद्दल मत तयार होत असते. त्यानुसार बर्‍याचअंशी आपण त्याच्याबद्दल वागत असतो. ‘लव्ह अ‍ॅट फर्स्ट साईट’ नावाचा प्रकार आपण मान्य केलेला आहेच. तसे समुपदेशकांचेही होऊ शकते. अगदी नेणिवेच्या पातळीवर या गोष्टी घडून जात असतात. रोबो मात्र त्यांच्या प्रोग्रामिंगनुसारच वागत असतात. त्यामुळे रोबोकडून समुपदेशन नीट होऊ शकते...
 
तर रोबो आता माणसांसारखे वागू लागले आहेत. परवा ती रोबो तरुणी विवाहाविषयीदेखील अगदी समजून बोलत होती. रोबोंचे मानवीकरण हा ललित साहित्याचा विषय झालेला आहे. कथासूत्र आणि त्या कथेचा नायक/नायिका असे रोबो असलेल्या अनेक कथा आपण ऐकल्या आहेत. पाहिल्यादेखील आहेत. माणसांसोबत राहता राहता रोबोंचे मानवीकरण होण्याची शक्यता केवळ साहित्यिकांनीच नाही, तर शास्त्रज्ञांनीही नाकारलेली नाही! मानवी संवेदनांचे प्रोग्रामिंग झाल्यावर त्याच्याशी समरस होण्याची शक्यता नाकारता येतच नाही. अगदी अशीच प्रक्रिया माणसांच्या बाबतही होऊ शकते. माणसांचेही रोबोटीकरण होऊ शकते. माणसाने आपल्या जगण्याचे यांत्रिकीकरण केलेलेच आहे. अगदी सकाळी उठल्यापासूनच आपण यंत्रांच्या सहवासात असतो. त्या दृष्टीने आपण एकान्तात कधीच नसतो. अगदी खोल एकान्तातही आपल्यासोबत दुसरे काहीच नसले, तरीही यंत्रे असतातच! एका खोलीत आपण स्वत:ला कोंडून घेतले, तरीही डोक्यावर पंखा गरागरा फिरतच असतो आणि त्याच्या तशा फिरण्याचा आपल्या संवदेना आणि मेंदूच्या विचारप्रक्रियेवर परिणाम होतच असतो. तो आपण कितीही प्रयत्न केले तरीही टाळूच शकत नाही.
 
आजकाल मोबाईल नावाचे यंत्र (जवळपास रोबोइतकेच संवेदनशील) प्रत्येकाच्याच जवळ असते. माणूसच आजकाल मोबाईलच्या सोबत असतो, असे म्हणणे जास्त सयुक्तिक ठरावे! विविध प्रकारच्या अ‍ॅप्सच्या माध्यमातून मोबाईल तुमच्यावर नियंत्रण ठेवत असतो. अगदी तुम्ही सकाळी फिरायला गेल्यावर तुम्ही किती पावले चाललात आणि त्यामुळे तुमच्या किती कॅलरीज जळल्या, हेदेखील मोबाईल सांगत असतो. विविध सूचना आणि कामांची आठवणही मोबाईल करून देत असतो. कधीकाळी आपण मोबाईल हाताळत होतो, आता मोबाईल आपल्याला हाताळत असतो...!
 
महात्मा गांधी या द्रष्ट्याने यांत्रिकीकरणाचा हा धोका मानवी जीवनावर काय परिणाम करू शकतो, हे ओळखले होते. त्यामुळे त्यांचा यांत्रिकीकरणाला विरोध होता. माणसांची कामे माणसांनीच करावीत, असे त्यांचे म्हणणे होते. आता आपण आपले स्वावलंबित्व गमावून बसलो आहोत. विनायंत्र आपण काहीच करू शकत नाही. यंत्रांनी आपली अडवणूक करून टाकली आहे. अगदी इमारतीतून बाहेर पडल्यावर लिफ्ट नसली की माणसे अडकून पडत असतात. आपल्या एका एका अवयवाचे एक्सटेन्शन आपण निर्माण केले. पायांचे एक्सटेन्शन म्हणून चप्पल आली. पायाला मग आपण चाके बसविली. सायकल आली, दुचाकी आल्या, चारचाकी, रेल्वे आणि मग विमानेही... पायांची शक्ती आपण गमावून बसतो आहोत आणि आपणच निर्माण केलेल्या यंत्रांची गुलामी आम्ही पत्करली आहे, हे आमच्या लक्षातच आले नाही. यंत्र नकोतच असेही नाही, मात्र शुमाकर म्हणतो तसे, जेवणात जसे मीठ असते त्याच प्रमाणात मानवी आयुष्यात यंत्रे असली पाहिजेत.
 
आता तर गतिमान सरकार आणि प्रशासन हे त्यांच्या यंत्रगतीवरच अवलंबून असते. अगदी तीन-चार दशकांपूर्वीच आकडेमोड कितीही मोठी असली, तरीही माणसे सहज करून टाकायची. काही माणसांत तर कितीही कठीण आकडेमोड लीलया करण्याचे सामर्थ्य होते. आता अगदी चार-दोन बेरजा अन् वजाबाक्या करण्यासाठीही आपल्याला कॅल्क्युलेटरची गरज भासते... स्मरणशक्तीवरही त्याचा परिणाम झालेला आहे. यंत्रशरणतेमुळे आपण पंगू होत चाललो आहोत. बापूजी म्हणाले होते ते खरेच आहे. त्यामुळे शक्तींचे केंद्रीकरणही झाले आहे. व्यक्तीला हवी त्या प्रमाणात ऊर्जा त्याने निर्माण करून घ्यावी. असेच होतेही आधी. गावांना आवश्यक असलेली वीज गावाने निर्माण करावी व उरलेली वीज देशाला द्यावी, असे बापूजी म्हणायचे. यंत्रशरणतेमुळे आम्ही अक्षम झालो आहोत आणि मग आमची कार्यसृजनताही क्षीण झालेली आहेच.
 
हे भौतिक पातळीवर झालेले परिणाम आहेत. त्याहीपलीकडे जाऊन झालेला भीषण परिणाम हा की, माणसे आता एकमेकांनाही यांत्रिक पद्धतीने हाताळू लागली आहेत. माणसांचे यांत्रिकीकरण हे केवळ त्याच्या कार्यशक्तीच्या र्‍हासापाशीच थांबले असते तर त्यावर मात करता आली असती. आता माणसे यंत्र होऊ लागली आहेत. त्यांच्या संवेदनाही यांत्रिक झालेल्या आहेत. बाजारीकरण झपाट्याने झाले आणि बाजाराला माणसांपेक्षा यंत्रेच हवी असतात. कारण यंत्रे प्रश्न विचारत नाहीत. ‘का?’ असे विचारणारी माणसे अडचणीची ठरत असतात. यंत्रे कधीच ‘का?’ असे विचारत नाहीत. बाजाराला तेच हवे असते. आपल्याला वाटत असते, की आपल्या संवेदना स्वतंत्र आहेत. आपल्या कल्पना आहेत आणि प्रज्ञादेखील. तसला आभास निर्माण केला जातो किंवा आपल्यात आजचा बाजार किंवा व्यवस्था अनेक भास निर्माण करत असतात. ते त्यांना हवे तेच प्रश्न आपल्या डोक्यात निर्माण करतात आणि त्याची त्यांना हवी तीच उत्तरेही आपल्याला देत असतात. आपल्याला मात्र असे वाटत असते की, हे सारेच आपण स्वयंप्रज्ञेने करत असतो. स्वयंप्रज्ञा/प्रेरणा आणि व्यक्तिस्वातंत्र्य असे काहीच व्यवस्थेने शिल्लक ठेवलेले नाही. कुणीतरी हे सारे ऑपरेट करत असतं.
 
आपण कुठली पेस्ट वापरायची पासून तेल कुठले खायचे हेदेखील ‘त्यांनी’ ठरविले आहे. मानवी संवेदनांना स्वत्वाची जाणीव देणार्‍या काही घटना घडत असतात, मात्र त्या घडतच असतात असे नाही, त्या घडविल्या जातात आणि त्यामागे बाजाराचा किंवा व्यवस्थेच्या गरजेचा कार्यकारणभाव असतो. त्यावरच्या प्रतिक्रियाही आधीच ठरविलेल्या असतात आणि मग घटना घडवली की मानवी प्रतिक्रिया उमटतात, असे आपल्याला वाटत असते, मात्र ते तसे नसते. ठरविलेल्या प्रतिक्रियाच त्या वेळी प्रवाहित केल्या जातात आणि मग त्या प्रसारित होत असतात. एखादी दंगल घडते आणि तिच्या कारणांपासून तर परिणामांपर्यंत सारेच कसे आखीवरेखीव असेच असते. एखादी घटना घडली की, त्यावर माणूस म्हणून सर्वसाधारण प्रतिक्रिया सारखीच असायला हवी. म्हणजे एखादा माणूस अपघातात जखमी झाला, तर त्याच्याकडे बघताना प्रतिक्रिया सारख्याच असायला हव्यात, मात्र त्या तशा नसतात. गटागटाने माणसे त्यावर वेगळ्या प्रतिक्रिया देत असतात. माणसे मरणे आणि मारली जाणे, यावर हळहळच व्यक्त व्हायला हवी... काही समूहांना वाटते, बरे झाले मेली माणसे. देश, धर्म, जात, रंग आणि मूळ म्हणजे आमच्यात झालेले गरजांचे प्रोग्रामिंग यामुळे प्रतिक्रिया अशा विभागल्या गेलेल्या आहेत. आमचे होत चाललेले हे यांत्रिकीकरण कसे थांबवायचे? प्रश्न आहे, उत्तरही मिळू शकते; पण सगळ्याच माणसांना हा प्रश्न पडायला हवा. तो पडणार नाही. कारण, आता माणसांचे यांत्रिकीकरण झपाट्याने झालेले आहे...
 
 
 
 
- श्याम पेठकर
 
@@AUTHORINFO_V1@@