त्रिपुरात ‘चलो पलटाई’चे वारे...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Jan-2018
Total Views |
 
 
 
 
त्रिपुरातील जनतेचा मूड पाहता इथे आता रणनीतीची गरजच उरली नाही, असे अमित शाह आपल्या भाषणादरम्यान म्हणाले आणि हे खरेही आहे. त्रिपुरात ‘चलो पलटाई’ (चला बदल करू) ही भाजपची घोषणा अत्यंत लोकप्रिय झाली आहे. मोकळ्या वातावरणात निवडणुका झाल्या तर डळमळीत झालेली गढी कोसळणार, हे निश्चित.
 
भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी ७ आणि ८ जानेवारीला त्रिपुराचा दोन दिवसांचा झंझावाती दौरा केला. अम्बासा आणि उदयपूर येथे त्यांच्या दोन विराट सभा झाल्या. त्रिपुराचे चित्र किती झपाट्याने बदलत असून राजकारण नेमके कोणत्या दिशेला चालले आहे, याची झलक या सभांच्या निमित्ताने पाहायला मिळाली. जेमतेम ३७ लाख लोकसंख्येच्या या राज्यातील दोन लाख लोक (सुमारे ६ टक्के) या दोन सभांना जमले होते.
 
राज्यातल्या या पूर्वी झालेल्या सर्व अतिविराट सभा अमित शाह यांच्या सभांना जमलेल्या गर्दीसमोर अगदीच चिल्लर ठरल्या. २०१५ मध्ये तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांच्या आगरताळा येथे झालेल्या सभेला माध्यमांनी प्रचंड प्रसिद्धी दिली होती. त्या सभेला जमलेली गर्दी १५ हजारांच्या आसपास होती. त्रिपुरात विराट सभांचा आकडा एवढाच असतो. अमित शाह यांच्या सभेचे यश यामुळेच नजरेत भरणारे आहे. ममता बॅनर्जी यांची सभा राजधानी आगरताळामध्ये झाली होती आणि शाह यांची सभा दुर्गम गावात, हा फरकही लक्षात घेण्याची गरज आहे. अम्बासा हे ठिकाण राजधानी आगरताळापासून तीन तासांच्या अंतरावर. हा पूर्णपणे घाट रस्ता आहे. ज्या राज्यात प्रवासाची साधने उपलब्ध नाहीत, अशा ठिकाणी हे अंतर खूपच मोठे आहे. परंतु, तरीही मैदानात ५० हजार लोकांची उपस्थिती होती आणि तेवढेच लोक मैदानाबाहेरही हजर होते. सभेला येणार्‍या अफाट गर्दीने आजूबाजूचे तमामरस्ते तुंबले होते. अनेक महिला आपल्या तान्ह्या बाळांना कडेवर घेऊन आल्या होत्या. कार्यकर्त्यांमध्ये असलेला उत्साह आणि अमित शाह यांच्या भाषणाला मिळालेल्या टाळ्यांची मोजदाद केली, तर मार्च २०१८ मध्ये इथे भाजपचे सरकार येणार, असे मानायला वाव आहे. अस्तावाल मैदानात काही महिन्यांपूर्वी झालेल्या आपल्याच सभेचा विक्रमखुद्द अमित शाह यांनीच यावेळी मोडित काढला.
 
भाजपने या सभांचे आयोजन मोठ्या खुबीने केले होते. अमित शाह यांच्या सभांसाठी भाजपने त्रिपुरातल्या सर्व (८) जिल्ह्यांना दोन भागांत विभागले. त्रिपुरातल्या प्रत्येक गावातला माणूस या सभांना येईल, अशी व्यवस्था लावली. भाजपचे प्रदेश प्रभारी सुनील देवधर यांनी अनेक दिवस आगरताळातील घराला कुलूप घातले होते. सामानसुमान गाडीत लादून ते गावागावात मुक्कामकरीत फिरत होते. कुठे सायकल रॅली, तर कुठे पदयात्रांचा त्यांनी धडाका लावला होता. इथे लवकर अंधार होत असल्यामुळे सायंकाळ आणि रात्री अनेक ठिकाणी त्यांनी टॉर्च मोर्चाचे आयोजन केले होते. सभांच्या प्रचार प्रसिद्धीसाठी असे अनेक प्रयोग राबविण्यात आले.
 
 

 
 
भाजपच्या या झंझावाताने माकपाची झोप उडवली आहे. कारण, अमित शाह यांच्या सभेला जर असा प्रतिसाद मिळत असेल, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा राज्यात भाजपची किती मोठी लाट निर्माण करेल? हा सवाल डाव्यांच्या उरात धडकी भरवतो आहे. मोदी आणि शाह यांच्या व्यतिरिक्त योगी आदित्यनाथ हे ब्रह्मास्त्रही भाजपच्या भात्यात आहे. त्रिपुरातील ओबीसी समाजातील मोठा वर्ग नाथपंथीय आहे. योगी आदित्यनाथ या समाजाचे आध्यात्मिक गुरू आहेत. त्यांची उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदी निवड झाल्यावर त्रिपुरात फटाके फुटले होते. त्यांची त्रिपुरातील अफाट लोकप्रियता ही भाजपच्या दृष्टीने मोठी जमेची बाजू आहे. अमित शाह यांच्या दोन दिवसांच्या मुक्कामात भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. प्रदेशस्तरावर प्रदीर्घ बैठका झाल्या. त्रिपुरातील विचारवंतांसमोर त्यांनी भाजपची भूमिका मांडली.
 
ज्या दिवशी अमित शाह यांच्या त्रिपुरात दोन सभा झाल्या, त्याच दिवशी माकप नेत्या वृंदा करात यांची सोनामुरा येथे सभा झाली. या दोन सभांची तुलना होणे स्वाभाविकच होते. त्रिपुरातील सर्व वर्तमानपत्रांत (डाव्यांची मुखपत्रे सोडून) पहिल्या पानावर अमित शाह यांच्या सभेचे ठसठशीत वृत्त होते. अमित शाह यांच्या अतिविराट सभेसमोर सरकारी ताकद लावून गर्दी जमवलेली करात यांची सभा अगदीच फिकी ठरली. सभेतली गर्दी अगदीच तोकडी आणि निरुत्साही होती. ‘इंडिजीनस पीपल्स फ्रंट ऑफ त्रिपुरा’ (आयपीएफटी) या राजकीय पक्षासोबत भाजपच्या संभाव्य युतीच्या हालचालींवर करात यांनी टीकास्त्र सोडले. आयपीएफटीचा त्रिपुरातल्या जनजातीय क्षेत्रात काही प्रमाणावर जनाधार आहे. त्यामुळे भाजपशी त्यांची युती झाल्यास डाव्यांना चीड येणे स्वाभाविक आहे. भाजपच्या अचूक रणनीतीचा तो अपेक्षित परिणाम आहे. त्यामुळे भाजप-आयपीएफटीची युती झाल्यास त्याचे त्रिपुराच्या राजकारणावर दूरगामी परिणा महोतील, हे निश्चित.
 
 

 
 
भाजपचे कार्यकर्ते दिवसरात्र खपत आहेत. समाजाच्या प्रत्येक वर्गापर्यंत पोहोचत आहेत. मिझोरामच्या सीमेवर जुम्पोई हिल या भागात ख्रिस्ती मिझो लोकांची वस्ती आहे. भाजप सत्तेवर आल्यास ख्रिस्त्यांवर अत्याचार होतील, असा जोरदार अपप्रचार डाव्यांनी इथे चालवला आहे. परंतु, २५ वर्षांच्या त्यांच्या कार्यकाळात जम्पोई हिल भागाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले. इथल्या जनतेचा कल काँग्रेसकडे असल्याने डाव्यांनी सूड भावनेने इथल्या विकासाकडे पूर्णपणे डोळेझाक केली. मुख्यमंत्री माणिक सरकार कधी इथे फिरकले नाही. ही सल इथल्या लोकांच्या मनात प्रचंड खदखदते आहे. लोकांचा डाव्यांवर काडीमात्र विश्वास नाही. त्यामुळे त्यांच्या अपप्रचारावर विश्वास ठेवायला लोक तयार नाहीत. उलट डावे विरोधात बोलत असल्यामुळे ते अधिकाधिक भाजपकडे झुकताहेत.
 
त्रिपुरातील जनतेचा मूड पाहता इथे आता रणनीतीची गरजच उरली नाही, असे अमित शाह आपल्या भाषणादरम्यान म्हणाले आणि हे खरेही आहे. त्रिपुरात ‘चलो पलटाई’ (चला बदल करू) ही भाजपची घोषणा अत्यंत लोकप्रिय झाली आहे. मोकळ्या वातावरणात निवडणुका झाल्या तर डळमळीत झालेली गढी कोसळणार, हे निश्चित. अमित शाह यांनी आपल्या सभेत त्याचे सूतोवाच केले. सध्या १९ राज्यांमध्ये भाजप सत्तेत आहे. मेघालय आणि त्रिपुराची भर पडून ही संख्या २१ होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला असून त्रिपुरात दोन तृतीयांश जागा मिळवून भाजप सत्तेवर येईल, असे त्यांचे भाकीत आहे. त्यामुळे भाजपच्या झंझावाताने डाव्यांच्या गढीत हडकंप माजला आहे.
 
 
 
-दिनेश कानजी

 
 
@@AUTHORINFO_V1@@