शहर बस वाहतुकीसह विविध विकासकामे मार्गी लागणार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Jan-2018
Total Views |
 

 
 
 
 
नाशिक : नाशिक शहरात तीन महत्त्वाचे प्रकल्प मार्गी लावण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. या घोषणांची पूर्तता करण्याची तयारी सुरू असून महानगरपालिका आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी जानेवारीअखेर भाडेतत्त्वावर शहरातील सार्वजनिक बस वाहतूक सुरू करण्याबाबत क्रिसीलकडून अहवाल मागविला आहे. त्यानंतर झटपट शासनाची मंजुरी घेऊन बससेवा सुरू करण्याबाबत निर्णय होईल.
 
दुसरीकडे, वीजबिल बचत योजनेतून एकतर इ-निविदा पद्धतीने किंवा केंद्र शासनाच्या ईईसीएल या कंपनीमार्फत शहरात ८५ हजार पथदीपांवर एलईडी दिवे बसवले जाणार असून, त्याद्वारे शहरात एलईडीचा प्रकाश सर्वत्र पसरणार आहे.
 
सद्यस्थितीत राज्य परिवहन महामंडळाने तोट्याचे कारण देत शहर बससेवा चालवण्यास नकार दिला आहे. ही सेवा महापालिकेला चालवणे परवडणार नाही. यावर सुवर्णमध्य म्हणून खासगीकरणातून शहरात भाडेतत्त्वावरील बससेवा सुरू केली जाईल. द्वारकाचौकात प्राथमिक आरोग्य केंद्रांची महापालिकेची जागा असून, येथे व्यावसायिक संकुल बीओटीद्वारे उभारले जाईल. त्याबाबत आराखडा तयार असून येथील सध्याच्या दुकानधारकांना रेडीरेकनरनुसार भाडे आकारून येथे जागा दिली जाईल.
 
सिडकोतील अत्यंत महत्त्वाचा पेलिकन पार्क प्रकल्पाला खासगीकरणातून चालवण्यासाठी दिले जाईल. रविवारकारंजा येथील नगरपालिका काळातील यशवंत मंडई पाडून येथे स्मार्ट सिटी योजनेतून बहुमजली वाहनतळ उभे केले जाईल. पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप या तत्त्वातून पुढील आर्थिक वर्षात फाळके स्मारकाचे व्यवस्थापन खासगी कंपनीला दिले जाईल. त्यात प्रामुख्याने संबंधित कंपनी उद्यानाची देखभाल व्यवस्थापन करेल. जे उत्पन्न मिळेल त्यात काही हिस्सा महापालिकेला महसूल स्वरूपात मिळेल.
 
@@AUTHORINFO_V1@@