पुन्हा पुतीन...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Jan-2018   
Total Views |

पुन्हा अध्यक्ष झाल्यास पुतीन यांची कारकीर्द कशी असेल हा कुतुहलाचा विषय आहे. गेल्या वर्षभरापासून तेलाच्या किमती पुन्हा वाढू लागल्या असून त्यामुळे रशियाच्या ताकदीत वाढच होणार आहे. २०२० साली अमेरिकेतील किंवा एकूणच महत्त्वाच्या लोकशाही देशांमध्ये होणार्‍या निवडणुकांत तसेच इस्रायल-पॅलेस्टाईनमधील संघर्ष, येमेन आणि सीरियात शांतता आणि स्थैर्य प्रस्थापित करणे आणि अफगाणिस्तानचे भवितव्य; या सर्वच प्रश्नांत रशियाची भूमिका महत्त्वाची असेल.
 
१८ मार्च २०१८ रोजी होणार्‍या अध्यक्षीय निवडणुकीच्या मैदानात व्लादिमीर पुतीन पुन्हा एकदा उतरले आहेत. यावेळी मात्र ते आपल्या ’युनायटेड रशिया’ या पक्षातर्फे उभे न राहता अपक्ष म्हणून उभे राहिले आहेत. त्यांच्या विरुद्ध लढण्यासाठी सज्ज झालेले विरोधी पक्षनेते अलेक्सी नवलनी यांची याचिका रशियाच्या निवडणूक आयोगाने डिसेंबर महिन्यात भ्रष्टाचार आणि हेराफेरीच्या आरोपांचे कारण देत फेटाळून लावल्याने आता स्पर्धेत फक्त साम्यवादी पक्षाचे पावेल ग्रुडनिन आणि लिबरल डेमोक्रॅटिक पक्षाचे व्लादिमीर झिरिनोव्सकी उरले आहेत. पुतीन यांचा विजय निश्चित असला तरी रशियन समाजात सरकार विरुद्ध असलेला असंतोष बहिष्काराच्या माध्यमातून परावर्तित होण्याची शक्यता असल्याने त्यांनी स्वतःला पक्षापासून वेगळे काढले असावे, असा अंदाज आहे. या विजयामुळे पुतीन सलग दुसर्‍यांदा अध्यक्ष होणार असून ७ मे २००० पासून रशियाचे अध्यक्ष म्हणून आणि २००८-२०१२ पर्यंत पंतप्रधान या नात्याने रशियाची सत्ता पुतीन यांच्याच हातात राहिली आहे. पुतीन यांनी ‘केजीबी’ या रशियाच्या नावाजलेल्या हेरखात्यात १६ वर्षं महत्त्वाच्या जबाबदार्‍या सांभाळल्या असून सोव्हिएत रशियाच्या विघटनानंतर सातत्याने घसरण होत असली तरी रशियाला गांभीर्याने घ्यायला पुतीन यांनी भाग पाडले आहे. गेल्या काही वर्षांपासून तेल, नैसर्गिक वायू आणि शस्त्रास्त्रांखेरीज रशियाकडे देण्यासारखे काही नाही. २०१४ सालापासून तेल आणि वायुच्या किमतीतही मोठ्या प्रमाणावर घसरण होऊन त्याचा रशियाच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला असला तरी पुतीन यांनी आपल्या मर्यादित ताकदीचे उपद्रवमूल्य किती मोठे असू शकते, हे वेळोवेळी अमेरिका आणि युरोपीय देशांना दाखवून दिले आहे. मग ती २०१४ साली युक्रेनमधील क्रिमियावर आपला ऐतिहासिक हक्क सांगत त्यावर कब्जा करणे असो वा २०१६ साली सीरियामध्ये अध्यक्ष बशर अल असाद यांच्या राजवटीला पाठिंबा देत त्यांच्याविरूद्ध तुर्की, सौदी, कतार आणि अन्य अरब राष्ट्रांच्या पाठिंब्यावर लढणार्‍या सैनिकांना पळता भुई थोडी करणे असो किंवा चीनशी साधलेली जवळीक असो पुतीन यांनी कायमच आपली दखल घ्यायला लावली आहे. आज रशियाने सायबर युद्ध, मर्यादित युद्ध आणि आता समुद्रतळाशी युद्ध अशी नवनवीन शस्त्रास्त्रे आपल्या भात्यात जोडली आहेत. ’डेटा इज द न्यू ऑइल’ हे वाक्य प्रत्यक्षात आणण्याचा विडाच पुतीन यांनी उचलला असावा, असं दिसतं. २०१६ साली अमेरिकेत झालेल्या अध्यक्षीय निवडणुकीत रशियाने ढवळाढवळ करून डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयास हातभार लावला, असे आरोप अमेरिकन माध्यमांतून करण्यात आले. तीच गोष्ट ‘अल जझिरा’तील वार्तांकनामुळे सौदी आणि कतारमध्ये पडलेल्या ठिणगीबद्दल आणि त्यातून आखाती अरब राष्ट्रांनी कतारच्या केलेल्या कोंडीबद्दल बोलली जाते. रशियन हॅकर्सनी जाणीवपूर्वक कतारच्या ‘अल जझिरा’च्या वेबसाईटवर सौदीची बदनामी करणार्‍या बातम्या प्रसिद्ध केल्या, अशी शक्यता अमेरिकन तपास यंत्रणांनी वर्तवली आहे. नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार उत्तर अटलांटिक महासागराच्या तळाशी, जिथे अमेरिका आणि युरोपला जोडणार्‍या दूरसंचार आणि इंटरनेट केबल्स जातात, रशियाच्या पाणबुड्यांचा संचार मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. घातपाती कारवायांनी या केबल तोडल्यास माहिती-तंत्रज्ञान, बँकिंग, वित्त आणि इंटरनेटवर आधारित उद्योगांना तसेच सामान्य नागरिकांना मोठा फटका बसू शकतो किंवा मग या केबलमधून आदान-प्रदान होणारी महत्त्वाची माहिती (डेटा) चोरण्याचा प्रयत्नही रशिया करू शकतो. या घटनांची ‘नाटो’ राष्ट्रांनी गांभीर्याने दखल घेतली असून शीतमहायुद्धाच्या समाप्तीनंतर थंडावलेली उत्तर अटलांटिक क्षेत्रातील आघाडी पुन्हा एकदा उघडण्यात आली आहे. अमेरिका आणि रशिया यांच्यातील संबंधांनी तळ गाठला आहे.
 
पुतीन यांनी पश्चिमआशिया तसेच अफगाणिस्तान प्रश्नात रशियाचे स्थान निर्माण करण्याचा चंग बांधला आहे. मोठ्या प्रमाणावर सैन्य तैनात न करता किंवा मोठ्या युद्धात न गुंतता पारडे कसे फिरवायचे हे सीरिया आणि अन्य ठिकाणी दाखवून दिले आहे. रशियाच्या उपद्रवमूल्यामुळेच इराण, कतार, तुर्की आणि इस्रायलचे नेते वेळोवेळी मॉस्कोला जाऊन पुतीनची भेट घेतात. ऑक्टोबर २०१७ मध्ये सौदी अरेबियाचे राजे सलमान यांनीही देशांतर्गत सुधारणांची मोहीमहाती घेण्यापूर्वी रशियाला भेट दिली. रशियाला भेट देणारे सौदी अरेबियाचे ते पहिलेच राजे होत. पुन्हा अध्यक्ष झाल्यास पुतीन यांची कारकीर्द कशी असेल हा कुतुहलाचा विषय आहे. गेल्या वर्षभरापासून तेलाच्या किमती पुन्हा वाढू लागल्या असून त्यामुळे रशियाच्या ताकदीत वाढच होणार आहे. २०२० साली अमेरिकेतील किंवा एकूणच महत्त्वाच्या लोकशाही देशांमध्ये होणार्‍या निवडणुकांत तसेच इस्रायल-पॅलेस्टाईनमधील संघर्ष, येमेन आणि सीरियात शांतता आणि स्थैर्य प्रस्थापित करणे आणि अफगाणिस्तानचे भवितव्य; या सर्वच प्रश्नांत रशियाची भूमिका महत्त्वाची असेल.
 
भारत आणि रशिया यांच्यातील मैत्रीला ऐतिसासिक कोंदण लाभले असून सोव्हिएत रशियाच्या पतनाचा किंवा भारतात वेगवेगळे पक्ष किंवा आघाड्या सत्तेवर येण्याचा त्यावर विपरित परिणामझाला नाही. असे असले तरी भारत-रशिया अभेद्य मैत्रीला २१व्या शतकाच्या सुरुवातीपासून तडे जाऊ लागले आहेत. रशियाशी संरक्षण आणि ऊर्जा क्षेत्राच्या पलीकडे व्यापार आणि गुंतवणुकीच्या क्षेत्रात मर्यादित वाव आहे, तर दुसरीकडे अमेरिकेशी असलेले आपले संबंध लोकशाही व्यवस्था, ३० लाख अनिवासी भारतीयांचे वास्तव्य, उच्च शिक्षण, तंत्रज्ञान, इंग्रजी भाषा आणि प्रसार माध्यमे यांच्यामुळे अधिकाधिक समृद्ध होत आहेत. आज अमेरिका हा संरक्षण क्षेत्रात भारताचा सर्वात मोठा भागीदार बनला आहे. याउलट रशिया चीनकडे झुकू लागला असून अफगाणिस्तानमधील स्थैर्याच्या दृष्टीने तसेच बेल्ट-रोड प्रकल्प यशस्वी होण्यात रशियाची भूमिका महत्त्वाची असणार आहे. रशियाने चीनला मोठ्या प्रमाणावर संरक्षण तंत्रज्ञान पुरवल्यामुळे तसेच गेल्या वर्षीपासून पाकिस्तानसह संयुक्त लष्करी कवायतींचे आयोजन करण्यास सुरुवात केल्यामुळे भारताच्या चिंतेत वाढ झाली आहे. भविष्यकाळात अत्यंत विरळ लोकसंख्या असलेल्या रशियाच्या पूर्व भागात चीनकडून पायाभूत सुविधांतील गुंतवणूक, वैध तसेच अवैधपणे आपल्या नागरिकांच्या स्थलांतराच्या माध्यमातून आपला वरचष्मा प्रस्थापित करण्याची भीती असली तरी आजच्या घडीला रशिया आणि चीन यांचे सख्य आहे. भारत-रशिया संबंधांना ‘हिंदी-रूसी भाई-भाई’च्या भावनिक गुंत्यातून बाहेर काढणे, तसेच भारताचे अमेरिका आणि रशियाशी असलेले संबंध एकाच वेळेस पुढे नेण्याचे आव्हान मोदी सरकारपुढे आहे. पुतीन यांची आंतरराष्ट्रीय विषयांची जाण आणि त्यात हस्तक्षेप करून रशियाचे स्थान निर्माण करण्याचे त्यांचे प्रयत्न यांची योग्य ती दखल घेऊन रशियासोबत संरक्षण, संशोधन, अंतरिक्ष, ऊर्जा, अणू तंत्रज्ञान आणि सायबर सुरक्षा इ. क्षेत्रांत मर्यादित संधी असल्या तरी त्या संधींचे सोने करावे लागेल.
 
 
- अनय जोगळेकर 
@@AUTHORINFO_V1@@