कर्जत क्रीडा अकादमीसाठी दहा कोटी : मुख्यमंत्री

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Jan-2018
Total Views |
 

 
 
अहमदनगर : ग्रामीण भागातून चांगले खेळाडू तयार व्हावेत यादृष्टीने कर्जत येथे क्रीडा अकादमी उभारण्याकरीता दहा कोटींचा निधी देण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. कर्जत येथे गोदड महाराज क्रीडानगरीत शासनाच्या वतीने आयोजित छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा २०१७-१८ च्या पारितोषिक वितरण समारंभप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला पालकमंत्री प्रा.राम शिंदे, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, विधानसभेचे विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील, खासदार दिलीप गांधी, आमदार शिवाजीराव कर्डिले, विनायक मेटे, आर.टी. देशमुख, भिमराव धोंडे, नारायण कुचे, नगराध्यक्ष नामदेव राऊत, विभागीय आयुक्त महेश झगडे, जिल्हाधिकारी अभय महाजन, क्रीडा उपसंचालक विजय संतान आदी उपस्थित होते.
 
 
कबड्डी हा भारताच्या मातीत रुजलेला खेळ असून ती जगाला भारताने दिलेली देणगी आहे. ग्रामीण भागात या खेळाला विशेष प्रतिसाद मिळतो. कर्जत येथील स्पर्धेला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद कौतुकास्पद आहे असे फडणवीस यावेळी म्हणाले. या प्रतिसादावरुन नागरिकांचे क्रीडाप्रेम दिसून येते. या भागातील क्रीडा विकासाला चालना देण्यासाठी कर्जत येथे क्रीडा अकादमी उभारण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
 
 
 
खेळात जय-पराजय महत्त्वाचा नसून विजयी होण्याची भावना मनात निर्माण होणे आणि त्यादृष्टीने प्रयत्न करणे महत्वाचे आहेत. जीवनात या क्रीडागुणांचा चांगला उपयोग होतो. त्यामुळे विजयी संघाएवढेच उपविजयी संघातील खेळाडूदेखील अभिनंदनास पात्र आहेत, असे फडणवीस म्हणाले. कुकडी प्रकल्पासाठी तिसरी सुधारीत प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून प्रकल्पासाठी निधी देण्यात येईल, तसेच जागा उपलब्ध झाल्यास कर्जत येथे औद्योगिक वसाहत उभारण्यासाठी मंजूरी देण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
 
@@AUTHORINFO_V1@@