धडक आणि कडक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Jan-2018
Total Views |
 
  
 
 
मानवतेच्या दृष्टिकोनातून भारताने पाकच्या गरजू नागरिकांना वैद्यकीय व्हिसा दिला, दोन्ही देशांच्या कैदेत असलेल्या निष्पाप नागरिकांना सोडण्यावरही एकमत झाले, पण सीमेवरील पाकच्या कुरापती काही केल्या थांबलेल्या नाही. त्यामुळे अशा परिस्थितीत ‘क्रिकेट डिप्लोमसी’चे ढोल बडवत पाकबरोबर संबंध सुधारणे जवळपास अशक्य असल्याचे संकेतच स्वराज यांनी दिले. कारण, जो देश सीमेवर रात्रंदिवस गोळ्यांचा, उखळी तोफांचा वर्षाव करतो, शेकडो जवानांचे-निष्पापांचे प्राण घेतो, त्या देशासोबत क्रिकेट मालिका खेळण्यात कोणाला स्वारस्य?
 
 
भारताच्या शेजारील राष्ट्रांशी संबंधांवर नुकतीच एक उच्चस्तरीय बैठक पार पडली. परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज आणि परराष्ट्र सचिव एस. जयशंकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना शेजारी राष्ट्रांशी बदललेल्या संबंधांवर माहितीही दिली. या बैठकीनंतर सुषमा स्वराज यांना काही पत्रकारांनी भारत-पाक क्रिकेट मालिकेविषयी छेडले असता स्वराज यांनी अशी कुठलीही शक्यता फेटाळून लावली. मानवतेच्या दृष्टिकोनातून भारताने पाकच्या गरजू नागरिकांना वैद्यकीय व्हिसा दिला, दोन्ही देशांच्या कैदेत असलेल्या निष्पाप नागरिकांना सोडण्यावरही एकमत झाले, पण सीमेवरील पाकच्या कुरापती काही केल्या थांबलेल्या नाही. त्यामुळे अशा परिस्थितीत ‘क्रिकेट डिप्लोमसी’चे ढोल बडवत पाकबरोबर संबंध सुधारणे जवळपास अशक्य असल्याचे संकेतच स्वराज यांनी दिले. कारण, जो देश सीमेवर रात्रंदिवस गोळ्यांचा, उखळी तोफांचा वर्षाव करतो, शेकडो जवानांचे-निष्पापांचे प्राण घेतो, त्या देशासोबत क्रिकेट मालिका खेळण्यात कोणाला स्वारस्य? तरीही काही पाकप्रेमी पुरोगामी मंडळी मात्र क्रिकेटच्या नावाखाली भारत-पाक संबंध सुधारण्याची पोकळ भाषा करतात. ते म्हणतात, ‘‘क्रीडा आणि कला यांना देशांच्या सीमांमध्ये बांधू नका. दोन देशांच्या शत्रुत्वात क्रीडा-कला संबंध कशाला ताणायचे? पण, ‘अवघे विश्वचि माझे घर’ अशी जागतिक सौख्याची भाषा करणार्‍यांच्या तोंडून मात्र शहीद जवानांबद्दल कधीही सहानुभूतीपूर्वक अवाक्षरही का फुटत नाही? तेव्हा, पाकला क्रिकेटच्या मैदानावर नव्हे, तर सीमेवरही चांगलेच प्रत्युत्तर देण्याची गरज आहे आणि ती कामगिरी असाच एक मिनी सर्जिकल स्ट्राईक करून आपल्या सैनिकांनी अगदी चोखपणे पार पाडली.
 
 
कुत्र्याची शेपूट वाकडी ती वाकडीच, तशीच गत शेजारी शत्रूराष्ट्र पाकिस्तानची. नववर्षाच्या पूर्वसंध्येला रविवारी काश्मिरातील सीआरपीएफ प्रशिक्षण केंद्रावर दहशतवाद्यांनी हल्ला चढविला आणि आपले चार जवान हुतात्मा झाले. जैश-ए-मोहम्मदच्या तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात भारतीय जवानांना यशही आले. पण, या वर्षाअखेरच्या आणि नवीन वर्षाच्या तोंडावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याने पाकचे भारतविरोधी नापाक मनसुबे पुन्हा एकदा जगजाहीर केले. फाळणीनंतर आजतागायत सीमेवर पाकची वळवळ थांबलेली नाही आणि सद्यस्थिती पाहता, यापुढेही तसे होणे नाही. त्यातच कुलभूषण जाधव प्रकरणामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरही पाकची उरलीसुरली प्रतिमाही धुळीस मिळाली. एकवेळ शत्रू बदलता येऊ शकतो, पण शेजारी नाही. भारताची अवस्थाही सध्या तशीच आहे. कारण, पाकिस्तानमध्ये लोकशाही सरकार केवळ नामधारी आहे. त्यातही आपापसात कुरघोडी करणार्‍या सत्ताकेंद्रांच्या राजकारणाने पाकला पुरते पोखरून टाकले आहे. पाकिस्तानी सरकार, लष्कर, आयएसआय, स्वतंत्र दहशतवादी गट असे सगळेच सत्ता आणि वर्चस्वाच्या लढाईत आंधळे झाले आहेत. त्यामुळे अशा अस्थिर आणि अशांत राष्ट्रासोबत शांतता, संवाद आणि स्नेहपूर्ण संबंध प्रस्थापित करणे, हे मांसाहारी वाघाला शाकाहाराची सवय लावण्याइतके अशक्यच म्हणावे लागेल. पण, तरीही भारताने वेळोवेळी पाकिस्तानशी सुसंवाद साधण्यासाठी पुढाकार घेतला. अटलबिहारी वाजपेयी, मनमोहन सिंग आणि आता नरेंद्र मोदींनीही पाकपुढे मैत्रीचा हात पुढे केला. २००३ साली तर खुद्द अटलजी दिल्ली-लाहोर बससेवेचा शुभारंभ करत पाकमध्ये दाखल झाले. मनमोहन सिंग यांनीही संपुआच्या काळात पाकिस्तानबरोबर चर्चेसाठी तयारी दाखविली. २०१४ साली पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शपथविधी सोहळ्यातही सार्क देशांच्या प्रमुखांना, ज्यामध्ये पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान नवाझ शरीफ यांचाही समावेश होतो, त्यांनीही आवर्जून उपस्थिती लावली. सप्टेंबर २०१४ मध्येही मोदींनी पाकव्याप्त काश्मीरमधील पूरपरिस्थितीवेळी संपूर्ण सहकार्य आणि मदतीचे पत्र शरीफांना पाठविण्याचे औदार्य दाखविले. इतकेच नाही तर २०१५ साली अफगाणिस्तानहून भारतात परतताना मोदींनी थेट लाहोर गाठले आणि शरीफांची भेट घेतली. परंतु, ‘साड्या आणि मँगो डिप्लोमसी’नेही पाकशी आपले संबंध काही मधुर झाले नाहीत. काश्मीरप्रश्नाच्या मुद्द्यावर चर्चेसाठी अडून बसलेल्या पाकिस्तानला खरं तर चर्चेमध्ये अजिबात स्वारस्य नाही. कारण, जर खरंच पाकिस्तानला भारताशी वर्षानुवर्षे ताणले गेलेले संबंध सुधारायचे असते, तर प्रयत्नांची पराकाष्ठा त्यांच्याकडूनही झाली असती. पण, दुर्देवाने पाकिस्तानी नेतृत्वाने काश्मीर प्रश्नाच्या नावाखाली भारतावर तोंडसुख घेण्यात आणि दहशतवादाने उत्तर देण्यातच धन्यता मानली. त्यांच्या ‘पाक’ भूमीवर ‘नापाक’ जिहादींची विषवल्ली भारताविरोधी पेरली आणि अशांततेचीच काळी सावली कायम राहिली. बोलायचे एक आणि करायचे दुसरे, ही पाकिस्तानची फाळणीपासूनची वृत्ती. ‘दहशतवादी आमच्या भूमीत नाहीतच,’ असे एकीकडे ठासून सांगायचे आणि ‘सर्जिकल स्ट्राईक’नंतर मात्र असे काही झालेच नाही, असा उलट कांगावा करायचा. मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईद तर आता थेट पाकिस्तानच्या राजकीय रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहे. भारताविरोधी गरळ ओकणार्‍या अशा कित्येक दहशतवाद्यांना पाकिस्तानने अभय दिले असून केवळ तोंडदेखल्या कारवायांचे कागदी घोडे नाचवण्यातच धन्यता मानली. पाकच्या खोटारडेपणाची अशी कित्येक उदाहरणे देता येतील. ओसामा बिन लादेन, दाऊद इब्राहिम, हाफिज सईद यांना पाकनेच पाळले आणि भारतविरोधी कारवायांमध्ये त्यांचा हवा तसा प्यादा म्हणून वापर करून घेतला. दहशतवाद्यांवर कुठलेही नियंत्रण नसलेल्या अशा या अण्वस्त्रसज्ज शत्रूराष्ट्राचा म्हणूनच धोका दुर्लक्षित करून चालणार नाही.
 
 
कुलभूषण जाधव यांच्या मातोश्री आणि पत्नीला पाकिस्तान भेटीवेळी दिलेल्या अपमानास्पद वागणुकीचा संसदेनेही एकस्वरात निषेध केलाच. मानवतावादाचा बुरखा पांघरून जगासमोर आपली मलीन प्रतिमा महान करण्याचा पाकिस्तानचा हा कुटील डावही भारताने उधळून लावला. या सगळ्याचा जणू सूडच सीमेवरील गोळीबारी आणि दहशतवाद्यांच्या घुसखोरीच्या माध्यमातून पाकिस्तान घेत आहे. २०१७ साली पाकने ७८० हून अधिक वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन करून जवळपास आपल्या १७ जवानांचे प्राण घेतले, तर सीमेनजीक १२ भारतीय नागरिकही पाकच्या हल्ल्याचे बळी पडले.
 
 
तेव्हा, दोन्ही देशांतील संबंध सुधारण्यासाठी टाळी दोन हाताने वाजली पाहिजे. सिनेमा, क्रिकेट किंवा अन्य कुठल्याही माध्यमांतून पाकिस्तानशी सौहार्दाने वागून निश्चितच प्रश्न सुटणार नाहीत. त्यामुळे पाकिस्तानसंबंधी मोदी सरकारने वेळोवेळी घेतलेल्या ‘धडक आणि कडक’ भूमिकेचे स्वागतच करायला हवे.
 
 
@@AUTHORINFO_V1@@