राजकारणातला सिनेमा

    14-Sep-2017
Total Views |
 

 
 
 
जयललिता जिवंत असताना त्यांना सलामकरायला पोहोचणार्‍या नटनट्यांनासुद्धा आता राजकीय पक्ष काढण्याची स्वप्ने पडू लागली आहेत. तामिळनाडूची वाटचाल एखाद्या शोकांतिकेकडेच सुरू झाली आहे. मालक हरवलेल्या घराप्रमाणे आज या महाकाय राज्याची स्थिती झाली आहे. विधानसभेच्या निवडणुका होईपर्यंत हे असेच सुरू राहणार असे दिसते. 
 
 
 
तामिळनाडूचे राजकारण एका मजेशीर वळणावर येऊन पोहोचले आहे. जयललितांसारख्या खमक्या नेतृत्वानंतर त्यांच्याच पक्षातल्या विविध लोकांमध्ये सत्तेची संगीत खुर्ची सुरू आहेे. अत्यंत भावनाप्रधान आणि लोकांना कवेत घेणारे राजकारण म्हणून तामिळनाडूचे राजकारण चिरपरिचित आहे. लोकांच्या भावनांना सिनेमात स्थान देऊन इथले राजकारणी सत्तारूढ झाले. ‘कॉंग्रेसमुक्त तामिळनाडू’ ची घोषणा न करता इथल्या मंडळींनी कॉंग्रेसला तामिळनाडूतून हद्दपार करून टाकले. आज तामिळनाडूमध्ये औषधालासुद्धा कॉंग्रेस शिल्लक नाही. या सगळ्याचा इतिहास मोठा रंजक आहे. ज्या दोन प्रमुख राजकीय पक्षांमध्ये तामिळनाडूत सत्तासंघर्ष चालतो ती सगळीच मंडळी कधी काळी एकाच कथेची विविध पात्रे होती. करूणानिधी पटकथा लिहीत. एमजीआर नायक, तर जयललिता नायिका असा हा संच होता. सिनेमासारख्या जनसंवादाच्या माध्यमाचा अत्यंत प्रभावी वापर कसा करून घ्यायचा ते या त्रयीकडून शिकावे. सत्तरीचा काळच मुळी देशातल्या बजबजपुरीचा काळ होता. बेकारी, महागाई, भ्रष्टाचार यामुळे देशात अराजक सदृश्य वातावरण होते. हिंदीमध्ये अमिताभचा ‘अँग्री यंग मॅन’ चंदेरी पडदा गाजवत होता तोच हा काळ. इथे राजीव गांधींनी त्याला राजकारणात घेऊन कळपात ओढले, परंतु तामिळनाडूची ही त्रयी खूपच तिखट होती. समाजातल्या सर्वच स्तरात अस्थिरता आणि असुरक्षिततेचे वातावरण होते.
 
 
तामिळनाडूला महाराष्ट्राप्रमाणेच लांबलचक समुद्रकिनारा आहे. मग करूणानिधींनी कोळ्यांच्या समस्यांवर पटकथा लिहिली. अर्थात नायक होते एमजीआर आणि नायिका जयललिता. मग कामगार, शेतकरी या आणि अशा कितीतरी समाजघटकात सिनेमाच्या माध्यमातून एमजीआर शिरले. सिनेमा वेगवेगळा असला तरी नायक एमजीआर, मग ते सिनेमात कधी कोळ्यांचे प्रश्न मांडत तर कधी शेतकर्‍यांचे. विकासाच्या प्रश्नांवर राजकारण करण्याचे दिवस यायचे असल्याने असल्या राजकारणाची जोरदार चलती होती. सिनेतारकांना राजकारणात नेण्याची पद्धत इथेच सुरू झाली. एमजीआरच्या मृत्यूनंतर तामिळनाडूच्या राजकीय सिनेमाला नवे नाट्य जोडले गेले. जयललिता आणि एमजीआरचे नाते तसे गुरू-शिष्याचे पण तरीसुद्धा गुलदस्त्यातलेच. एमजीआरच्या शववाहिकेवरून जयललितांना हाकलून दिले गेले आणि सूडाचे नवे राजकारण सुरू झाले. विधानसभेत जयललितांची साडी ओढण्यापर्यंत हे राजकारण येऊन पोहोचले. नंतर नेसत्या वस्त्रानिशी पोलिसांनी घरातून उचलून नेलेले करुणानिधी लोकांनी टीव्हीवर पाहिले. नंतरच्या काळात करुणानिधींचे वाढते वय, स्टॅलिन व अझगिरी या दोघांमध्ये विभागलेला त्यांचा पक्ष, डीएमकेमध्ये निर्माण झालेली गोंधळाची स्थिती, कनिमोळीचा तुरुंगवास, राष्ट्रीय पक्षांचा सपशेल अभाव या सगळ्या गोष्टी जयललितांच्या पथ्यावर पडल्या आणि मृत्यूपर्यंत त्या तामिळनाडूच्या अनभिषिक्त सम्राज्ञी बनल्या. 
 
 
जयललितांचा अकाली मृत्यू तामिळनाडूच्या सिने धाटणीच्या राजकारणाचा मध्यंतर ठरला आणि नवा क्लायमॅक्स सुरू झाला. जयललिता इस्पितळात गेल्यापासूनच त्या कोमात गेल्याची चर्चा होती. त्यामुळे त्या घरीच आजारी असल्यापासून पन्नीरसेल्वम काळजीवाहू मुख्यमंत्री होतेच, पण जयललितांच्या जाण्याची चाहूल लागताच त्यांची जिवलग मैत्रीण आणि पक्षाची सरचिटणीस शशिकला कमालीची सक्रिय झाली. जयललितांचे निवासस्थान असलेले पोएस गार्डन तिने जयललितांच्या हयातीतच ताब्यात घेतले होते. आता पन्नीरसेल्वम यांच्या सहकार्याने पक्षही ताब्यात घेण्याचा प्रयत्न तिने सुरू केला. जयललितांच्या मृत्यूनंतर त्यांच्या वलयांकित धाकातून एआयडीएमके मुक्त झाला आणि नव्या राजकीय नाट्याला सुरुवात झाली. नियतीचा काव्यगत न्याय असा की, ज्या जयललिता शशिकलाचे कवचाप्रमाणे रक्षण करीत होत्या, त्या गेल्याबरोबर त्यांच्या विरोधातला खटला उभा राहिला आणि मुख्यमंत्रिपदी विराजमान होण्याचे स्वप्न पाहणार्‍या शशिकलाला तुरुंगात जावे लागले. तुरुंगातून पन्नीरसेल्वम सरकार चालविण्याचा तिचा प्रयत्नही तिच्या अंगाशी आला. अखेर जयललितांनीच नेमलेल्या पन्नीरसेल्वमना हटवून शशिकला आणि समर्थक आमदारांनी पलानीस्वामी यांना मुख्यमंत्री केले. 
 
 
जे पन्नीरसेल्वम यांचे झाले, तेच आपले होणार आणि आपल्यालाही शशिकलांच्या हुकूमाचे ताबेदार व्हावे लागणार याची पलानीस्वामींना काही आठवड्यांतच कल्पना आली आणि पुढचे राजकीय नाट्य घडले. खरंतर जयललितांची प्रिय सखी याशिवाय शशिकलांचा कुठलाही वकूब नाही. जयललितांप्रमाणे प्रशासनावर वचक, पक्षावर पकड आणि जनमानसात स्थान यापैकी कशाचाही लवलेश त्यांच्यात नाही. जयललितांच्या वैयक्तिक सुख दु:खाच्या आणि भ्रष्टाचाराच्या प्रकरणाच्या साथीदार मात्र शशिकला नक्कीच होती. महत्त्वाकांक्षा मात्र अफाट आणि त्याचेच बक्षीस आता त्यांना मिळाले आहे. पलानीस्वामी आणि पन्नीरसेल्वम यांनी एकत्र येऊन शशिकलांनाच पक्षातून काढून टाकले आहे. इतक्यावरच ते थांबले नाहीत तर त्यांच्या भाच्यालाही पक्षातून हद्दपार केले गेले आहे. हा संघर्ष इतका सोपा नाही आणि हे राजकीय नाट्य इथे संपणार नाही. याचा पुढचा अंक पन्नीरसेल्वम आणि पलानीस्वामी यांच्यातल्या संघर्षाचा असेल. २०२१ साली तामिळनाडूच्या निवडणुका येतील. करुणानिधी आणि त्यांचा पक्ष निवडणुका जिंकण्याच्या स्थितीत नाही. भाजप मुसंडी मारण्याच्या पूर्ण तयारीत आहे. जयललितांच्या पक्षाचे काय होईल काहीच सांगता येत नाही. त्यांच्या मृत्यूचे भावनिक राजकारण एआयडीएमके नक्कीच करेल, पण त्याला लोक किती प्रतिसाद देतील, हा प्रश्नच आहे. जयललिता जिवंत असताना त्यांना सलाम करायला पोहोचणार्‍या नटनट्यांनासुद्धा आता राजकीय पक्ष काढण्याची स्वप्ने पडू लागली आहेत. तामिळनाडूची वाटचाल एखाद्या शोकांतिकेकडेच सुरू झाली आहे. मालक हरवलेल्या घराप्रमाणे आज या महाकाय राज्याची स्थिती झाली आहे. विधानसभेच्या निवडणुका होईपर्यंत हे असेच सुरू राहणार, असे दिसते. 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.