माणूस म्हणून जगताना .....

Total Views |


 

गेले कित्येक दिवस ज्या event ची वाट बघत होतो आम्ही सर्वजणी तो अगदी आठवड्यावर येऊन ठेपला होता. आमच्या पैकी काहीजणी तर २०– २५ वर्षांनी भेटणार होत्या एकमेकींना! आणि नेहमी प्रमाणेच झाले. whats app वरच्या messages मध्ये प्रोग्रॅम बदलल्याचे निरोप सुरु झाले. सुरुवातीला ज्यांना यायला जमणार नव्हते त्यांना आता यायला जमणार होते. तर नक्की येणाऱ्या सखींना नेहमीप्रमाणे ऐन वेळच्या घरगुती अडचणींमुळे येणे जमणार नव्हते. मी पण अर्थातच दुसऱ्या प्रकारातच मोडत होते. परत एकदा घराला अग्रक्रम! पण मैत्रिणी भेटणार नाहीत एव्हढी गोष्ट सोडली तर वाटलं होतं तेव्हढी रुख रुख नाही वाटली.

 

दरम्यान, कार मधून प्रवास करताना मुलाच्या आणि सुनेच्या गप्पा चालल्या होत्या त्या सहज कानावर पडत होत्या. दोघेही आय.टी. वाले. काही terms कळत होत्या तर काही अंदाजाने लक्षात येत होत्या. team हा शब्द तर फारच ओळखीचा! कोणत्याही संघटनेचे काम ज्याने केले असेल त्याचा ह्या शब्दाशी संबंध आला नाही असे होणारच नाही. आमचे सर तर म्हणायचे की मी, माझी बायको आणि मुले ह्यांची एक team आहे!

 

तर काय सांगत होते, ते दोघे team assesment meeting बद्दल बोलत होते. ते ऐकताना मला सारखी आठवण येत होती ती आमच्या वेळची.. कार्यक्रमानंतर होणाऱ्या बैठकींची. त्यात केलेल्या स्वतःच्या परखड मूल्यमापनाची. बोलता बोलता team मध्ये नवीन जॉईन झालेल्या एका तरुण मुलीविषयी दोघांचे बोलणे सुरु झाले. assesment form मध्ये नाव न देता आपल्याला काही comment द्यायची असेल तर तशी provision होती. अर्थातच त्यामध्ये कामाशी संबंधित मुद्दे येणे अपेक्षित असणार.

 

पण तसे झाले नव्हते. त्या नवीन मुलीच्या पेहरावावरून कोणीतरी personal remark लिहिला होता. आता त्या दोघांच्या पुढील बोलण्याकडे माझे अगदी उत्सुकतेने लक्ष लागले. काय प्रतिक्रिया असेल माझ्या मुलाची आणि सुनेची ? संघटनेच्या कामात काही वेळेला अगदी अशा नाही तरी अशा प्रकारच्या प्रसंगातून प्रमुख कार्यकर्त्यांना जावे लागते पण कंपनीमध्ये असे प्रसंग घडत असतील याची मला, एका निवृत्त शिक्षिकेला काय कल्पना असणार ?

 

सून म्हणाली, “team meeting मध्ये जे मुद्दे discuss केले जाणार आहेत त्यात अशी comment करण्याची काय गरज ?”

 

मुलगा म्हणाला,”तिच्या पेहरावाविषयी त्याचे काही मत असू शकत नाही का?”

 

“ जरूर असू शकते. पण ही चार चौघांसमोर चर्चा करण्याची गोष्ट असू शकत नाही” सून अगदी सहज म्हणाली.

 

मुलगा म्हणाला, “खरं आहे. ही गोष्ट तिला भेटून प्रत्यक्ष सांगितली असती तर जास्त चांगले झाले असते.”

“प्रत्यक्ष सांगण्या इतका परिचय नसेल कदाचित त्याचा.” मी अनाहूतपणे सहभाग घेतला त्यांच्या संभाषणात. मला हे खूप खूप ओळखीचं वाटत होतं सगळं!

“मग त्याने आपल्या सिनियरच्या कानावर घालायचं होतं आणि त्यांना तिच्याशी बोलायला सांगायचं.” सून म्हणाली.

“किंवा तुम्हा मुलींपैकी कोणालातरी तिच्याशी बोलायला सांगितलं असतं तरी चाललं असत नाही का?” मला आता फारच nostalgic feeling येत चाललं होतं.

 

“हो खरच आहे ते. म्हणजे ती दुखावली पण गेली नसती आणि तिच्यात पाहिजे तो बदल पण झाला असता.” सून म्हणाली.

त्या दोघांच्या पुढच्या गप्पा सुरु झाल्या आणि मी माझ्या विचारांमध्ये हरवून गेले. आठवत राहिले किती जणांच्या विचारांनी आपल्या स्वभावावर पडलेले अनेक बारीक कंगोरे आणि तेही अशा हळुवारपणे की जाणीवही न व्हावी आणि इतक्या शिताफीने की डोळ्यांसारख्या नाजूक भागांवर शस्त्रक्रिया करणाऱ्या सर्जनची उपमा द्यावी त्यांना. आणि शिक्षिकाम्हणून काम करताना अशाच प्रकारे काहींचे कंगोरे घासण्याचे मी केलेले यथाशक्ती प्रयत्न, आपल्या कामाचा एक अपरिहार्य भाग म्हणून.

 

असा विचार डोक्यात चालू असताना फार फार मौज वाटत होती मला. कार्यकर्ता म्हणून काम करता करता शिकलेल्या अशा गोष्टींचे, एक सर्वस्पर्शीपण या दोघांच्या संवादाने पुन्हा एकदा अधोरेखित झाले.

 

मैत्रिणींच्या भेटीला जाऊन, आता आपण काहीच काम करत नाही, हे कसे सांगायचे असा एक संकोच वाटत होता. त्यामुळे जायला मिळाले नाही ही इष्टापत्ती वाटली होती. आता पुढच्या संधीची वाट पाहीन. कारण तो पर्यंत माझ्याकडेही सांगण्यासारखे खूप काही असेल आणि माझी खात्री आहे की नेहमीप्रमाणे अशाच प्रकारचे अनुभव माझ्यासारख्या अनेक सख्यांचे असतील.

 

मला वाटतं जिथे जिथे म्हणून माणसांशी संबंध येतो तिथे तिथे अशा छोट्या छोट्या वाटणाऱ्या पण परिणामांच्या दृष्टीने असरदार ठरणाऱ्या गोष्टी कधीच बदलणार नाहीत. अगदी आजच्या जमान्यातील छोट्या कुटुंबाचा विचार केला तर सासू - सुनांनी  सुद्धा एकमेकींशी अशी आपल्या आपल्या विचारांची, सूचनांची देवाणघेवाण केली तर! सोसायटीमध्ये संध्याकाळी एकत्र बसून मारलेल्या गप्पांना तक्रारींचे आणि निंदा नालस्तीचे स्वरूप येणार नाही. आपल्या अपरोक्ष आपल्यावर comments कोणालाच आवडत नाहीत. त्यामुळे दुसऱ्यांनी आपल्याशी जसं वागावं असं आपल्याला वाटतं तसचं  आपणही दुसऱ्यांशी वागावं असं म्हणतात. किती खरं आहे ना ते!

 - शुभांगी पुरोहित

 

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

शुभांगी पुरोहित

M. Sc. B. Ed., शाळेसाठी पथनाट्य लेखन, कविता स्पर्धांमध्ये सहभाग. ललित लेखन. माणसांच्या भावभावनांशी निगडित विषय लिहायला आवडतात. रत्नागिरीत आयोजित ' राम का गुणगान करिये ' ह्या रामाबद्दलच्या विविध गीतांवर आधारित २ तासांच्या कार्यक्रमाच्या संपूर्ण निवेदनाचे लेखन आणि सादरीकरण केलेले आहे.