
ह्रदयांतर सिनेमाच्या टीमसोबत 'मुंबई तरुण भारत'चा विशेष कार्यक्रम
ह्रदयांतरा'च्या गप्पागोष्टी
ह्रदयांतर सिनेमाच्या टीमसोबत 'मुंबई तरुण भारत'चा विशेष कार्यक्रम
मुंबई : मानवी भावभावनांच्या तरल संबंधांचे चित्रण करणारा, मराठीतील तगड्या कलाकारांना घेऊन बनलेला आणि विशेष म्हणजे एका प्रसिद्ध फॅशन डिझायनरने बनवलेला मराठी चित्रपट म्हणजे नुकताच प्रदर्शित झालेला 'ह्रदयांतर'. या सिनेमाच्या टीमने आज पुणे येथे दै. मुंबई तरुण भारतच्या कार्यालयाला भेट दिली, आणि रंगल्या 'ह्रदयांतरा'च्या गप्पा.
सुप्रसिद्ध फॅशन डिझायनर विक्रम फडणीस यांनी दिग्दर्शित केलेला पहिलाच चित्रपट 'ह्रदयांतर' नुकताच चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. विशेष म्हणजे चित्रपटाची कथाही विक्रम फडणीस यांनीच लिहिलेली आहे. सुबोध भावे, मुक्ता बर्वे, सोनाली खरे अशा मराठीतील प्रसिद्ध कलाकारांच्या यामध्ये भूमिका आहेत. तसेच निश्ता वैद्य, तृष्णिका शिंदे या दोघी बालकलाकारांनी केलेल्या भूमिकाही सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. प्रफुल्ल कार्लेकर यांनी चित्रपटाचे संगीत दिग्दर्शन केले आहे. कौटुंबिक परस्परसंबंध आणि भावभावनांचे संवेदनशील चित्रण या चित्रपटात झाले आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या निमित्ताने दिग्दर्शक विक्रम फडणीस यांच्यासह अभिनेत्री सोनाली खरे, अमित खेडेकर, निश्ता वैद्य, तृष्णिका शिंदे यांच्यासह सिनेमाच्या टीमने शनिवारी दै. मुंबई तरूण भारतच्या पुणे येथील ' महा तभा' वेब पोर्र्टल च्या कार्यालयाला भेट दिली. यावेळी झालेल्या गप्पांमध्ये विक्रम फडणीस यांनी या चित्रपटाची मूळ कल्पना, निर्मितीची वाटचाल, त्यावेळी आलेले अनेक अनुभव याविषयी मनमोकळ्या गप्पा मारल्या. तसेच अन्य कलाकारांनीही आपले अनुभव व्यक्त केले. तसेच अनेकांनी विचारलेल्या विविध प्रश्नांचीही मनमोकळेपणाने उत्तरे दिली.
फॅशन डिझायनिंग करत असताना सुचणाऱ्या विविध प्रतिमा, निरनिराळी व्यक्तिचित्रे यातून या चित्रपटाची कथा माझ्या मनात तयार होत गेल्याचे फडणीस यांनी सांगितले. सुबोध भावे, मुक्ता बर्वे यांच्यासह सर्वच कलाकारांनी उत्तम भूमिका निभावली असून त्यांच्यामुळे मलाही खूप मदत झाल्याचे फडणीस यांनी सांगितले. सर्वजण सेटवर वेळेत येत होते, दिवसभर आम्ही सर्वजण एकत्र राहून एकमेकांशी गप्पा गोष्टी करत होतो. त्यामुळे व्यावसायिक संबंधांच्या पुढे जाऊन आम्हाला एकमेकांविषयी आपुलकी निर्माण झाली. त्यामुळे हा चित्रपट अवघ्या २४ दिवसांत चित्रित झाल्याचेही फडणीस यांनी नमूद केले. निश्ता व तृष्णिका या दोघींचीही फडणीस यांनी मुक्तकंठाने प्रशंसा केली. या दोघींनी त्यांचा पहिलाच चित्रपट असूनही साध्या रडण्याच्या सीनमध्येही ग्लिसरीन न वापरता अभिनय केला. त्यामुळे या दोघी माझ्या चित्रपटाच्या खऱ्या 'स्टार' आहेत असे उद्गार फडणीस यांनी काढले. अभिनेत्री सोनाली खरे व अभिनेता अमित खेडेकर यांनीही यावेळी आपला अनुभव विस्तृतपणे सांगितला. फडणीस यांच्या दिग्दर्शनात कुठेच त्यांचा हा पहिलाच सिनेमा आहे असे वाटले नाही. त्यामुळे आम्ही मोकळेपणाने आमचा नैसर्गिक अभिनय करू शकलो अशी भावनाही या दोघांनी यावेळी व्यक्त केली.
चित्रीकरणाच्या काळात सर्वाधिक 'रडायला' कोणी लावले असा प्रश्न विचारला असता फडणीस यांनी 'सुबोध व मुक्ता' असे मिश्कील उत्तर दिले. या दोघांनीही संपूर्ण चित्रीकरण काळात भरपूर खोडकरपणा करून मला अक्षरशः हैराण करून सोडल्याचे त्यांनी सांगितले. तसेच सुबोध, मुक्ता, सोनाली, अमित हे तर कॅमेऱ्याला सरावलेले आहेत, मात्र अभिनयाचा पहिलाच अनुभव असलेल्या व बालवयीन निश्ता, तृष्णिका यांनी केलेला अनुभव थक्क करणारा होता. त्यामुळे माझ्या चित्रपटचे खरे 'स्टार' या दोघीजणी असल्याचे उद्गार फडणीस यांनी काढताच क्षणभर सर्वच अवाक् झाले. 'ह्रदयांतर' हा संपूर्ण चित्रपट एक विलक्षण अनुभव ठरणार असल्याचा दावा करत हा सिनेमा पाहत असताना तुमच्यासोबत आलेल्या जोडीदाराला चित्रपटाच्या शेवटी तुम्ही नक्कीच 'आय लव्ह यू' अशी साद द्याल असे उद्गार विक्रम फडणीस यांनी काढले. कार्यक्रमाच्या अखेरीस सर्व मराठी प्रेक्षकांना हा चित्रपट जरूर पाहण्याचे आवाहनही विक्रम फडणीस यांनी केले.
प्रश्नोत्तरांमध्ये दै. मुंबई तरुण भारतच्या वतीने संपादक किरण शेलार, मुंबई तरूण भारतच्या महा तभा वेब पोर्टलचे व्यवस्थापक अजिंक्य कुलकर्णी, तसेच निहारिका पोळ, प्रथमेश नारविलकर, सुचेता कुलकर्णी, निमेश वहाळकर आदींनी सहभाग घेतला.