पुण्यात होणार जैव-उर्जा महोत्सव

    29-Jun-2017
Total Views |


७-८ जुलैला राष्ट्रीय परिषद आणि प्रदर्शन 
हजारो शेतकरी, विद्यार्थी-संशोधकांचा सहभाग

शाश्वत विकासाचे ध्येय साध्य करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरीत असलेल्या जैविक ऊर्जा क्रांतीची नांदी पुण्यात होणार आहे. निमित्त आहे, ७-८ जुलै रोजी आयोजित करण्यात येत असलेल्या 'बायो-एनर्जी - ऊर्जाउत्सव' या राष्ट्रीय परिषद व प्रदर्शनाचे. देशभरातून हजारो शेतकरी, विद्यार्थी व संशोधक या परिषदेच्या माध्यमातून जैवऊर्जा, जैवइंधन चळवळीचा कृतिआराखडा साकारणार आहेत. 

केंद्रीय तेल व नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या वतीने या परिषदेचे आयोजन करण्यात आले असून ती बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडासंकुलात होणार आहे. केंद्रीय पेट्रोलियम मंत्री श्री. धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते परिषदेचे उदघाटन होईल. या वेळी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर, ऊर्जा मंत्री पियूष गोएल, विज्ञान तंत्रज्ञान मंत्री हर्षवर्धन, अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री हरसिमजित कौर बादल, राज्याचे महसूलमंत्री श्री. चंद्रकांतदादा पाटील आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. ही परिषद नॅशनल युवा को-ऑपरेटिव्ह सोसायटी (एनवायसीएस), मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड अॅग्रीकल्चर (एमसीसीआयए) आणि हिंदुस्थान पेट्रोलियम, भारत पेट्रोलियम आणि इंडियन ऑईल यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात येत आहे. 

या परिषदेच्या समन्वय समितीचे सचिव आणि केंद्राच्या जैवइंधन कृतिगटाचे प्रमुख श्री. वाय. बी. रामकृष्ण, समन्वय समितीचे अध्यक्ष अनिल पांडे, एनवायसीएसचे अध्यक्ष श्री. राजेश पांडे, मराठा चेंबरचे अध्यक्ष श्री. प्रमोद चौधरी आदींनी पत्रकार परिषदेत या संदर्भात माहिती दिली.


 

या परिषदेच्या माध्यमातून बायोएनर्जी अभियानाचा प्रारंभ केला जात आहे. तसेच, विकासप्रक्रियेच्या मुख्य प्रवाहात बायोएनर्जीचा अंतर्भाव करण्यासाठी केंद्र सरकारला अतिशय मोलाची दिशा या परिषदेतून मिळेल, असे रामकृष्ण यांनी स्पष्ट केले. पारंपरिक इंधनाच्या तुटवड्याच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी जैवइंधनाचा पर्याय पुढे येत आहे. त्या आघाडीवर केंद्र सरकारतर्फे गेल्या काही वर्षांत खूप मोठा पुढाकार घेतला आहे. त्याचाच प्रत्यय ही परिषद व प्रदर्शनाच्या माध्यमातून येईल, असेही रामकृष्ण यांनी सांगितले. या उपक्रमाच्या माध्यमातून ऊर्जास्त्रोतांचा जबाबदारीने वापर करण्याचे भान समाजामध्ये विकसित करण्याचे ध्येय आहे. तसेच, पर्यावरणपूरक आणि विकसित राष्ट्र घडविण्याच्या मोहिमेची ही मुहूर्तमेढ ठरेल, असा विश्वास या परिषदेच्या समन्वय समितीचे अध्यक्ष अनिल पांडे यांनी व्यक्त केला.
एमसीसीआयए चे अध्यक्ष आणि प्राज इंडस्ट्रीज चे कार्यकारी अध्यक्ष श्री प्रमोद चौधरी म्हणाले “पश्चिम भारतात बायो एनर्जी संदर्भातील अश्या प्रकारचा कार्यक्रम पहिल्यांदाच आयोजित होत आहे. एमसीसीआयएच्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री मा. नितीनजी गडकरी यांनी सांगितले होते कि पुणे शहर हे बायो एनर्जी चे आदर्श केंद्र होऊ शकते. या कार्यक्रमाद्वारे त्यांनी त्यावेळी जे सांगीतले त्याच दिशेने आज आपले पाऊल पडत आहे. ‘बायो फ्युएल’ हे फक्त भविष्यातील इंधन नाहीये, तर यातून फक्त शेतीवर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांना व नवीन स्टार्टअप्सना उद्योजक होण्याची संधी मिळणार आहे. तसेच त्यांनी एमसीसीआयएला या कार्यक्रमाच्या आयोजनात सहभागी करून घेतल्याबद्दल भारत सरकारचे आभार मानले.


एनवायसीएसच्या माध्यमातून देशभरात विविध विकासकामांसाठी कार्यकर्त्यांचे जाळे कार्यरत आहे. जैवऊर्जेच्या आघाडीवरही देशव्यापी चळवळ उभारण्याची मोहीम हाती घेतली जाईल, असे एनवायसीएस च्या राजेश पांडे यांनी सांगितले.
शाश्वत विकास, जैविक ऊर्जा, जैवइंधन, ग्रामीण विकास, पर्यावरणपूरक आधुनिक जीवनशैली, पर्यावरणपूरक वाहतूक आदी विषयांवर आधारित चर्चासत्र, उपक्रम या दोन दिवसीय परिषद-प्रदर्शनामध्ये होणार आहेत. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवरील तज्ज्ञ या वेळी शेतकरी-विद्यार्थ्यांशी संवाद साधतील. तसेच, प्रदर्शनाच्या माध्यमातून जैवइंधनाची प्रचिती दिली जाणार आहे. प्रात्यक्षिके, प्रयोग, फिल्म आदींच्या माध्यमातून जैवइंधन क्षेत्रातील अद्ययावत तंत्रज्ञान व प्रयोगांची माहिती दिली जाईल. तसेच, हे प्रयोग यशस्वी करीत असलेल्या देशभरातील शेतकरी व संशोधकवर्गाशी संवाद साधण्याची संधीदेखील या परिषद व प्रदर्शनाच्या माध्यमातून मिळणार आहे.


चित्रकला-प्रश्नमंजुषा स्पर्धा

जैवऊर्जपरिषद व प्रदर्शनाच्या निमित्ताने शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला व प्रश्नमंजुषा स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. पुण्यासह इतरही काही जिल्ह्यांमध्ये त्याचे आयोजन करण्यात आले असून त्याची अंतिम फेरी औंध येथील पंडित भीमसेन जोशी कलादालनात होणार आहे. त्यामध्ये पुण्यातील शाळांमधील अधिकाधिक विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन शाश्वत विकास व जैवइंधन आदींसंदर्भातील आपल्या कलात्मक दृष्टीची प्रचिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. त्यामधील निवडक चित्रे परिषदेदरम्यान झळकाविण्यात येणार आहे.


बायोडिझेल कार-बस रॅली

जैवऊर्जा परिषदेच्या माध्यमातून मुंबई आणि बेंगळुरूहून खास जैवइंधनावर चालत असलेल्या बसेस पुण्यात दाखल होणार आहेत. या बसेससमवेत जैवइंधन कार रॅलीदेखील काढण्यात येणार आहे. अशा प्रकारची ही पहिलीच रॅली ठरेल. त्याचप्रमाणे, शहरातून विद्यार्थी-नागरिकांना या प्रदर्शनाला नेण्यासाठी याच जैवइंधन बसेसचा वापर करण्यात येणार आहे. त्यांच्या माध्यमातून पुणेकरांना जैवइंधन व पर्यावरणपूरक वाहतूक, या संदर्भातील प्रत्यक्ष अनुभव घेणे शक्य होईल. अशा प्रकारचा हा पहिलाच उपक्रम ठरत आहे.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.