अलिबाग कोळीवाड्यातील जागा मच्छिमारांसाठीच द्या !

    13-Jun-2017
Total Views |

 

आ. प्रशांत ठाकूर यांची सरकारकडे मागणी

कस्टम विभागाने कस्टम प्रकल्पांसाठी प्रस्तावित केलेली रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथील समुद्रकिनाऱ्याजवळ सर्व्हे नं. १९३ ही जागा येथे अनेक वर्षांपासून मासेमारी करणाऱ्या मच्छिमारांसाठीच देण्यात यावी अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे रायगड जिल्हाध्यक्ष व पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी राज्य सरकारकडे केली आहे.


प्रशांत ठाकूर यांनी अलिबाग मच्छिमार सोसायटीच्या शिष्टमंडळासमवेत राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील व पशुपालन, दुग्धोत्पादन आणि मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर यांना आज मंत्रालयात निवेदन देऊन ही मागणी केली. अलिबाग कोळीवाड्यातील समुद्रकिनाऱ्यालगत सर्व्हे. नं. १९३ ही जागा गेल्या अनेक दशकांपासून मच्छिमार मच्छिमारी व्यवसायासाठी वापरत आहेत. मासे पकडून ती मच्छी येथील मोकळ्या जागेवर वाळवून नंतर मच्छिमारांच्या कुटुंबातील स्त्रिया त्याची विक्री करतात. या कोळीवाड्यात सुमारे ३५० यांत्रिकी नौका असून कोळीवाड्यातील सुमारे २५०० कुटुंबांचा उदरनिर्वाह यातून चालतो. मात्र, कस्टम विभागाने कस्टमचे प्रकल्प सुरू करण्यासाठी येत्या १५ दिवसांत ही जागा खाली करण्याची नोटीस मच्छीमारांना दिली आहे.

 

सदर जागा मच्छिमार गेल्या १२० वर्षांपासून वापरत असून जागेचे असेसमेंट, घरपट्टी पावती, वीज कनेक्शन, नळपट्टी पावती आदी पुरावे आमच्याकडे असल्याचा दावा अलिबाग मच्छिमार सोसायटीने केला आहे. त्यामुळे सदर जागा सीमा शुल्क विभागाची कधी झाली हेच कळत नसल्याचे सोसायटीने म्हटले आहे. त्यामुळे ही जागा जर कस्टमने ताब्यात घेतली तर आमच्यावर उपासमारीची वेळ येणार असून आमच्याकडे आत्महत्येशिवाय पर्याय राहणार नाही असेही अलिबाग मच्छिमार सोसायटीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. हेच निवेदन घेऊन घेऊन आ. प्रशांत ठाकूर यांनी चंद्रकांत पाटील व महादेव जानकर यांची भेट घेतली. मंत्र्यांनी याबाबत लवकरच बैठक घेऊन तोडगा काढण्याचे आश्वासन प्रशांत ठाकूर यांना दिल्याचे समजते. 

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.