भारतीय विज्ञान संमेलन - परिचय

    06-May-2017
Total Views |



आज एकविसाव्या शतकात आपल्या भारताने विज्ञान तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात खूप प्रगती केलेली आहे. वैद्यकीय संशोधनापासून ते खगोलशास्त्रापर्येंत आणि संरक्षण क्षेत्रापासून ते मिडिया तंत्रज्ञानापर्येंत अनेक क्षेत्रात आपल्या देशातले वैज्ञानिक आज जागतिक महत्वाच्या प्रकल्पांमध्ये काम करताना दिसतात. अलीकडचंच उदाहरण द्यायचं झालं तर युरोपियन स्पेस एजन्सीच्या मंगळावर उतरणाऱ्या मार्स ऑर्बिटर कडून येणारे पहिले सिग्नल पुण्याच्या जायंट मीटरवेव्ह टेलिस्कोप (GMRT) कडून detect झाले. मार्स ऑर्बिटरचे केवळ ५ वॉटच्या दिव्याइतके क्षीण सिग्नल्स GMRT कडून detect झाले. जगभरात इतके क्षीण सिग्नल्स detect करण्याची क्षमता फारच थोड्या टेलीस्कोप्स मध्ये आहे. भविष्यात होणाऱ्या square kilometer array (SQA) मधील संदेशवहनाचे महत्वाचे कामही GMRT कडेच आहे. तशीच वैद्यकशास्त्रातली महत्वाची बातमी म्हणजे पुण्याच्याच National Chemical Laboratory (NCL) मधील संशोधकांनी चिकुनगुन्या आणि डेंगू पसरवणाऱ्या ‘एडीस इजिप्ती’ डासांच्या विरोधात काम करणारी compounds बनवण्यात यश मिळवले आहे. पारंपारिक कीटकनाशकांपेक्षा नव्याने बनवलेल्या compounds ची रचना वेगळी असल्यामुळे डासांची आणि त्यापासून होणाऱ्या रोगांची संख्या कमी व्हायला यामुळे मदत होणार आहे.


अशा प्रकारच्या अनेक बातम्या सांगता येतील कि ज्यामध्ये आपले भारतीय वैज्ञानिक जागतिक संशोधनाच्या तोडीस तोड किंवा त्याहीपेक्षा वरचढ कामगिरी करत आहेत. आणि अशा प्रकारचे उच्च दर्जाचे संशोधन आज भारतातल्या अनेक संशोधन संस्थांमध्ये चालू आहे. पण दुर्दैवाचा भाग असा कि हे संशोधन ज्या प्रमाणात समाजापर्येंत पोहोचायला हवं त्या प्रमाणात आज पोहोचलेलं दिसत नाहीये. आज लोकांना कदाचित फिजिक्स किंवा केमिस्ट्रीमधलं नोबेल या वर्षी कुणाला मिळालं हे माहित असेल(अर्थात हेही माहित असणार्यांची संख्या कमीच आहे....) पण आपल्या गावात, घराशेजारी असणाऱ्या या संशोधन संस्थांमध्ये काय चालतं याची त्यांना जराही कल्पना नाही. याचं कारण शोधताना आपल्याला असं लक्षात येतं कि आज या संस्थांमध्ये आणि बाहेरच्या समाजामध्ये संवादच उरलेला नाहीये किंबहुना तो पहिल्यापासून develop च झालेला नाहीये, याला अर्थात काही अपवाद आहेत कि जे आपलं काम योग्य माध्यमांमधून लोकांपर्येंत पोहोचवतायत पण अशांची संख्या फारच थोडी आहे. आजही या संशोधन संस्थांकडे एका आदरयुक्त भितीच्याच दृष्टीकोनातून बघितलं जातं आणि तिथं चालणाऱ्या रिसर्चबद्दल जाणून घ्यावं किंवा त्या research चा आपल्या दैनंदिन आयुष्यातल्या समस्या सोडवण्यासाठी सुद्धा उपयोग होऊ शकतो असं कुणाच्या मनातसुद्धा येत नाही.


आज जागतिक संशोधन क्षेत्राची व्याप्ती खूपच वाढलेली आहे. कम्प्युटर तंत्रज्ञानाच्या विकासातून कृत्रिम बुद्धिमत्ता (artificial intelligence) तयार करण्यापासून ते मानवी शरीरात असणाऱ्या पण शास्त्रज्ञांना अजून हुलकावणी देणाऱ्या मानवी मन (consciousness) आणि बुद्धी (intelligence) यांचा अर्थ लावण्यापासून ते परस्परातला संबंध प्रस्थापित करण्यापर्येंत आज घडामोडी चालू आहेत. Consciousness आणि quantum mechanics या दोन्हीचा अभ्यास करून quantum consciousness नावाच्या नवीन शाखेचा उदय होतो आहे. या सगळ्याच क्षेत्रांमध्ये भारतीय वैज्ञानिकांचं योगदान मोलाचं आहे. पण आजही शास्त्रीय संशोधन म्हणलं कि आपल्यापैकी बहुतेकांचे डोळे परदेशाकडे वळतात. त्यांनी केलेलं काम म्हणजे ‘standard!!!’ असं म्हणण्याची आपली सवय अजूनही गेलेली नाही. याचं मुख्य कारण म्हणजे आपल्या देशात चालणाऱ्या संशोधनाची आपल्यालाच पुरेशी ओळख नाही. शालेय शिक्षणापासून ते अगदी पीएचडी च्या अभ्यासापर्येंत आपल्या देशातल्या संशोधन क्षेत्राची माहिती आपल्याला कुठेच मिळत नाही. आर्यभट्ट, भास्काराचार्याचं गणित आणि खगोलशास्त्रातलं योगदान किंवा चरक आणि सुश्रुताचं वैद्यकशास्त्रातलं योगदान हा एक भाग झाला, पण आयुका किंवा NCRA चं गुरुत्वीय लहरींच्या संशोधानामधलं योगदान किंवा NIO(National Institute of Oceanography), डेक्कन कॉलेजचं पुरातत्व विज्ञानाच्या संशोधनामधलं योगदान याबद्दल आज किती लोकांना माहिती असते?


११ ते १४ मे मध्ये होणाऱ्या पाचव्या भारतीय विज्ञान संमेलनात या सगळ्या गोष्टी लोकांना बघायला मिळतील. पारंपरिक आणि आधुनिक विज्ञानाचा संगम ही या संमेलनाची संकल्पना आहे. प्राचीन काळापासून आधुनिक काळपर्येंत विज्ञानाच्या क्षेत्रातलं भारताचं काम जसं  यातून बघायला मिळेल तसाच आयुर्वेदापासून ते भौतिकशास्त्रापर्येंत विविध ज्ञानशाखांमधील अस्सल भारतीय विचार आणि त्या विचारानुसार काम करणाऱ्या लोकांनाही यातून भेटता येईल. यामध्ये देशाच्या संरक्षण क्षेत्राचा कणा असलेल्या DRDO(Defense, Research & Development Organization) मधील वरिष्ठ वैज्ञानिक असतील तसेच आपल्या देशात प्राचीन काळापासून अस्तित्वात असलेल्या data management अर्थात वंशावळी लेखनाची परंपरा पुढे चालू ठेवणारे लोकही असतील. या लोकांना भेटण्याची, त्यांचं पिढ्यानपिढ्या चालू असणारं  काम समजून घेण्याची संधी या संमेलनातून आपल्याला मिळणार आहे. भारतीय संगीताला प्राचीन काळापासूनचा वारसा लाभलेला आहे. विविध घराण्यांमधील संगीताने भारतीय संगीत चिरंजीव झालेलं  आहे. या संगीत प्रवासात वाद्यांचं असलेलं  स्थानही तितकंच  महत्वाचं  आहे. गायकांच्या घराण्यांसारखीच वाद्यनिर्मिती करणाऱ्यांची काही घराणी सुद्धा बऱ्याच काळापासून या क्षेत्रात कार्यरत आहेत. या संमेलनाच्या निमित्तानं अशाच एका प्रसिद्ध वाद्यनिर्मितीतज्ज्ञाशी संवाद साधण्याची संधी आपल्याला मिळणार आहे. याचबरोबर भारतीय संगीत आणि आधुनिक विज्ञान यांची सांगड घालणाऱ्या काही वैज्ञानिकांचे विचारही आपल्याला ऐकायला मिळतील. 


आपल्या देशात संशोधन फक्त वैज्ञानीक संस्थांमध्येच होतं  असं  नाही.  वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारे अनेक कारागीर आपापल्या ठिकाणी संशोधन करत असतात. पण त्यांच्या या संशोधनाला व्यक्त होण्याची, प्रसिद्धी मिळण्याची व्यवस्था दुर्दैवानं आज कुठेच उपलब्ध नाही. या भारतीय विज्ञान संमेलनात त्यांनाही आपलं  संशोधन मांडण्याची संधी मिळणार आहे. यात काही शेतकरी आहेत ज्यांनी शेतीच्या कामातले कष्ट कमी करण्यासाठी काही नवीन उपकरणे शोधून काढलेली आहेत तसंच पारंपरिक पद्धतीनं धातुनिर्मिती करणारे काही कारागीरही आहेत.  हवामानशास्त्र हा विषय घेतला तर त्या विषयातलं प्राचीन काळापासून आपल्या देशात असलेलं ज्ञान आणि आधुनिक काळातला त्या ज्ञानाचा विस्तार हा सगळा  पट  आपल्यासमोर इथे मांडला जाणार आहे.  


थोडक्यात सांगायचं झालं  तर भारतीय विज्ञानाबद्दल आस्था असणाऱ्या, कुतूहल असणाऱ्या किंवा मनात शंका असणाऱ्या सगळ्यांनी या संमेलनाला यावं. सगळ्यांनाच यातून काही नवीन माहिती मिळेल हे नक्की. 


                                                                                                                                                                                                                                     - अमेय पटवर्धन 

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.