शिखरावरून ‘आप’ जमिनीवर!

    01-May-2017
Total Views |

 
 
 
एव्हरेस्ट शिखर गाठल्यावर तेथे मुक्काम थोडीच करावयाचा असतो? आपल्या तळावर परतावयाचे असते, असे म्हटले जाते. राजधानीत यशाचे एव्हरेस्ट गाठल्यानंतर आम आदमी पक्षाला तळावर परतण्याची एवढी घाई झाली असेल हे मात्र वाटले नव्हते! राजधानीत अचानक उदयास आलेल्या आम आदमी पक्षाच्या घसरणीचा हा प्रवास थक्क करणारा आहे. राजधानीच्या राजकीय रंगमंचावर भाजपा व काँग‘ेस या दोन्ही दिग्गजांना पराभूत करीत आपचा झालेला उदय जेवढा थक्क करणारा होता, आपचा अस्तही तेवढाच थक्ककरणारा आहे! 

दोन वर्षांपूर्वी 70 पैकी 67 जागा जिंकून आम आदमी पक्षाने एक इतिहास घडविला होता आणि आता दिल्ली मनपाच्या निवडणुकीत आपचा सफाया झाला. दोन वर्षांपूर्वीच्या विधानसभा निवडणुकीत आपने इतर राजकीय पक्षांची जमानत जप्त करविली होती. यावेळी आपच्या उमेदवारांना अनेक वार्डात आपली जमानत  गमवावी  लागली. दोन वर्षांत मतदार किती व कसा बदलू शकतो, हे या निवडणुकीत दिसले. 2015 च्या विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाला जवळपास 54 टक्के मते मिळाली होती. यावेळी केवळ 27 टक्के. भाजपासाठी हा विजय उत्साहवर्धक असला, तरी 2014 च्या तुलनेत भाजपाला कमी मतदान झाले आहे. कदाचित एकूणच कमी मतदान हे त्याचे कारण असू शकते. 2014 मध्ये भाजपाला 46 टक्के मतदान झाले होते. 2015 मध्ये पक्षाला 32 टक्के मते मिळाली, तर 2017 मध्ये 36 टक्के. म्हणजे चार टक्के मतांनी जादू केली होती. 2015 मध्ये 32 टक्के मते मिळवूनही भाजपाचा जबर पराभव झाला होता, तर 2017 मध्ये केवळ चार टक्केजादा मते मिळवून भाजपाला जबरदस्त विजय मिळाला.

काँग्रेसचा फायदा

मनपा निवडणुकीत काँग्रेस पक्ष आपला जनाधार परत मिळवीत असल्याचे दिसत आहे. काँग‘ेसला 2014 व 2015 या दोन्ही निवडणुकीत मिळालेल्या मतांपेक्षा जादा मते मिळाली. 2015 मध्ये काँग्रेसला  केवळ 9.7 टक्के मते मिळाली होती, ती 11.4 टक्क्यांनी वाढली. काँग‘ेसचा मतदार जो आम आदमी पक्षाकडे गेला होता, तो पुन्हा स्वगृही परतत असल्याचे या निवडणुकीत दिसले. राजधानीच्या राजौरी गार्डन विधानसभा पोटनिवडणुकीतही काँग्रेसला चांगली मते मिळाली होती. मनपा निवडणुकीतही काँग्रेसला चांगली मते मिळत, 2015 च्या तुलनेत ती दुप्पट झाली. दलित-मुस्लिम मतदार  आम आदमी पक्षाकडे गेला होता, त्याने पुन्हा काँग्रेसचा हात धरला.

मोहभंग

आपचे नेते अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीतील नागरिकांना जणू भुरळ घातली होती. विशषेत: युवा मनाला. भाजपा व काँग्रेस समर्थक असणार्‍या हजारो घरांमधील युवा मतदारांनी आपले मत आपला दिले होेते. प्रत्येक घरात आपने विभाजन घडविले होते. एक चमत्कार अरविंद केजरीवाल यांनी घडविला होता. एक नव्या दमाचा नेता, अशी  त्यांची प्रतिमा  होती. मात्र, सत्ता मिळताच केजरीवाल यांनी जी नाटके सुरू केली, त्याचा फटका त्यांना या निवडणुकीत बसला.  केजरीवाल यांची सर्वात मोठी चूक म्हणजे त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात उघडलेली आघाडी!  मोदी यांच्यावर टीका करण्याचा त्यांना पूर्ण अधिकार होता व आहे. पण, टीका आणि अपमान यात मोठा फरक आहे. देशाच्या पंतप्रधानाला प्रत्येक घटनेवरून अपमानित करण्याचे धोरण केजरीवाल राबवीत होते. मोदी यांना मनोरुग्ण म्हणण्यापर्यंत केजरीवाल यांची मजल गेली होती. म्हणजे दिल्लीकरांच्या भल्यासाठी काम करण्याचे सोडून त्यांनी मोदी व केंद्र सरकार यांच्याविरोधात आघाडी उघडल्याचे दिसत होते.

जाहिरातींवर उधळपट्टी

दिल्ली सरकारने जाहिरातींवर मोठा खर्च करणे सुरू केले. याचाही उद्देश मोदी यांना अपमानित करण्याचा होता. पंतप्रधानपदाची अचानक जागृत झालेली महत्त्वाकांक्षा, हे याचे मु‘य कारण होते. मी फक्त  एकदाच परदेशी गेलो तर पंतप्रधान मोदी हे वारंवार  विदेशात जात आहेत, असे केजरीवाल म्हणत होते. आता पंतप्रधान आणि मु‘यमंत्री यांच्यातील फरक त्यांना कोण समजावून सांगणार? मोदी व केंद्र सरकार यांच्यावर हल्ला करण्याची एकही संधी केजरीवाल सोडत नव्हते. भारताने पाकिस्तानविरोधात केलेल्या लष्करी कारवाईच्या विरोधात त्यांनी भूमिका घेतली.

दिल्लीबाहेरच 
 
मुख्यमंत्री झाल्यानंतर केजरीवाल यांनी बराच काळ दिल्लीबाहेर घालविला. कधी ते निसर्गोपचारासाठी बंगळुरूला निघून जात, तर कधी ते पंजाबात जाऊन बसत. दिल्ली सरकार चालविण्याचे काम त्यांनी, त्यांचे उपमु‘यमंत्री मनीष सिसोदियांकडे सोपविले होते. दिल्ली सरकारला फारसे अधिकार नाहीत, ही घटनात्मक बाब ते स्वीकारण्यास तयार नव्हते. केंद्रात कोणत्याही पक्षाचे सरकार येवो ते सरकार, भू-संपादन, भू-आवंटन, पोलिस या बाबी राज्य सरकारकडे सोपवू शकत नाही, हे वास्तवही केजरीवाल स्वीकारण्यात तयार नव्हते. दुसरीकडे त्यांच्या सरकारमधील घोटाळे बाहेर येण्यास प्रारंभ झाला होता. त्यांचे आमदार वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये अडकत होते. महत्त्वाच्या पदांवर केजरीवाल आपल्या नातेवाईकांना नियुक्त करीत होते. या सार्‍या घटनांमुळे दोन वर्षांपूर्वी त्यांना डोक्यावर घेणार्‍या मतदारांनी त्यांना पायदळी तुडविले.
भविष्य  नाही

आम आदमी पक्षाचे भवितव्य आता संपल्यागत जमा आहे. केजरीवाल वगळता पक्षाजवळ अन्य नेता नाही. संजयसिंह, सिसोदिया, अजय राय यांना काहीही स्थान नाही. येणार्‍या काळात आपमध्ये संघर्ष सुरू होण्याची स्पष्ट चिन्हे आहेत. कुमार विश्वास यांनी पहिली तोफ डागली आहे. केजरीवाल यांच्यासमोरील पहिले आव्हान सरकार चालविण्याचे नाही, तर सरकार टिकविण्याचे आहे! आपचे 21 आमदार लाभाच्या पदात अडकले आहेत. निवडणूक आयोगाने त्यांना अपात्र ठरविल्यास त्या ठिकाणी पोटनिवडणूक होईल. या पोटनिवडणुकीत आपला आपल्या जागा कायम राखता न आल्यास आपचे आमदार फुटून बाहेर पडतील, असे दिसते. आपल्या आमदारांना, नव्या नगरसेवकांना एकत्र ठेवणे आजच त्यांना जड जात आहे. देवाच्या शपथा घालून ते त्यांना एकत्र ठेवत आहेत.  राजकारणात हे फार काळ चालत नाही. आपचे आमदारही बाहेर पडण्याची  चिन्हे आहेत. आप हे एक बुडणारे जहाज आहे, हे सर्वांच्या लक्षात आले आहे. 

पुन्हा निवडणूक

राजधानीत लोकसभा निवडणुकीपूर्वी पुन्हा एकदा निवडणूक होईल, असा एक अंदाज बांधला जात आहे. आम आदमी पक्षाच्या सरकारचा तीन वर्षांचा कार्यकाळ बाकी आहे. तो त्यांना पूर्ण करता येईल, याची शक्यता फारच कमी आहे. म्हणजे लोकसभा निवडणुकीसोबत वा त्यापूर्वीच दिल्ली विधानसभा निवडणूक होणे अटळ दिसत आहे.  
 
- रवींद्र दाणी
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.