विस्मृतीत गेलेल्या म्हणी वाकप्रचार भाग १२

    07-Apr-2017   
Total Views |


मेधाकाकू:  काय अवंती...झाली का... वार्षिक परीक्षेची तयारी...!! म्हणजे आता परीक्षा होईपर्यंत आपला म्हणींचा आणि वाकप्रचारांचा अभ्यास बंदच असेल ना...!

अवंती: नाही काकू....!! तुला माहित्ये की मी “परीक्षा” या शब्दाचा कधी तणाव घेत नाही म्हणूनच आपला म्हणींचा नियमित अभ्यास नेहमी प्रमाणे असेलच आजही...... कारण आई+बाबा आणि तू यांच्यामुळेच परीक्षेचे व्यवस्थापन कसे करायचे ते मी शिकले आहे... तेंव्हा आता तू, माझ्या परीक्षेचा ताण घेऊ नकोस...!! आणि गंम्मत म्हणजे येत्या उन्हाळी सुट्टीत काय करायचे आहे त्याची तयारी मी आत्तापासून केली आहे... आणि आजच्या म्हणीसुद्धा तयार आहेत...!!

मेधाकाकू: या वाढणार्‍या उन्हाळ्यात आणि परीक्षेच्या दिवसात तू इतकी कूल आहेस... मस्तच वाटतय मलाही...!.. हां तर काय तयारी आहे आजची...?

अवंती: ओके... ओके... तर काकू... आजच्या म्हणी सुद्धा अशाच काहीश्या निवडल्या आहेत मी....!! अग, परीक्षेची तयारी करून घेताना राहुलची आई आणि रमाचे वडील गेले चार दिवस किती ओरडतायत त्यांच्यावर.... ते मला माझ्या घरातसुद्धा ऐकू येते... आणि हाच अर्थ असावा आजच्या म्हणींचा.... सांगना मला, बरोबर आहे का माझे ...!! 

गाढवास टोणपा तेजिस इशारा.

मेधाकाकू: अरे व्वा अवंती खरेच किती जवळ आलीस मुद्द्याच्या, फारच छान प्रगती आहे की. असे बघ.. टक्के-टोणपे या जोड शब्दातला टोणपा म्हणजे फटका... म्हणजे गुरे हाकताना त्यांच्या पाठीवर काठीने दिलेला हलकासा फटका आणि तेजि म्हणजे जातीवंत अरबी घोडी. आता या म्हणीचा सारांश असा की पुढे चालण्यासाठी गाढवाला टोणपा म्हणजेच फटका मारावाच लागतो मात्र अरबी घोडी इतकी हुशार असते की तिला फक्त रीकिबीतल्या टांचेने दिलेला हलकासा इशारा पुरतो. मतितार्थ असा की काही काम करण्यासाठी काही लोकांना इशारा पुरतो... तर एखाद्याला फटकाच द्यावा लागतो. आता शाळेत शिकणार्‍या अनेक विद्यार्थ्यांची अशीच परिस्थिति दिसते आपल्याला. समजून-उमजून अभ्यासात लक्ष देणारी तू एका बाजूला आणि अभ्यास करा म्हणून आई-बाबांचा रोज ओरडा खाणारे राहुल-रमा...!! या म्हणीतली टोणपा आणि तेजी ही रूपके, अनेक शतकांपासून थोड्याशा उपहासाने अशाच भिन्न प्रवृत्तीच्या व्यक्तींच्या वर्मावर नेमके बोट ठेवतात.

अवंती: अरेच्या... असा अर्थ आहे का... सुपर कूल ... काकू...!!..  म्हणजे मी तेजि नावाची घोडी आहे की काय असा प्रश्न पडलाय मला... हे हे हे...!!आता हे काय नविन या म्हणींत... इथेही घोडाच आहे की...? 


बिगारीचे घोडे व तरवडाचा फोक.  

मेधाकाकू: पुन्हा एक मस्त म्हण निवडलीस आजच्या अभ्यासाला...!! असे बघ, तरवडाचा फोक म्हणजे याच नावाच्या एका झुडुपाची बारीक फांदी जी छडी म्हणून गुरे हकताना किंवा घोड्यावर स्वारी करतांना वापरतात. बिगारीचे घोडे म्हणजे भाड्याने आणलेला घोडा…! आता या म्हणीतले रूपक वेगळीचं गोष्ट सांगते. शाळेत शिकवलेला अभ्यास समजत नाही आणि घरी कोणी शिकवू शकत नाही म्हणून अनेक पालक आपल्या मुलांना बाहेरच्या कोचिंग क्लासमध्ये शिकवणी लावतात...! अशा विद्यार्थ्यांना शिकवणी देणारे शिक्षक त्यांना काय – कसे आणि किती वेळ शिकवतात हे पाहायला पालक कधी जात नाहीत. या शिक्षकांना त्यांच्या मानधनाचीच जास्त काळजी असते. या म्हणीचा उपहासपूर्ण मथितार्थ इतकाच की भाड्याने घेतलेल्या घोड्याला जोरात पळवावे म्हणून स्वार त्याला किती वेळा छडी मारतोय त्याची काळजी घोड्याचा मालक करीत नाही आणि त्याने  करूही नये. प्रत्येक ठीकाणी नाक खुपसू नये. हे रूपक व्यवहारातील अशा अनेक संदर्भाना योग्य ठरते. 

अवंती: बापरे.. काकू... आता आधुनिक संदर्भ वेगळे वाटत असले तरी आपल्या बुद्धिमान मराठी समाजात या प्रवृत्तींचा किती सखोल अभ्यास झाला असेल याचेच माला कौतुक वाटते. काकू आजची ही शेवटची म्हण...!!  

घोडी मेली ओझ्याने आणि शिंगरु मेले हेलपाट्याने.

मेधाकाकू: आज परीक्षेच्या तयारी बरोबरच तुझे म्हणींचे वाचन सुद्धा झालेले दिसतय मला...! ही म्हणसुद्धा आजच्या आपल्या विषयाशी अगदी सुसंगत आहे...!! जणू काही हे वर्णन वरच्या म्हणीसारखेच विद्यार्थी आणि त्याचे पालक यांचे असावेसे वाटते आहे मला. वर वर्णन केल्याप्रमाणे पाठीवर लादलेल्या ओझ्याने घोडीचा प्राण गेला तर तिच्या मागेमागे मारलेया हेलपाटयांनी शिंगराचा प्राण गेला, हा यातला अतिशयोक्ति अलंकार वजा केला तर या म्हणीचा मथितार्थ असा की शाळेत शिकणार्‍या आपल्या मुलाच्या दप्तराचे ओझे, शाळेत जाताना आपल्या पाठीवर घेणारी आई किंवा वडील यांची, मुलाच्या शिक्षणाच्या कसरतीच्या या सर्व श्रमाने होणारी दमछाक आणि शाळेनंतर नेमून दिलेल्या दैनंदिन कराटे-टेनिस-गायन-चित्रकला आणि शिकवणी अशा उपक्रमानी दमून जाणारी शाळकरी मुले, यांचे जणूकाही वास्तव वर्णन. अशा या म्हणी आणि वाकप्रचार आजच्या बदलत्या संदर्भाना सुद्धा किती चपखल वाटतात.....ही आपल्या समृद्ध मराठी भाषा संस्कृतीची वैशिष्ट्ये...!!

- अरुण फडके

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

अरूण फडके

गेली ३५ वर्षे इमारत दुरूस्ती व्यवसाय - या विषयातील अनेक यंत्र-तंत्रांचे विशेषज्ञ, नाट्यक्षेत्रातील नामवंत विश्वस्तनिधींचे विश्वस्त, मोठ्या उत्सवी कार्यक्रमांचे अनुभवी संघटक (Event designer),  फ्रीमेसनरी या प्राचीन जागतिक संघटनेचे सदस्य आणि संघटनेच्या भारतातील इतिहासाचे अभ्यासक आणि एक इंटरनॅशनल कॉफी टेबल बूक प्रकाशित, (सिंबॉल–सिंबॉलिझम--अॅलिगरी) चिन्ह-चिन्हसंकेत-चिन्हार्थ या विषयाचे अभ्यासक.