बने है उजाला तो रोशनी उन्हे भी देंगे|

    27-Apr-2017
Total Views |

 

गावाकुसाबाहेरचा समाज, त्याच्या व्यथा आजही संवेदनशील मनाला चटका दिल्याशिवाय राहत नाही. एक गाव, एक पाणवठा, एक स्मशान, यासोबतच सर्वांना समान संधी, समान न्याय हा आजच्या लोकशाही भारताचा सामाजिक मंत्रच आहे. या मंत्रानुसार गेली ३५ वर्षे समाजासाठी कामकरणारी संघटना म्हणून अखिल भारतीय मातंग संघ संघटनेचे महत्त्व मोठे आहे.

समाजासाठी, जातीसाठी कामकरणार्‍या संघटना आपल्या देशात पैशाला पासरी आहेत. त्यामुळे अखिल भारतीय मातंग संघ म्हणजे हीसुद्धा नावानुसार मातंग समाजासाठी कामकरणारी संघटना असावी, असे प्रथमदर्शनी वाटतेच, पण तसे नाही. अखिल भारतीय मातंग संघ हा कोण्या एका जातीपुरता मर्यादित नाही, तर समस्त वंचित समाजासाठी त्यांच्या कामाची बांधणी सुरू असते.
 
अखिल भारतीय मातंग संघाची स्थापना कशी झाली? ती ७० च्या दशकात, राजकारण, समाजकारण यामध्ये अनुसूचित जातींमधील या समाजबांधवांनी आपल्या कर्तृत्वाने, मेहनतीने, संघर्षाने योग्य ते स्थान मिळवले. याच वेळी अनुसूचित जातींमध्ये समाविष्ट केला गेलेला एक गट मात्र अजूनही ’दे माय सुटे गिराण’ च्या ग्रहणचक्राच्या खातेर्‍यात कुजत पडला होता. कोणत्याही व्यासपीठावर या समाजगटाचे अस्तित्व नगण्यच होते, किंबहुना आपणही दुर्देवी,वंचित आहोत आणि घटनेने आपल्यालाही सवलती दिल्या आहेत यापासून हा समाज कोसो दूर. पोतराजकी करायची, त्यातून जे दान मिळेल त्यावर गुजराण करायची. झाडू वळायचे, ते गावातल्या सन्माननीय घरांना प्रथेच्या नावाने विनामूल्य द्यायचे. त्या बदल्यात ती सन्माननीय घरे या मातंगबांधवांना भाकरीचे दान देणार. त्यावर यांची गुजराण. त्यापलीकडे ना कसली इच्छा ना कसली आकांक्षा. मातंग समाजाचे १९७० सालचे वास्तव यासाठी मांडले कारण या वास्तवामध्येच अखिल भारतीय मातंग संघाच्या जन्माचा उगम आहे.

 
याचवेळी मुंबईत बाबासाहेब गोपले नावाचा मातंग समाजाचा तरुण डॉक्टरकीचे शिक्षण संपवून प्रॅक्टिस करू लागला. डॉक्टरांच्या दवाखान्यात त्यावेळी येणारेही गोरगरीब आणि वंचित समाजातील बांधवच. एके दिवशी मातंग समाजातलीच भगिनी त्यांच्याकडे उपचारासांठी आली. दयनीय अवस्था, हाडाची काडं. जणू दुर्दैवी, गरिबी आणि लाचारीचे भाव तिच्या अस्तित्वाचा अविभाज्य भाग. साहजिकच डॉक्टरांच्या तपासणीचे नाममात्र शुल्क देण्याइतकीही तिची ऐपत नव्हती. डॉक्टरांनी शुल्क घेतले नाही, पण बाहेरून गोळ्या, औषध घेणे जरूरी होते. यावर तिचे म्हणणे, ’’या असल्या जिंदगीपेक्षा मेलेले बरे.’’ विष खायलादेखील पैसे नाहीत. भयानक किड्यामुंगीलाही जगण्याची प्रेरणा, बळ देते. इथे डॉक्टर गोपलेंकडे येणार्‍या समाजबांधवांची जगण्याचीही इच्छा लुप्त झालेली. आपल्याच जातीचा डॉक्टर म्हणून डॉक्टर बाबासाहेब गोपलेंना लोक या ना त्या प्रसंगी बोलवू लागले. समाजबांधवांशी त्यांचा संबंध दवाखान्यापुरता मर्यादित न राहता, डॉ. गोपले आता स्वतः लोकांच्या वस्तीत जाऊ लागले. तिथे जुन्याजाणत्या लोकांना भेटून त्यांना जाणवले की, समाजाची अस्मिता आजही तीव्र आहे पण परिस्थितीच्या चटक्यांनी समाज रसातळाला गेला आहे, समाजाला बांधायला हवे, एकी करायला हवी. यावर लोकांचे अभावितपणे मत नक्कीच यायचे. आपल्या समाजाला नेता मिळालाच नाही. वास्तविक डॉ. गोपलेंना ही भूमिका कधीही पटलीच नाही. कारण, त्यांच्यामते समाजाला दिशा देणारे शाहू-फुले-आंबेडकर हे तर सगळ्याच वंचितांचे नेते आहेत. त्यांच्या विचारांचा वारसा घेऊन समाजात जागृतीची, प्रगतीची चेतना निर्माण करायला हवी. डॉक्टर गोपलेंनी चरितार्थाचे एकमेव साधन असणारी डॉक्टरकी सोडली. २४ तास समाजासाठीच कामकरण्याची त्यांनी शपथ घेतली. त्याला साथ दिली त्यांच्या पत्नीने कुसुमताई गोपलेंनी. त्यातूनच मग १७ जानेवारी १९८२ रोजी मोहने कल्याण येथे अखिल भारतीय मातंग संघाची स्थापना केली गेली. फार पूर्वीपासून आपल्या देशात सामाजिक अभिसरणाची, समरसतेची उज्ज्वल परंपरा आहे. त्या पार्श्वभूमीवर जातीपातीत विभागलेल्या आणि दुर्देवाने जातीभेदाच्या कचाट्यात पिचलेल्या समाजाच्या उत्थानासाठी आपल्या देशातील अनेक नरोत्तमांनी शब्दातीत कामकेले. अनाकलनीय वर्षे सामाजिकदृष्ट्‌‌‌या मागास असलेला बांधव लोकशाहीच्या घटनात्मक सवलतीने, आहे रे गटाच्या मुख्य समाजप्रवाहात प्रविष्ट झाला. समाज अभ्यासकांच्या मते, नाही रे गटातून तो आला, त्याने कष्ट केले, संघर्ष केला, हवे ते मिळवले, तो आहे रे गटाचा झाला आणि मागे राहिलेल्या नाहीरे गटाच्या, आपल्या रक्तामांसाच्या, एका नाळेच्या समाजबांधवांना मात्र कायमचे विसरला. यात तथ्य आहेच पण डॉक्टर बाबासाहेब गोपलेंनी या तथ्याला ’हा सूर्य हा जयद्रथ’ म्हणत नाकारले. समाजाचा सुशिक्षित युवक समाजासाठी कामकरून समाजाची प्रगती करू शकतो, असे त्यांनी आणि त्यांच्या अखिल भारतीय मातंग संघाने सिद्ध केले.
 
 बने है उजाला तो रोशनी उन्हे भी देंगे
 जिनके दायरोंमे हमजिना सिखे
हक मिला है हमे तो हक उन्हे भी दिलायेंगे
जिनके साथ जुडा है अतित कल और आज का..
 
या काव्यपंक्ती वास्तवात खर्‍या करत अखिल भारतीय मातंग संघ कामकरू लागला. आजपर्यंत संघटनेच्या कामाचे स्वरूप पाहिले की आपल्याला जाणवते की असलेल्या चौकटीत मिळणार्‍या सेवासुविधा मिळविण्यासाठी संघर्ष करणे, पाठपुरावा करणे वगैरे वगैरे.. पण अखिल भारतीय मातंग संघाने नसलेल्या चौकटीत आपल्याला हवे ते निर्माण करण्याचे अमोल कार्य केले. महाराष्ट्रभर जनसंपर्क करून गावोगावी, खेड्यापाड्यात आपल्या संघटनेच्या शाखा उघडल्या. गावोगावी खेडोपाडी या संघटनेच्या शाखा कशा निर्माण झाल्या, हे सांगताना संघाच्या सध्याच्या अध्यक्ष कुसुमताई गोपले सांगतात, ’’आमच्या समाजात दखने, खान्देशी, वर्‍हाडे, घोडके, डफळे, उचले, पिंढारी, होलर, गारुडी, ककरकाढे, मांगेला, मदारी वगैरे. अशा पोटजाती असल्या तरी, सर्वांना मांग पूर्वजांची लेकरे असल्याचा अभिमान आहे. माझे पती डॉक्टर गोपले आणि त्यांच्यासोबत मी याच्या त्याच्या माध्यमातून गावोगावी संपर्क करत असू. एक नवा रुपया खिशात नसायचा पण आम्ही गावच्या मांगवाड्यात हजर राहायचो. तिथे ओळख काढून समाजबांधवांच्या घरी राहायचो. अर्थात अठरा विश्वे दारिद्य्र आणि असहाय्यता तिथेही हात जोडून स्वागताला उभी. पण आम्हाला त्यांच्याकडून काहीच नको होते. आम्हाला फक्त त्यांना सांगायचे होते की संघटित व्हा, आपले हक्क मिळवा. न्यूनगंडामुळे ते कोणत्याही हक्काचे भागीदारही व्हायला तयार नव्हते. आम्ही त्यांना सांगायचो की, आपण एकत्र राहिले पाहिजे, आपण मांग म्हणवतो पण आपण मातंग ऋषिंचे वंशज आहोत. राजा छत्रपती शिवबाने स्वराज्याचे तोरण बांधले, तेव्हा स्वराज्य ही तर देवाची इच्छा, अशी शपथ घेतली होती. त्यावेळी शिवबाने स्वराज्याचे तोरण बांधले, ते लहुजी मांगाच्या हस्ते. लोकमान्य टिळक, गो. ग. आगरकर, वि. दा. सावरकर, महात्मा फुले, वा. ब. फडके यांना तालीमदेणार्‍या देशभक्त लहूजी वस्ताद. सावित्रीबाईंच्या शाळेत शिकायला जाणारी पहिली विद्यार्थिनी मुक्ता साळवे, या सगळयांचे आपण वशंज. एवढी आभाळाएवढी मोठी माणसं आपले पूर्वज. मग त्यानंतर असं काय घडलं का आपण असे मागासलेले राहिलो? कारण, आपण त्यांना विसरलो, आपण आपसात एकी करायला विसरलो. चला एकत्र येऊया.’’ डॉक्टर गोपले असे म्हणू लागले की माणसांमध्ये जीव यायचा. तेज यायचं आणि माणसं जुळू लागायची. त्यातूनच आज अखिल भारतीय मातंग संघ खर्‍या अर्थाने अखिल भारतीय झाला आहे.
 
कुसुमताई गोपले बोलत होत्या. अत्यंत साधी राहणी, भाषेत जाणवणारा अस्सल बोली लहजा. डॉ. बाबासाहेब गोपलेंचे नुकतेच निधन झाले. त्यांच्यानंतर सर्वांच्या संमतीने आणि आग्रहाने कुसुमताई गोपले या अखिल भारतीय मातंग संघाच्या अध्यक्ष झाल्या. अर्थात नेत्याची पत्नी नेता या अत्यंत घातकी पायंड्यामुळे त्या या संघटनेच्या अध्यक्ष झाल्या नाहीत तर, ३५ वर्षांपूर्वी डॉ. बाबासाहेब गोपलेंसोबत विवाह करून त्या सासरी आल्या तेव्हा कुसुमताईंच्या पालकांनी एका डॉक्टरची पत्नी, त्यातून आलेले एक सामाजिक, आर्थिक स्थैर्य पाहूनच कुसुमताईंचा विवाह बाबासाहेबांशी लावून दिला होता. डॉ. गोपलेंनी डॉक्टरकी सोडून गावोगावी फिरून समाजजागृतीचा वसा घेतला. त्यावेळी समोर सर्वच बाबतीत अंधार होता. पतीच्या समाजकार्याला नुसता होकार न देता त्यामध्ये कुसुमताईंनी स्वतःला पूर्णतः झोकून दिले. लागून गेली मोठी डॉक्टरची बायको, काय फायदा, खिशात नाही दमडी, चाय प्यायला पण दुसर्‍यांच्या घरी आणि चाललेत समाजाला सुधारायला, असे शेलके टोमणे सकाळ-संध्याकाळ या ना त्या गावात एकदा तरी कुसुमताईंना आहेर म्हणून मिळतच. त्यावेळी सेवाभावी संघटनांना अनुदान मिळण्याचे दिवस नव्हते. लोकांच्याच घरी राहायचे, त्यांनी दिलेले तेच आणि तेवढेच खायचे आणि त्यांचेच प्रबोधन करायचे, असा त्यांचा वर्षानुवर्षांचा दिनक्रम. त्यामुळे वैयक्तिक हौस मौज, आवड या सर्वांचा गोपले कुटुंबाने त्याग केला. संघटनेने उभारलेल्या सर्वच लढ्यात योजनेपासून परिपूर्तीपर्यंत डॉक्टर गोपलेसोंबत कुसुमताईंचे योगदान आहे. या पार्श्वभूमीवर डॉक्टर गोपलेंच्या मृत्यूनंतर कुसुमताई संघटनेच्या अध्यक्ष झाल्या.
 
आजपर्यंत संघटनेने केलेली कामे कोणती? यावर कुसुमताई म्हणाल्या, ’’मांगाची लेकरं गावाची चाकरं असं म्हणून मुक्या ढोरागत जगणार्‍या समाजाला जय मातंग म्हणून स्वतःचं आयुष्य माणसासारखं जगण्याचं बळ दिलं, हे आमच्या संघटनेेचे मोठे कामआहे. समाजाचा पूर्वापार चालत आलेला व्यवसाय बंद झाला. पोतराजकी करून भिक्षा तरी किती मागणार? कामधंदे न करता देवाच्या नावाने जगायचं. पोतराजकी करून खायचं. त्यामुळे शिकायचं कशाला ही वृत्ती समाजभर पसरलेली. ही प्रथा बंद करण्यासाठी आम्ही संघर्ष केला. देवीच्या जत्रेला अख्खा समाज येतो. आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना घेऊन जत्रेला गेलो. दिसेल त्या पोतराजाच्या केसांच्या जटा कापू लागलो. संबळ काढून घेऊ लागलो. संबळींची तर होळीच केली. कोण आहे आणि का असं करतंय? जत्रेत गदारोळ सुरू झाला. संबळाची होळी करताना मी आणि डॉक्टर तिथेच उभे होतो. सुरक्षेसाठी पोलिसांनी कैद केले. लोक आम्हाला मारायला जमले. कारण परंपरेचा अपमान केला होता. डॉक्टरांनी न भिता, न घाबरता, ’’पोतराजकी करण्यापेक्षा शिका आणि काहीतरी बना,’’ असे सांगून जमलेल्या लोकांना तिथेच मार्गदर्शन केले. लाठीकाठी घेऊन मारायला आलेला तो जमाव सगळे ऐकून थंड झाला. ती सुुरुवात होती. शेकडो लोकांनी पोतराजकी सोडली. हजारोंनी पोराबाळांना शिकवायचे ठरवले. या प्रथेला समाजाने मोठ्या प्रमाणात तिलांजली दिली. पण पोतराजकी सोडून जगायचे कसे हा प्रश्न लोक विचारू लागले. त्यासाठी मग आम्ही अभ्यास करू लागलो. कामकरू लागलो. त्यामुळेच की काय, आमच्या संघटनेशी विविध विचारधारेचे लोक जोडले गेले आहेत. मातंग समाजासाठी कामकरणारे आणि आम्हाला सहकार्य करणारे एक नाव म्हणजे रा स्व संघाशी जोडले गेलेले शिवाजी सानप होत. तर पुढे सर्वांच्या मदतीने आम्ही कामाची दिशा ठरवत गेलो ’’
   
पुढची कथा अशी की, डॉ. बाबासाहेब गोपलेंनी ठरवले की, फक्त मातंग समाजाच्या कल्याणासाठी कामकरणारे सरकारी महामंडळ अस्तित्वात यायला हवे. जे मातंग समाजातील आर्थिक आणि सामाजिक प्रगतीसाठी सवोर्र्तोपरी साहय्य करेल. प्रेरणास्थान असलेले लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या नावाने महामंडळ निर्माण व्हायला हवे. त्यासाठी अखिल भारतीय मातंग संघाने डॉक्टर गोपलेंच्या नेतृत्वाखाली धरणे, आंदोलन, सत्याग्रह, उपोषण, आत्मदहनाचा इशारा, तुरुंगवास अशा १५३८ दिवसांचा संघर्ष केला. त्यानंतर सरकारने ११ जुलै १९८५ साली लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची स्थापना केली. या महामंडळाने मातंग समाजाच्या होतकरू तरुणांना आशेचा, यशाचा मार्ग दाखवला. पण पुढे महामंडळाच्या स्थापने नंतरही, समाजाचा विकास होताना दिसला नाही. समाज जुन्या चालीरीती प्रथा सोडून प्रगतीमय समाजात सामील होऊ पाहत होता. पण, कुठेतरी घोडे अडले होते. नक्की काय होते? सध्याचा मातंग समाज आणि त्याची परिस्थिती काय आहे? यावर अभ्यास होणे गरजेचे होते. आम्ही तुम्हाला जी मदत देतो ती घ्या, या धोरणानुसार समाजाचा विकास होत नाही, तर नित्यनव्याने बदलणार्‍या समाजाच्या गरजांचा नित्यनव्याने अभ्यास होणे गरजेचे आहे. मातंग समाजाचा अभ्यास व्हायला हवा, यासाठी अखिल भारतीय मातंग संघाने सरकारदरबारी मागणे मांडले. १३५ वेळा मोर्चे काढल्यानंतर सरकारने दखल घेतली. त्यानंतर १ ऑगस्ट २००३ रोजी सरकारने क्रांतीवीर लहूजी साळवे मातंग समाज अभ्यास आयोगाची स्थापना केली. अनुसूचित विद्यार्थिनींच्या वसतिगृहाला ’मुक्ता साळवे वसतिगृह’ नाव देण्यासाठीही संघाने लढा दिला. मुंबई येथील मातंग समाजाच्या झोपडपट्ट्या आणि ग्रामीण भागातील गायरान जमिनीचे पट्टे भूमिहीन मातंग समाजाला मिळावे यासाठी अखिल भारतीय मातंग संघाने मोठा लढा उभारला. त्यामुळे शहरी भागामध्ये मातंग समाजाच्या वस्त्या स्थिरावल्या आणि ग्रामीण भागात शेकडो भूमिहीन मातंग बांधवांना जमिनी मिळाल्या. उत्पन्नाची साधने निर्माण झाली.
     
मला वाटते, अखिल भारतीय मातंग संघाचे हे यश एकमेवाद्वितीय आहे. कारण, त्याकाळी कोणत्याही सरकारी योजनांचे नाव गांधी-नेहरू यापलीकडे जातच नव्हते. अशा परिस्थितीत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे काय किंवा क्रांतिवीर लहूजी साळवे काय, यांची नावेच समाजासाठीच्या योजनांना मिळवून देणे ही मोठी गोष्ट आहे. पुढे अखिल भारतीय मातंग संघाने आपल्या कामाचा विस्तार वाढवला. जिथे कुठे कुणावर अत्याचार अन्याय होत असेल तिथे संघ धावून जाई. त्यातच पुढे मातंग समाजात मोठ्या प्रमाणात पांढरीकरण होऊ लागले. पांढरा रंग म्हणजे येशबाप्पाचा पंथ. हळूहळू मातंग समाजात घुसत होता. यावर यळकोट यळकोट जय मल्हार, पिवळ्या झेंड्याचा यळकोट करत, यात्रा, जत्रा, देव, जागृती, सरकारी योजना यांचा परिचय, त्याची कार्यवाही करत अखिल भारतीय मातंग संघ घराघरात हिंदुत्वाचा वारसा घेऊन पोहोचू लागला. आपण हिंदूच होतो आणि आहोत, यासाठी अखिल भारतीय मातंग संघाने दादरच्या शिवाजी पार्कमध्ये मेळावा आयोजित केला. तिथे मोजून पाच लाख समाजबांधव जमले. परिसर यळकोट यळकोट जय मल्हार आणि आसमंत पिवळ्या हळदबुक्क्याने भारून गेले. मातंग समाजाचे विराट हिंदुत्ववादी रूप पाहून महाराष्ट्रात मातंग समाजात उधळलेले धर्मांतराचा घोडे अडले ते अडलेच. मातंग बांधवांना माणूस, तोही भारतीय हिंदू माणूस म्हणून अखिल भारतीय मातंग संघाने जो हक्क मिळवून दिला त्याला तोड नाही. काही दिवसांपूर्वी ’माय होमइंडिया’तर्फे दिला जाणारा ’समरसता पुरस्कार’ कुसुमताई गोपलेंना मिळाला. अर्थात निस्वार्थी भावनेने कामकरणार्‍यांना पुरस्काराचे सोयरसुतक नसतेच म्हणा. असो, काही महिन्यांपुर्वी डॉ. बाबासाहेब गोपलेंचे निधन झाले त्या दिवशी इतका जनसागर उसळला की मुंबईचा पूर्वदुतगती महामार्ग कितीतरी तास बंद होता. निःस्वार्थीपणे समाजासाठी कामकरणार्‍या बाबासाहेब गोपलेंना समाजाने दिलेली ती मूक तरीही अविस्मरणीय श्रद्धांजलीच होती. निस्वार्थीपणे तीन दशके समाजसाठी झटणार्‍या आखिल भारतीय मातंग संघावरचे ते प्रेमहोते. शेवटी काय?
दिव्यत्वाची जेथे प्रचिती, तेथे कर माझे जुळती|
 
- योगिता साळवी
 
  
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.