प्रसूतेतील नैराश्य

    26-Apr-2017
Total Views |

 
 
प्रसूतीनंतर दुसर्‍या-तिसर्‍या दिवशीपासून ही काळजी वाटू लागते आणि सर्व जमू लागल्यावर एखाद-दोन महिन्यात निघून जाते. थोड्या अवधीसाठी असलेली चिंता, सौम्य स्वरूपातील काळजी हे रास्त आहे. याला ’नैराश्य’ म्हणत नाही, पण याची प्रखरता तीव्र असली किंवा अवधी खूप महिन्यांचा असला, तर मात्र ते प्रसवोत्तर नैराश्य असण्याची शक्यता आहे.
 
 
स्त्रीच्या जीवनातील एक महत्त्वाचा भाग म्हणजे ‘आई होणं.’ प्रजोत्पत्तीची क्षमता केवळ स्त्री शरीरात आहे. काळानुरूप बरेच बदल घडत गेले, पण प्रजोत्पत्ती आजही केवळ स्त्रीच करू शकते. स्त्रीला विविध स्तरावर विविध भूमिका कराव्या लागतात. घरी नोकरीच्या ठिकाणी विविध नात्यांमध्ये सगळे बघावे लागते, सांभाळावे लागते. असे असले तरी आई झाल्यावर मात्र सगळ्यात जास्त जबाबदारी वाढते. हल्ली घराघरांतून १ किंवा २ अपत्ये असतात. शिक्षण, नोकरी, स्थिरस्थावर होऊन आर्थिकदृष्ट्या स्थिरावल्यावर लग्न आणि त्यानंतर गर्भधारणा हे सगळे होईपर्यंत बहुतांशी वेळेस स्त्रियांची तिशी उलटून जाते. नोकरी-धंद्यामुळे आपले गाव/शहर/घर सोडून दुसरीकडे राहावे लागते. विभक्त कुटुंबपद्धती (nuclear family) चे प्रमाण हल्ली खूप आहे. त्यामुळे गर्भिणीवर सगळे करणे भागच पडते.
 
प्रसूतीनंतर आपल्याला जमेल का? हा प्रश्न बहुतांशी सर्वच नवमातांना पडतो. आपल्याला दूध पाजता येईल का? आंघोळ घालता येईल का? आपण झोपेत बाळावर तर नाही ना जाणार? बाळाचे रडणे आपण झोपल्यावर ऐकायला येईल ना? शी-शू कळेल ना? इ. एक ना अनेक प्रश्न प्रसूत मातेच्या मनात नक्की येऊन जातात. ही काळजी/चिंता सुरुवातीचे काही दिवस असणे स्वाभाविक आहे. कुठलीही नवीन गोष्ट करायची झाली की, ती जमेपर्यंत वेळ लागतोच. अहो, साधा मोबाईल जरी नवीन घेतला तर त्याचे सगळे फीचर्स समजून घ्यायला लागतात ना थोडे दिवस, पण ही तात्पुरती काळजी वेळेपरत्वे कमी होते वा हळूहळू निघून जाते. सुमारे ७०-८० टक्के प्रसूत स्त्रियांमध्ये ही थोडीफार काळजी आढळून येते. यालाच ’Baby Blues' असेही म्हणतात. प्रसूतीनंतर दुसर्‍या-तिसर्‍या दिवशीपासून ही काळजी वाटू लागते आणि सर्व जमू लागल्यावर एखाद-दोन महिन्यात निघून जाते. थोड्या अवधीसाठी असलेली चिंता, सौम्य स्वरूपातील काळजी हे रास्त आहे. याला ’नैराश्य’ म्हणत नाही, पण याची प्रखरता तीव्र असली किंवा अवधी खूप महिन्यांचा असला, तर मात्र ते प्रसवोत्तर नैराश्य असण्याची शक्यता आहे. बाळाच्या जन्मानंतर मातेला थकवा येतो गळून जायला होते. काही दिवस रक्तस्त्राव होतो. बाळही सुरुवातीस अधिक झोपते. पण, मातेची झोपेची वेळ आणि बाळाची उठायची वेळ एक असली तर मातेला विश्रांती मिळत नाही. काही वेळेस बाळाचा छोटासा देह बघून माता भांबावून जाते. मी या बाळाचे कसे करणार? कसे उचलू? कसे दूध पाजू? कशी आंघोळ घालू? हातातून पडणार तर नाही ना? मला जमेल ना? अशी सतत मनात घालमेल सुरू असते. हळूहळू सवयीने सगळे जमू लागते. काहींना बाळ रडू लागले की, स्वत:ला रडू येते. ते का रडते? हेच त्या प्रसूत स्त्रीला कळत नसते. बहुतांशी वेळेस बाळाने शी-शू केली किंवा भूक लागली तरच ते रडते. पण, काही माता घाबरून जातात. का रडत असेल? काही दुखत असेल का? बाळाचे रडणे कशासाठी आहे, याचा विचार करून माता चिंतातूर होते, स्वत:च रडू लागते. नवजात बालकाच्या मागण्या खूपच प्राथमिक असतात. पोट भरलं की ते झोपतं. शी-शू झाली की रडतं, बाळाचे हट्ट, मागण्या हे नंतर ते बोलू लागल्यावर सुरू होतात, आधी त्याचे आयुष्य अगदीच साधे-सोपे असते.
मातेचे बाळाच्या जन्मानंतर विश्व बदलते. त्याची झोपेेची वेळ, आंघोळीची वेळ, दुधाची वेळ सगळं सांभाळून त्यानुसार आपला दिनक्रम लावावा लागतो. बर्‍याच अंशी इतरांच्या मदतीने/एकटीने हे शक्य असते, जमते. पण काहींना मात्र याचे दडपण येते, चिंता वाटू लागते. गरजेपेक्षा अधिक ताण जाणवल्यास त्याचे स्वरूप बदलते आणि नैराश्याकडे झुकू लागते. नैराश्याची लक्षणे प्रसवोत्तर नैराश्येमध्ये खूप खिन्न राहणे, झोपेचे तंत्र बदलणे, खूप गळून गेल्यासारखे सतत वाटणे, खाण्या-पिण्याचे तंत्र बदलणे, रुची नसणे/पालटणे, कशातही मन न लागणे, रडण्याचे प्रमाण वाढणे, क्षुल्लक कारणांवरूनही रडू येणे, चिंतातूर राहणे, चिडचिड वाढणे. खूप विक्षिप्त स्वभाव होणे (moody & cranky) आणि एकंदरच सगळ्यातला रस कमी होणे. नैराश्य (sense of hopelessness) वाढणे इ. लक्षणे उद्भवतात. स्वत:बद्दलचा आत्मविश्र्वास कमी होणे, एखादी गोष्ट मला जमेल का, झेपेल का? असे सतत वाटणे, बाळाची अहोरात्र काळजी लागून राहणे, झोपले तर इतका वेळ का झोपले किंवा सारखा रडू लागला तर काय होत असेल? ‘मी आई असून मला हे कसं जमत नाही?’ असे स्वत:बद्दल न्यूनभाव निर्माण होणे, रिक्तपणा भासणे, सतत थकलेले आणि घाबरलेले राहणे, कुठल्याही गोष्टीवर आणि कशावरही चिडून प्रतिक्रिया देणे इ. घडत राहते. थोड्या प्रमाणात हे असल्यास थोड्या दिवसात ते संपुष्टात आल्यास त्यासाठी वेगळी चिकित्सा लागत नाही. पण या नैराश्यामुळे शरीरावरही अनिष्ट परिणाम होऊ लागतात. वजन एकदम वाढू लागते किंवा घटते. मलप्रवृत्तीची नियमितता जाते, पित्त होणे, डोके दुखणे, भूक न लागणे किंवा भरपूर लागणे, त्वचा काळवंडणे, निस्तेज होणे, केस निर्जीव होणे इत्यादी लक्षणे शरीरावर उमटतात.

 
या सर्व गोष्टी टाळता येऊ शकतात. नैराश्याचे बीज हे मनात असते. मनातील घालमेल, मनातील नकारात्मक विचारांमुळे असते. त्यामुळे महत्त्वाची चिकित्सा ही मनावरच आहे. समाधानी राहणे, सकारात्मक राहणे, अवाजवी अपेक्षा (स्वतःकडून व इतरांकडून) न ठेवणे, अशा गोष्टींवर भर द्यावा लागतो. मन बोलून हलकं होतं, प्रश्न बोलून त्याची प्रखरता कमी होते. त्यावर मार्ग सापडतो. घरातल्यांशी, मित्र-परिवाराशी बोलल्यानेे अर्धे टेन्शन कमी होते. विविध relaxation techniques  आहेत. काही श्वासाचे व्यायाम, काही अभ्यंग- शिरोधारेचे प्रकार, संगीत व अन्य आवडीची कला इ. मध्ये थोडा वेळ घालवावा. नीट झोप, विश्रांती आणि सकस आहार द्यावा. छंद जोपासावा. याने मन प्रसन्न राहण्यास मदत होते. 
 
नैराश्य
मग ते मग गर्भिणी अवस्थेतील असो किंवा प्रसवोत्तर, हे दोन्हीही काळ त्या स्त्रीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आणि बदल घडवून आणणारे आहेत. शारीरिक, मानसिक, भावनिक आणि आर्थिक सगळ्याच बाजूने बदल घडत जातो. पण हे टप्प्याटप्प्याने होतात. त्याला सामोरे जाणे आणि तेही हसतमुखाने, हे महत्त्वाचे आहे. चिंतेने कुठलाच प्रश्न सुटत नसतो. थोडा ताण असणे महत्त्वाचे आहे. यालाच ’positive stress' म्हणतात. म्हणजे एखादी गोष्ट क्रिया उत्तम होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणे, आपले सर्व पणाला लावणे हे व्हावे, पण त्यातून आपल्याला हवा तसाच परिणाम साधता येईल, असे मानू नये. कर्म आपल्या हातात असते, त्याचे फळ आपले नसते, आपल्याला हवे तसे नसते. आयुर्वेदात ‘सत्वावजय’ चिकित्सा सांगितली आहे. ‘सत्वावजय’ म्हणजे सत्वावर विजय मिळवणे. यासाठी थोडी आध्यात्मिक बैठक असल्यास फायदा होतो. तसेच सुगंधी चिकित्सेचाही वापर यात उत्तम होतो. रंगीबेरंगी फुलं, सुंदर सुवासाची फुलं मनाला प्रसन्न करून जातात. घरात फुलं आणावीत, डोक्यात फुलं, गजरे माळावेत. अंग मेहनत आपल्या क्षमतेपेक्षा अधिक करू नये. 
 
सात्त्विक आहार 
ज्यात दुधाचा, तुपाचा वापर होतो, पण मिरची-मसाले कमी आहे, असा सात्त्विक आहार खावा. ताजे घरी बनविलेले अन्नसेवन करावे, शिळे, चमचमीत, चटकमटक आहार टाळावा. चमचमीत, जळजळीत जेवणाने ‘रज’ भाव वाढतो. त्यामुळे स्वभावात चंचलता, रागीटपणा, चिडचिड वाढते. असूया, हेवा वाटणे ही लक्षणे वाढतात. तसेच शिळे अन्न पचायला जड अन्न जर अधिक खाल्ले तर स्वभावात आळशीपणा, झोपाळू वृत्ती अधिक वाढते. आपल्या गोष्टींवर अधिक हक्क दाखवणे, हट्टी होणे व हेवा करणे (overly possessive & overly stubborn) इ. स्वभावदोष तमोगुणामुळे वाढतात. आहारातूनच पोषण होते आणि गर्भिणी अवस्थेत गर्भाचे पोषण व प्रसवानंतर अर्भकाचे पालनपोषण मातेच्या आहारावरच अवलंबून आहे. तेव्हा खाण्यातील वागण्यातील अतिशयोक्ती (आततायीपणा) टाळावा. संभाषणामुळे अर्धे प्रश्न सहजतेने सुटतात. एकांगी विचार होत असल्यास कुणाशी बोलल्यावर त्यातील तथ्य अधिक स्पष्ट होते, त्यामागील आपला विचार बरोबर की चूक हे आपल्याच लक्षात येते. तेव्हा अशा आनंदी काळात नवोत्पत्तीच्या समयी आनंदी राहणे अत्यंत महत्त्वाचे आहे. शरीराचे उत्तमपोषण याबरोबरच मनाने खंबीर आणि शांत असणे हेही गरजेचे आहे. शरीराचा आणि मनाचा खूप जवळचा संबंध आहे. शरीराला होणारा त्रास मनावरही पडसाद उमटवतो आणि मानसिक घालमेलीचा दुष्परिणामशरीरालाही भोगावा लागतो. तेव्हा स्वस्थ अपत्यप्राप्तीसाठी मातेने शरीराने आणि मनाने निरोगी राहणे खूप महत्त्वाचे आहे. 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.