खाद्यभ्रमंती- सुरण-सोया-पालक मसाला

    12-Apr-2017
Total Views |


तुम्ही प्युअर-व्हेज असाल तर ही डिश कराच करा.... सोया प्रोटीन आणि आयर्नवाला पालक हे भन्नाट कॉम्बो आहे, कुठल्याही आहारतज्ञाला विचारून घ्या....

माझ्या रेसिपीज करताना माझा एक आग्रह असतो की ज्या भाज्या आपल्या घरी पारंपारिक पद्धतीच्या आणि चवीच्या म्हणून केल्या जातात, त्याच बहुमोल नैसर्गिक खजान्यांनी भरलेल्या भाज्या या अश्या नाविन्यपूर्ण रेसिपीने आणि लज्जतदार स्वादाने तयार करायच्या की आपणा सर्वांना साक्षात आलिशान हॉटेल मध्ये जाऊन या डिशेस जेवल्याचा आनंद होईल आणि पर्यायाने शेवटी या भाज्या सुद्धा आपल्या पोटात जातील आणि यापासूनचे मिळणारे फायदे आपणा सर्वांना मिळतील.

अनेक भाज्या अशा असतात की ज्यात निसर्गाची अनेकानेक अनमोल द्रव्ये मग ती प्रथिने असतील किंवा व्हिटामीन्स असतील दाबून भरलेली असतात. परंतु काही ना काही कारणांनी या भाज्या अकारणचं आपणां सर्वांच्याच ‘नावडत्या’ या सदरात मोडतात.

मी स्वतः सर्व भाज्या आवडीने खातो आणि मुबलक खातो आणि यामुळेच असेल कदाचित पण माझं पूर्ण कुटुंब सुध्दा सगळ्या भाज्या अगदी आनंदाने खाते.

पण दुर्दैवाने सगळीकडे असं होईलच अस नाही. पारंपारिक रेसिपीने अनेक भाज्या आपल्या घरात केल्या जातात आणि म्हणूनच कदाचीत या भाज्या आपल्या घरात हळूहळू आवडेनाश्या होतात आणि नंतर या भाज्या घरात आणल्या, केल्याचं जात नाहीत आणि पर्यायाने या अनमोल भाज्यांना आपण हकनाक मुकतो.

 


चला तर मग आज असंच एक भन्नाट कॉम्बो टेस्ट करूया, तीन जबऱ्या प्रकारांचा एक सॉलिड डिशानुभव, ‘सुरण-सोया-पालक मसाला’.

 

साहित्य

सुरण - पाव किलो ( हा एक असा बहुमोल परंतु धोकादायक प्रकार आहे जो तुम्ही काळजीपूर्वक विकत घेतला नाहीत तर अख्खी डिश तर गंडू शकतेच या उपर सगळ्यांच्या घशाला आणि हाताला खाज आणून हा प्रकार भंडावून सोडू शकतो. पण चिंता नको मैत्रांनो, मी सांगतो, मी वर्षानुवर्ष ही भाजी करतो आहे....

 


खाजरा नसलेला सुरण कसा ओळखायचा ?

१) आधी कापून ठेवलेला सुरणाचा कंद शोधायचा.
२) पूर्ण वाळलेला सुरण शोधायचा, ओलसर सुरण खाजरा असू शकतो.
३) पूर्ण वाळलेला सुरण हा पांढरा असतो, लालसर नसतो हे नीट लक्षात घेऊया.
४) सुरण कुठल्याही नवीन भाजीवाल्याकडे घेऊ नये, शक्यतो नेहेमीच्या भाजीवाल्याकडे घ्यावा, कितीही ओळखीचा असलं हा माणूस तरी “बाबा रे, खाजरा नाहीये ना?” असं मी वर्षानुवर्षे माझ्या भाजीवाल्याला विचारात आलो आहे आणि तो ही “नाही हो साहेब, तुम्हाला कधी खाजरा देईन का?” असे उत्तर मला प्रेमाने देत असतो नेहेमीच.

 

सोया चंक्स – ३० एक वड्या ( मी फॉर्च्यूनच्या वापरतो)

 


पालक – १ जुडी, (बारीक पानांचा कोवळा पालक बघून घ्या, नाही मिळाला तर जेव्हा मिळेल तेव्हा ही भाजी करा, देठ पूर्ण काढून टाकून पाने निवडून पाने फक्त वाहत्या पाण्यात स्वच्छ धुवून घ्या. ब्बास इतकंच)

आलं – २.५ इंच लांब आल्याचा रसदार जाडजूड तुकडा, बारीक किसलेला

लसूण – ६ पाकळ्या

हिरवी मिरची – ४ मध्यम तिखट

लाल मिरची – २

तमालपत्र – १ पान

काळी मिरी – अर्धा चमचा

दालचिनी – एक इंच तुकडा ,

लवंग – ६ कळ्या

कांदा – २ मोठे

टोमाटो – ४ मोठे

लाल तिखट – २ चमचे ( स्वादानुसार )

साखर – दोन चमचे

मीठ – स्वादानुसार

कोथिंबीर – २ चमचे

कोकम आगळ – तीन चमचे

 

कृती

सर्व साहित्य तयार ठेवा, मोरया म्हणा आणि मस्त सुरुवात करा....

१) सुरणाचे काप करूया... मध्यम पातळ. हे काप एका पसरट भांड्यात घेऊन यावर कोकम आगळ पसरून ओतून ते सर्व कापांना सर्व बाजूने व्यवस्थित मन लावून चोळूया. ही फार महत्वाची क्रिया आहे यामुळे सुरण अगदी थोडाफार खाजरा असलाच तरी त्याचा खाजरेपणा निघून जातो. हे काप असेच किमान पंधरा मिनिटे असेच या भांड्यात ठेऊन देऊया.

 


पंधरा मिनिटानंतर पुन्हा एकदा या सर्व कापांना पातेल्यात पसरलेला कोकम आगळ हाताने चोळून घेऊया.

जाडसर तव्यावर दोन चमचे तेल घेऊन पसरवूया आणि जरासे तेल तापले की यावर सर्व कापं पसरून व्यवस्थित मांडून ठेवूया. बघत बघत अंदाज घेत आताआपल्याला ही कापं परतायची आहेत, करपवू नका पण आतून पूर्ण शिजण्यासाठी कमी विस्तवावर हे शिजवा. दोन्ही बाजूनी कापे व्यवस्थित शिकून सोनेरी तांबूस झाली की विस्तव बंद करून ही कापे तव्यावरच ठेऊन द्या... पुढची प्रोसेस होईपर्यंत ही कापे मस्त क्रिस्प तयार होतात आणि डिश मध्ये सर्व्ह करेपर्यंत बढीया कुरकुरीत होतात.

 


२) मगाशी आपण धुवून घेतलेली कोवळ्या पालकाची ओली पाने तशीच्या तशी घट्ट झाकण असलेल्या कुठल्याही पातेल्यात घेऊया आणि मध्यम विस्तवावर अजिबात जास्तीचे पाणी न घालता ५ मिनिटे शिजवूया.

 


गड्यांनो, झाकण घट्ट पाहिजे हे लक्षात ठेवा. जास्तीचे पाणी नको....

पालकाचा रंग ५ मिनिटांनी गडद हिरवा व्हायला लागला रे लागला की ही पाने पातेल्यातून काढून मिक्सरच्या मोठ्या भांड्यात घेऊया या पातेल्यात उतरलेल्या हिरव्या पाण्यासकट (जास्तीचे पाणी नको, भाजी पंचात होईल) आणि त्यात लसूण, आलं, हिरव्या मिरच्या आणि एक चमचा साखर घालून हे भांड झाकण घट्ट लावून असेच ठेऊया पाच ते दहा मिनिटे, या वेळात पालक थंड होईल मग तो फिरवायचा आहे घट्ट पेस्ट करायला. दहा मिनिटानंतर पेस्ट करून बाजूला ठेऊन द्या.

 

३) आता सोया चंक्स...

एका पातेल्यात अर्ध पातेलं पाणी मोठ्या विस्तवावर उकळून घेऊया, व्यवस्थित उकळी आली की यात सोया-चंक्स टाकायचे आणि मोठ्या विस्तवावर सोयाच्या या वड्या व्यवस्थित फुले/फुगेपर्यंत विस्तव मोठा ठेवायचा. सोया चंक्स टरटरून व्यवस्थित फुलले की पातेल्यातून सर्व गरम पाणी काढून टाकायचे आणि सोया चंक्स एका चाळणीत घेऊन लगेच नळाच्या थंड पाण्याखाली धरायचे.... २-३ मिनिटे... फक्त...

 


आता हे पातेलं असंच बाजूला ठेऊन देऊया... पुढची तयारी होईपर्यंत हे सोया चंक्स तयार होणार आहेत आपले आपलेच....

 


४) आता एका जाड बुडाच्या पातेल्यात दोन चमचे तेल घेऊया आणि मंद विस्तवावर तेल जरा तापल्यावर त्यात आधी चिमुटभर साखर घालूया मग लाल मिरची टाकून किंचित परतुया आणि आता लगेच काळी मिरी, लवंग, दालचिनी आणि तमालपत्र टाकून व्यवस्थित परतून घेऊया.

हीच ती पहिली पायरी जिथे तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना भूक लागायला सुरुवात होणार आहे.

तेलामध्ये या मसाल्याच्या पदार्थांचा अर्क व्यवस्थित उतरला आहे हे लक्षात आल्या आल्या हे सर्व पदार्थ बाहेर काढून घेऊया नाहीतर नंतर जेवताना कुणीही प्रिय व्यक्तीने आठवण न काढताच अकारण उचकी लागते.

आता यात मंद विस्तवावर बारीक चिरलेला कांदा टाकून, यात अर्धा चमचा मीठ पेरून, साधारण आठ एक मिनिटे कांदा व्यवस्थित सोनेरी होईस्तोवर परतून घेऊया.

आता यात बारीक चिरलेले टोमाटो सरकावूया आणि व्यवस्थित मध्यम घट्टसर ग्रेव्ही तयार होईपर्यंत परतवूया, साधारण पाच एक मिनिटे या कृतीला लागणे अपेक्षित आहे, टोमाटोच्या दर्जावर हे अवलंबून आहे. ही ग्रेव्ही व्यवस्थित उकळू द्या, कांदा आणि टोमाटो एकजीव व्हायला हवेत मैत्रांनो... घाई नको...

सबर का फल जबऱ्या होता है

५) आता या ग्रेव्ही मध्ये लाल तिखट आणि मीठ, उरलेली साखर टाकून व्यवस्थित परतून घेऊया.

६) आता यात मिक्सरमध्ये फिरवून घेतलेला पालक टाकूया आणि पाच एक मिनिटे मंद विस्तवावर परतुया. तुम्हाला ग्रेव्ही जितकी हवी आहे तितकं पाणी इथे टाकून घेऊ शकता (मी अजिबात जास्तीचं पाणी टाकल नव्हतं, माझा सल्ला आहे की ग्रेव्ही जास्त पातळ करू नका. घट्टसर ठेवा, जबऱ्या लागते मग ही डिश)

 


७) आता मगाशी बाजूला ठेवलेले सोया चंक्स अलगद पिळून, त्यातून सगळ पाणी निथळून या ग्रेव्ही मध्ये प्रेमाने सोडा, घरातले सगळेच जण हे सोयाचंक्स आवडीने खातात मैत्रांनो, जरा वेळ जास्त लागतो पण मी हे सोय चंक्स प्रेमाने भाजीत सोडतो, प्रत्येक चंक सोबत घरातल्यांना तुमचे प्रेम जाणवू द्या, छान वाटत... बघा करून....

८) आपली डिश तयार होत आली आहे गड्यांनो, घरच्यांना वर्दी द्या....

९) आता विस्तव बंद करा... भाजी एखाद्या झाकण असलेल्या सर्व्हिंग बाउल मध्ये काढून घ्या... (आणि भाजी वाढून घेतल्यानंतर आठवणीने झाकण ठेवायला विसरू नका) आणि आता सुरण आपल्याला सगळ्यात शेवटी भाजीत घालून जरासा परतायचं आहे.... विस्तवावर नाही... नुसताच... कारण सुरण या भाजीमध्ये क्रीस्पीच छान लागणार आहे गड्यांनो....

सर्व्हिंग बाउल टेबलावर घेतल्यावर यात आत तव्यावरला सुरण घालून मस्त खाली वर परतून घ्या... सुराणाचे काही काप बाहेर ठेवा... वरून डिशवर छान दिसतात... भूक वाढवतात... आता वर कोथिंबीर पसरवा....

आणि आता ताट वाढून झाल्यावर ईशस्मरण करूया क्षणभर... घोटभर पाणी पिऊया... आणि आक्रमण....

मात्र पुन्हा एकदा छोटीशी आठवण, ताव मारण्याच्या आधी सर्व्हिंग बाऊलवर आठवणीने झाकण ठेवाच.

ही डिश गरमागरम पोळी सोबत छान लागेल... किंवा वाफाळलेल्या भातावर घेतलीत तर मग काय स्वर्गच नुसता... बाकी काही नाही...

चला तर मग मैत्रांनो....

भरपेट खा... आरोग्यदायी रहा... खुश व्हा... मस्त जगा

 

देव बरा करो.........

 

- मिलिंद वेर्लेकर


फेसबुक वर तरुण भारत

संबधित बातम्या

खाद्यभ्रमंती- फरसबी-मेथी-पनीर मसाला


खाद्यभ्रमंती - बटर पनीर/सोया


खाद्यभ्रमंती- कलर्ड ड्राय स्पाईस

ताज्या बातम्या
उ.प्र. नंतर आता बिहार मध्येही कत्तलखान्यांवर कारवाई
उ.प्र. नंतर आता बिहार मध्येही कत्तलखान्यांवर कारवाई

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर १८ टक्के टोलवाढ
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर १८ टक्के टोलवाढ

पुणे महापालिकेचे अंदाजपत्रक ३० मार्च सादर होणार
पुणे महापालिकेचे अंदाजपत्रक ३० मार्च सादर होणार

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.