मैं बस तुम्हें, देखते हुए देखुं ।

    12-Apr-2017
Total Views |
 


 
येसुदासने गायिलेले एक नितांतसुंदर गीत आहे, 
 
’सुनयना, 
आज इन नजारोंको तुम देखो, 
और मैं तुम्हें देखते हुए देखूं, 
मैं बस तुम्हें देखते हुए देखूं.’ 
 
अंध असलेल्या नायिकेला दृष्टी प्राप्त करुन देण्यासाठी तिच्याशी कसलाही संबंध नसलेला एक साधाभोळा व्यक्ती आपले आयुष्य पणाला लावतो असे काहीसे कथानक असलेल्या ’सुनयना’ या चित्रपटात हे गीत होते. ’तू तुझ्या डोळ्याने काहीतरी पहात असताना फ़क्त मला पहायचे आहे’ हा यातला भाव हृदयस्पर्शी आहे. या भावनेचा प्रत्यय देणारी एक घटना रक्तपेढीचे काम करताना मला प्रत्यक्ष अनुभवायला मिळाली. 
 
तो एक लक्षात राहण्यासारखा दिवस होता. त्या दिवशी डॉक्टर म्हणजेच - जनकल्याण रक्तपेढीचे कार्यकारी संचालक डॉ. अतुल कुलकर्णी नेहमी दिसतात त्यापेक्षा विशेष अशा आनंदी मूडमध्ये मला पहायला मिळाले. तसे डॉ. कुलकर्णींबरोबर काम करणे नेहमीच आनंददायी असते. चिरतरुण व्यक्तिमत्व, चेहेऱ्यावर सदैव हास्य, बोलणे अत्यंत हळुवार आणि विनम्र, डोक्यात नेहमी नवनवीन कल्पनांची वर्दळ आणि स्वभावात या कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी आवश्यक असणारी प्रचंड जिद्द आणि परिश्रमांची तयारी अशा गुणांचे धनी असलेले डॉक्टर तसे सर्वांना नेहमी प्रसन्नच दिसतात. पण  कदाचित बराच काबळ त्यांच्यासह काम केल्याने त्या दिवशी हा बदल मला चटकन जाणवला असेल. नेहमी आनंदी असणारा माणूस एखाद्या दिवशी अगदी निराळे ओळखू येण्याइतपत आनंदात असलेला जाणवतो, तेव्हा तो आनंद अगदी आतून आला असणार हे निश्चित. डॉ. कुलकर्णी रक्तपेढीत आल्या आल्या त्यांचा असाच काहीसा मूड मी टिपला आणि त्यांना प्रश्न टाकला, ’डॉक्टर, आज तुम्ही काहीतरी पार्टी देणार अशी चिन्हं दिसताहेत.’ डॉक्टर मनापासून हसले आणि म्हणाले, ’जरूर. जरूर. लगेच ठरवून टाका.’ माझा अंदाज खरा ठरल्याचा आणि पार्टी मिळणार असल्याचा उत्साह साळसूदपणे आवरत मी म्हणालो, ’पार्टी तर ठरवूच, पण पार्टीचं निमित्त कळालं तर आणखी मजा येईल.’ यावर माझ्या पाठीवर थाप मारत ते म्हणाले, ’नक्की. चल तुला सगळं सांगतो’ आणि यानंतर डॉक्टरांनी मला जे काही सांगितलं ते ऐकून मी अंतर्मुख झालो. खरोखरीच खूप मोठा सण साजरा करावा असं ते निमित्त होतं.
 
डॉक्टर नुकतेच दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातून एका थॅलेसेमियाग्रस्त मुलाला भेटून आले होते. हा मुलगा – असेल साधारण पाचवी/सहावीत शिकणारा - आपल्या आई-बाबा आणि भावंडांसह एका खेडेगावातून इथे उपचारांसाठी आला होता. ’जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे’ या म्हणीप्रमाणे थॅलेसेमियाग्रस्त असण्याची वेदना म्हणजे काय हे त्या घरात असल्याशिवाय नीट्पणे कळत नाही. थॅलेसेमिया हा विकार मुलांच्या बालपणावरच आघात करतो. अर्थात याही मुलाच्या बाबतीत असेच झाले होते. थॅलेसेमियाचा अपरिहार्य परिणाम म्हणून या मुलाला – मयूरला – वयाच्या दुसऱ्या वर्षापासून आपल्या शरीरात दर महिन्यातून एकदा किंवा दोनदा रक्त भरुन घ्यावे लागत होते. हा आटापिटा केवळ जिवंत राहता यावे यासाठी. ज्या वयात मयूरने भरपूर खेळायला हवे, मस्ती करायला हवी, खोड्या करायला हव्यात त्या वयात हा बिचारा गेली दहा वर्षे प्रत्येक महिन्यात दोनवेळा एक रक्ताची पिशवी आपल्या शरीरात भरुन घेण्यासाठी चार-चार तास सुई खुपसून घेत होता. या वयात असणारी स्वाभाविक चंचलता आणि थॅलेसेमियावरचा हा असा अघोरी उपचार यांचा ताळमेळ कसा बसत असेल ? या विकारामुळे साहजिकच मयूरही निस्तेज आणि चिडचिडा बनला होता. आई-बाबाही त्रासून गेले होते. एक तर नित्याचा दवाखाना आणि आजवर शेकडो जणांचे रक्त सामावून घेतल्याने मयूरचे शरीर केव्हाही चिरविश्रांती घेऊ शकेल अशा स्थितीत. या कुटुंबातले वातावरण कसे राहत असेल, याची आपण केवळ कल्पनाच करु शकतो. जनकल्याण रक्तपेढीसारख्या रक्तपेढ्यांमधून मयूरसारख्या सर्व मुलांना रक्तघटक पूर्णत: मोफ़त दिले जात असले तरी त्यांच्या कुटुंबात चाललेली ही नित्याची तगमग कमी होण्यासाठी इच्छा असूनही पूर्णत: असहाय्यताच पदरी येते.

 
अर्थात या भयानक पार्श्वभूमीवर डॉ. कुलकर्णींनी मला जी बातमी सांगितली ती खरोखरीच केवळ दिलासादायकच नव्हे तर आत्यंतिक समाधान देणारी होती. ’सुदैवाने मयूर थॅलेसेमियाच्या या दुष्टचक्रातून पूर्णपणे बाहेर पडला आणि आता यापुढे त्याला रक्त घ्यावे लागणार नाही, अन्य सामान्य मुलांप्रमाणेच तो त्याचे आयुष्य जगु शकेल’ ही ती बातमी होती. आता ही बातमी उत्सव साजरा करण्यासारखी आहे की नाही ? थॅलेसेमिया आजार पूर्णत: बरा करु शकणारी शस्त्रक्रिया ’बोन मॅरो ट्रान्सप्लांट’ मयूरवर करण्यात आली होती आणि ती यशस्वीही झाली होती. या शस्त्रक्रियेव्दारे मयूरच्या हाडातील बोन-मॅरो हा घटक पूर्णत: बदलण्यात येऊन तिथे त्याच्याच भावाचे बोन-मॅरोज संक्रमित करण्यात आले होते. अर्थात हे दोन ओळीत लिहिले असले तरी ते तितके साधे काम नक्कीच नाही. मुळात योग्य गटाचे बोन-मॅरोज मिळणे हे अत्यंत जिकिरीचे काम. मयूरच्या सुदैवाने ते त्याच्या भावामध्येच मिळाले. दुसरा महत्वाचा घटक या शस्त्रक्रियेसाठी लागणारा अमाप पैसा. मयूरचे घर तर अगदी साधे. सर्वांचीच पोटे हातावर. मग हे साधावे कसे ?
 
मागे पुण्यातील एक ज्येष्ठ उद्योजक डॉ. अतुल कुलकर्णी यांना येऊन भेटले आणि त्यांनी डॉक्टरांना थॅलेसेमियाच्या मुलांना पूर्णपणे बरे करण्यासाठी दर वर्षी काही रक्कम देण्याची इच्छा बोलून दाखवली. हे उद्योजक त्यांची प्रचंड ज्ञानलालसा, कठोर परिश्रम आणि काटेकोर अनुशासनासाठी ओळखले जातात. कदाचित यामुळेच ही अशी शस्त्रक्रिया एखाद्या रक्तविकारतज्ज्ञाच्या मार्गदर्शनाखाली आणि अद्ययावत रुग्णालयातच करावी लागेल याची आणि संबंधित बहुतेक सर्व छोट्या-छोट्या बाबींची त्यांना पूर्ण माहिती होती. पण असे असतानाही हे महोदय एखाद्या रुग्णालयात न जाता थेट जनकल्याण रक्तपेढीत येऊन डॉ. कुलकर्णींना भेटले. आपला सर्व मनोदय अत्यंत स्वच्छ शब्दांत मांडून ते शेवटी इतकंच म्हणाले, ’डॉक्टर, शस्त्रक्रिया रुग्णालयातच होणार असली तरीही मी हे पैसे मात्र तुम्हाला म्हणजेच जनकल्याण रक्तपेढीला देईन. असे मूल तुम्हीच निवडा आणि हे काम घडवून आणा. माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे.’ ही निश्चितच फ़ार मोठी गोष्ट होती. इतका भरभक्कम आधार मिळाल्यावर साहजिकच डॉक्टर कामाला लागले आणि अखेर सर्व गोष्टी व्यवस्थितपणे जमून येऊन मयूर थॅलेसेमियामुक्त झाला. खरे तर वैयक्तिक अथवा रक्तपेढी म्हणूनही स्वत: डॉ. कुलकर्णींचा मयूर आणि त्याच्या कुटुंबीयांशी कसलाही संबंध नव्हता. पण तरीही नियमित रक्त घेणाऱ्या मुलांपैकी आपल्या वैद्यकीय ज्ञानाच्या आधारे मयूरची निवड करणे, त्याच्या विविध चाचण्या करवून घेणे, शस्त्रक्रियेच्या वेळी रुग्णालयात स्वत: जातीने उपस्थित राहणे, कुटुंबीयांबरोबर संवाद साधणे अशी सर्व छोटी छोटी कामे डॉक्टरांनी आपल्या संवेदनेपोटी जबाबदारीने पार पाडली होती आणि त्यामुळेच आता शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याचा आनंद डॉक्टरांच्या चेहेऱ्यावरुन ओसंडून वाहत होता यात आश्चर्य वाटावे असे काहीच नव्हते.
 
मयूरला थॅलेसेमियामुक्त करण्याने ’ते’ ज्येष्ठ उद्योजक अथवा डॉ. कुलकर्णी यांना जे काही मिळाले ते ’मैं बस तुम्हें देखते हुए देखूं’ यापेक्षा वेगळे दुसरे काहीच नाही. 
- महेंद्र वाघ
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.