शाहंची जादू कर्नाटकात चालणार नाही : सिद्धरामय्या

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    31-Dec-2017
Total Views |


बंगळूरू : आगामी कर्नाटक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक दौऱ्यावर असलेले भाजप अध्यक्ष अमित शाह यांची कसलीही जादू कर्नाटकमधील जनतेवर चालणार नाही, असे वक्तव्य कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आज केले आहे. बंगळूरूमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते.

अमित शाह यांच्या आजच्या कर्नाटक दौऱ्यावरसंबंधी सिद्धरामय्या यांना प्रश्न विचारला असता, त्यांनी शाह यांच्या या दौऱ्याचा भाजपला कसलाही फायदा होणार नाही, असे म्हटले. 'भाजपला वाटत आहे कि उत्तर भारताप्रमाणे याठिकाणी देखील त्यांना सहज यश मिळेल, परंतु शाह आणि भाजप यांची कसलीही जादू कर्नाटकात चालणार नाही.' असे ते म्हणाले. तसेच कर्नाटकाच्या जनतेचा राज्यातील कॉंग्रेसवर पूर्ण विश्वास असून आगामी निवडणुकांमध्ये देखील कॉंग्रेसच बहुमताने विजयी होईल, असा विश्वास ही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

कर्नाटक विधानसभेचा कालावधी येत्या २०१८ मध्ये पूर्ण होत आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण आता तापू लागले आहे. त्यानिमित्त आता राज्यातील भारतीय जनता पक्षाने देखील आपली मोट बांधण्यास सुरुवात केली आहे. यासाठी पक्षाध्यक्ष अमित शाह हे स्वतः आजपासून कर्नाटकच्या राजकीय दौऱ्यावर गेले आहेत. आपल्या या दौऱ्यामध्ये शाह हे राज्यातील भाजप आमदार, खासदार, नगरसेवक, पक्षाचे जिल्हाध्यक्ष या सर्वांची भेट घेऊन त्यांची चर्चा करणार आहेत. सध्या कॉंग्रेसकडे कर्नाटक हे एकच मोठे राज्य आपल्या ताब्यात राहिले आहे, त्यामुळे कर्नाटकमध्ये पुन्हा सत्ता स्थापण्यासाठी भाजप सर्व ताकद पणाला लावत असल्याचे दिसत आहे.
 
 
@@AUTHORINFO_V1@@